न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलला एक वर्ष पूर्ण झाले हे खरेच वाटत नाही. हे दिवस वाऱ्यासारखे उडून गेले. गेल्या वर्षापासून आपण या पोर्टलच्या कुटुंबाशी जोडले गेलो. ही अदृश्य नाळ, आपल्या नात्यांची वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे.
जसे आपल्या मुलाचा पहिला वाढदिवसात अगदी थाटात व प्रेमाने साजरा केला जातो तसेच वेबपोर्टलच्या वर्षपूर्ती निमित्ताने पुण्यात कौटुंबिक स्वरूपात स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
अगदी साधेपणात, घरघुती वातावरणात साजरे होणारे न्यूज स्टोरी टुडे चे ठिकठिकाणी होणारे स्नेह मिलन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वेब पोर्टलच्या सर्व लेखकांच्या, कवींच्या, ज्यांच्यावर लिहिलं गेलंय अशा सर्वांच्या भेटी गाठी होत आहेत. नव्या ओळखी होऊन नवी नाती जोडली जात आहेत.
रिटायर झाल्यावर अनेक लोक असे ठरवतात की आता निवांत बसायचे, फिरायचे. पण असे न करता वेगळा विचार करणारे काही जण असतात. त्याची प्रचिती आली ती या वेब पोर्टलचे संपादक मा.देवेंद्र भुजबळ सर व सहसंपादक अलकाताई यांना भेटून. खरंच त्यांनी उचललेले हे धनुष्य लक्षवेधी ठरले आहे. कारण देश विदेशातून अनेक लेखक व वाचक या पोर्टलशी जोडले आहेत ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
अनेक लेखकांना एकत्रित करण्याची बहुमोल कामगिरी या चिरतरुण जोडप्याने केली आहे. त्यासाठी त्यांना हा मानाचा मुजरा. वयाला ही लाजवेल असे काम ते करत आहे. वय म्हणजे जणू केवळ एक आकडा आहे याची खात्री त्यांच्याकडे पाहून होते.
वेब पोर्टलच्या माध्यमातून अनेक लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ दिल्याबद्दल संपादकांचे मनःपूर्वक आभार.
विविधता नावीन्य ही सर्व वाचकांसाठी देखील मेजवानी आहे. अनेक गोष्टींची माहिती मिळते. ज्ञानात भर पडते व आनंदी आयुष्य जगण्याची कला ही शिकवते.
“वाचक लिहितात” हे सदर तर लाख मोलाचे आहे. त्यामुळे लेखकांना प्रेरणा मिळते व आपल्या लोकांनी केलेल्या कौतुकाची थाप पुढे कार्यरत रहाण्यासाठी मदत करते.
अतिशय हुशार व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व लाभलेले देवेंद्र सर व प्रसन्न हरहुन्नरी अलका ताई तुम्ही या वेब पोर्टलच्या माध्यमातून आम्हाला जणू एक नवी दिशा दाखवली आहे. आमच्या मनात एक आशेची ज्योत जागृत केली आहे. शब्द ही कमी पडतील असे लाख मोलाचे काम तुम्ही करत आहात. Hats off to you both. या दोघांचा दांडगा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.
दिवसभर न दमता न थकता तुम्ही हे काम गेल्या वर्षांपासून अविरत करत आहात. घर व वेब पोर्टल अशी दुहेरी कसरत अलकाताई करत आहेत. तसे हे काम फार किचकट असते. पडद्या मागून काम करण्याचे काम अलकाताई करत आहेत. दिवसातले अनेक तास या कामासाठी त्या देत असतात. त्याच बरोबर स्वतःची, कुटुंबाची काळजी देखील चोख निभावत असतात.
साधे, सकस, पौष्टिक व ताजे जेवण करण्यात अलकाताईंचा हात कोणीही धरू शकत नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. सतत उत्साही, हसतमुख व्यक्तिमत्व लाभलेल्या अलकाताई सर्व महिलांच्या प्रेरणास्थान आहेत.
या दोघांचे साम्य म्हणजे त्यांच्यातील नम्रपणा. एवढी मोठी कामगिरी करत असून देखील प्रतिष्ठा अथवा पदाचा कोणताही गर्व, अहंकार नाही. मोठेपणा नाही. हे गुणधर्म या जोडीला सर्वांपासून वेगळे बनवते. आग्रहाने घरी आमंत्रित करून मस्त गप्पा गोष्टी मारताना कोणतेही दडपण जाणवत नाही हे मात्र विशेष आणि याची प्रचिती अनेकांनी घेतली देखील असेलच. यांच्यातील जिद्द, चिकाची,आत्मविश्वास व नाविन्याची ध्यास सर्वांशी जोडून रहाण्याची कला याला सलाम.
एक लेखिका म्हणून माझी ओळख झाली ती केवळ सरांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे, सुचनांमुळे त्याचबरोबर अलका ताईंच्या सहकार्यामुळे. या दोघांची मी आजन्म ऋणी आहे. यापुढे ही अशीच साथ मिळावी हीच इच्छा.
या पोर्टलची मला वर्षभरात अनोखी साथ लाभली, ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. वेबपोर्टलने अशीच उंच भरारी भरारी घ्यावी. माझे गुरू मा.देवेंद्र भुजबळ सर व मला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गुरू पत्नी सौ अलकाताई भुजबळ यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

– लेखन : रश्मी हेडे. सातारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800