Sunday, September 8, 2024
Homeसेवा'न्यूज स्टोरी टुडे' : देशोदेशीच्या लेखकांचे कुटुंब

‘न्यूज स्टोरी टुडे’ : देशोदेशीच्या लेखकांचे कुटुंब

‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेब पोर्टलला २२ जुलै रोजी ४ वर्षे पूर्ण झाल्याचे वाचून मला मनस्वी आनंद झाला. याचं प्रमुख कारण म्हणजे मी या पोर्टल शी एकदम सुरुवातीपासून जोडल्या गेली आहे आणि आमची ही साथ संगत आजपर्यंत केवळ कायमच नसून ती दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालली आहे.

सुरुवातीपासूनच या पोर्टल चे स्वरूप आगळेवेगळे राहिले आहे. या वेबपोर्टलवर इतर दैनिकात, टीव्ही आणि वेब पोर्टल वर असतात, तशा दैनंदिन राजकीय बातम्या गुन्हेगारी बातम्या, निंदा नालस्ती करणारा मजकूर नसतो. तर या वेब पोर्टलवर जगात काय चांगले घडत आहे ते लोकांसमोर ठेवण्याचा श्री. देवेंद्र भुजबळ व सौ. अलका भुजबळ या संपादक दाम्पत्याचा प्रयत्न असतो.

थोर पुरूषांवरील, संतांवरील, लेख, साहित्य, संगीत संमेलने, स्त्रियांची कर्तबगारी, नव्या दृष्टिकोनातून पाहिलेले जगातील सुंदर देश, मराठी गीतांचे रसग्रहण, विकास, पर्यावरण, आरोग्य, यश कथा, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती अशा विषयांवरील लेख हे रंगीत छायाचित्रांसह प्रकाशित होतात आणि वाचणाऱ्याला ऊर्जा देत असतात. त्यामुळे देशविदेशातील लेखक, कवी वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातलेच नाहीत तर महाराष्ट्र बाहेरचे आणि इतर देशातील अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, मोरोक्को, अबू धाबी अशा विविध देशातून लेखक या पोर्टलवर लिहीत असतात. तर कवी, कवयित्री कविता पाठवित असतात.

विशेष म्हणजे या अंकात कोणत्याही जाहिराती नसतात आणि कोणीही कोणत्याही मानधनाची अपेक्षा करत नाही. मुळात संपादकांना, निर्मात्यांना यातून आर्थिक प्राप्ती काही होत नाही. साहित्याची आवड आणि सकारात्मक गोष्टी करण्याची ऊर्जा हा एक समान धागा आहे. या धाग्यामुळे संपादक, लेखक हे सारे एकमेकांना कुटुंबाप्रमाणे धरून असतात. हे वेबपोर्टल आपल्या मोबाईलवर आल्यानंतर लिंकवरून ते दुसऱ्या देशातील मित्रमैत्रिणींना पाठवता येते. त्यामुळे समाज माध्यमाच्या दुनियेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने ‘न्यूज स्टोरी टुडे’ स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

देवेंद्र भुजबळ हे मुळातच माहिती खाते, दूरदर्शन आणि पत्रकारितेत होते. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी ओळखी आहेत. ‘न्यूज स्टोरी टुडे’ वर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निवृत्त विभाग प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. किरण ठाकूर, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमामुळे भारतभर प्रसिद्ध झालेले प्रा विसुभाऊ बापट, निवृत्त डीवायएसपी सुनीता नाशिककर, असे दिग्गज लोक लिहीतच असतात. परंतु त्याचबरोबर संपादकांनी अनेक नव्या लोकांना लिहिते केले आहे. कवी विकास भावे यांनी मराठी गीतांचे रसग्रहण लिहिणे सूरू केले आणि ते लोकप्रिय झाले. या लेखमालेचे पोर्टलवर शंभर भाग पूर्ण झाले.

देवेंद्र भुजबळ यांनी अधिकारी झालेल्या व्यक्तींचा संघर्ष जाणून तसेच त्यांच्या कार्याची माहिती गौरवून ‘आम्ही अधिकारी झालो’ ही लेखमाला या वेबपोर्टलवर चालवली.
सौ. वर्षा भाबल या गृहिणीला अलकाताईंनी तिच्या स्वतःच्याच जीवनातील संघर्ष आणि यशावर लिहायला सांगितले. त्याचे सदोतीस भाग प्रकाशित झाल्यावर ‘न्यूज स्टोरी टुडे’ पब्लिकेशनतर्फे संपादकांनी त्याचे पुस्तकच केले.

सौ. रश्मी हेडे यांनी या पोर्टलवर लिहिलेल्या पस्तीस यश कथा “समाजभूषण” म्हणून पुस्तक रुपात आल्या.

डॉ. भास्कर धाटावकर यांनी ‘माझी कॅनडा व अमेरिका सफर’ अशी लेखमाला लिहिली. त्याचे ‘चैतन्य प्रकाशन’ने पुस्तक प्रकाशित केले.

मी स्वतः अनेक देशांतील मराठी शाळांवर संशोधन करून त्याबद्दल या वेबपोर्टलवर लेख लिहीत होते. त्यातील लेख आणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील लेख असे मिळून माझेही ‘मराठी सातासमुद्रापार’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले.

‘न्यूज स्टोरी टुडे’ हे वेबपोर्टल नव्वद देशात वाचले जात असल्याने आणि वेबपोर्टलवर लेखांबद्दल प्रतिक्रिया देण्याची सोय असल्याने आणि ज्यांना पोर्टल वर प्रतिक्रिया देता येत नाही किंवा तशी ती न देता व्हॉट्स ॲपवरच प्रतिक्रिया देतात, त्या शक्यतो दर सोमवारी “वाचक लिहितात” या सदरात प्रसिध्द करण्यात येतात. त्यामुळे मला स्वतःला अनेक देशातील वाचकांशी संपर्क साधता आला. अनेक देशांमध्ये माझी मित्रमंडळे तयार झाली व तेथील मराठी संबंधित उपक्रमांची माहिती जाणून घेता आली. मग त्यावर मी जे लेख लिहिले त्याचे ‘उद्वेली प्रकाशन’ने ‘मराठी इथेही, मराठी तिथेही’ असे किंडल बुक प्रकाशित केले.

वेबपोर्टलवर लिहिणाऱ्या लेखकांच्या भेटी घडवून आणण्यासाठी संपादकांच्या पुढाकाराने स्नेहमिलने होत असतात. या स्नेहमिलनात लेखक मंडळी एकमेकांच्या अनुभवाचा, विचारांचा लाभ घेतात. आत्तापर्यंत पुणे येथे प्रा. डॉ. किरण ठाकूर यांच्याकडे, तर सातारा येथे लेखिका रश्मी हेडे यांच्याकडे आणि न्यू जर्सीमध्ये डॉ. सुलोचना गवांदे यांच्याकडे विरार येथील बालरोग तज्ञ डॉ हेमंत जोशी, नवी मुंबईत खुद्द देवेंद्र भुजबळ यांच्या घरी, लातूर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निवासस्थानी हे स्नेहमिलन झाले. नाशिक आणि संगमनेर येथेही स्नेहमिलन झाले.

‘न्यूज स्टोरी टुडे’चा तिसरा वाढदिवस आमच्या रहात्या घरी, ठाण्याला साजरा झाला. त्यावेळी ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ आणि अलका भुजबळ, ‘ठाणे वैभव’चे संपादक माननीय मिलिंद बल्लाळ, दूरदर्शनचे नितीन केळकर, आकाशवाणीचे भूपेंद्र मिस्त्री,लेखिका- निवेदिका वासंती वर्तक, न्यू जर्सीच्या डॉ. सुलोचना गवांदे, डॉ. अंजूषा पाटील, डॉ. मीना बर्दापूरकर, लेखिका प्रतिभा चांदुरकर आणि अस्मिता चौधरी, प्रकाशिका ज्योती कपिले, कवयित्री नेहा हजारे, दातांचे ज्येष्ठ डॉक्टर उल्हास वाघ, जिल्हा माहिती अधिकारी तथा एकपात्री कलाकार श्री. मनोज सानप यांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

वेब पोर्टलच्या लेखांमधून कधी अगदी अपरिचित असा प्रदेश किंवा कार्य समोर येते. डॉ. राणी खेडीकर यांनी लिहिलेली ‘लाल बत्ती’ ही लेखमाला वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांबद्दल होती.
ती वाचून मला त्या मुलांबद्दल कणव निर्माण झाली. काही दिवसातच पुण्याला नाना वाडा येथे सुरू असलेल्या अशा मुलांसाठीच्या शाळेला मी भेट दिली. त्या मुलांसमोर आम्ही बाल कविता, कथा सादर केल्या. ती मुले अतिशय हुशार वाटली आणि कार्यक्रमात रंगून गेली होती. या कार्यक्रमाला डॉ. राणी खेडीकर उपस्थित राहिल्या आणि आमच्याशी त्यांनी छान संवाद साधला. ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टलमुळे असा अविस्मरणीय, वेगळा दिवस आयुष्यात आला !

मेघना साने

— लेखन : मेघना साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान लेख अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🌹
    -दीपक म कांबळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments