न्यूज स्टोरी पोर्टलने मला काय दिले ? याचे उत्तर मी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलला काय दिले ? यात मिळेल. या पोर्टलवर मला “हलकं फुलकं” या सदरात लिहिते केले ते मा. श्री देवेंद्र भुजबळ साहेबांनी. माहिती खात्यात ते माझे वरिष्ठ होते. त्यामुळे त्यांनी अधिकारवाणीने सुरुवातीला माझ्याकडून वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझा “पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके” हा लेख मागून घेतला आणि पोर्टलवर प्रसिद्ध केला.
आपले लिखाण प्रसिध्द झाले की लेखकाला अवर्णनीय आनंद होत असतो. तो आनंद मला या पोर्टलने भरभरुन दिला. “हलकं फुलकं” या सदरात “माझे डुलकी”, “काम टाळण्याची कला”, “खिडकी”, “मिशी”, “प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे”, “हसतील त्याचे दात दिसतील”, “नवीन चष्मा”, “नवे वर्ष नवे संकल्प”, “वाढदिवस”, “एप्रिल फूल” इ.खुशखुशीत विनोदी लेख प्रसिध्द झाले. मला कोणी हसताना वा विनोद करताना पाहिले नसेल. पण या लेखांच्या माध्यमातून वाचकांना हसवता हसवता मलाही लेख लिहिता लिहिता हसण्याची संधी मिळाली. आपले लेख या माध्यमातून जगभरात वाचले जातात हे समाधान अतिशय मोठे आहे.
आॅस्ट्रेलियातील एका लेखिकेने एक लेख वाचून इतर लेख वाचण्याची इच्छा प्रकट केली होती. हे केवळ या पोर्टलमुळेच होऊ शकले. प्रत्येक लेखावर वाचकांचा प्रतिसादही अनुभवता आला. आस्थापना /प्रशासन सारख्या रुक्ष वातावरणात साहित्याचा अंकूर नकळत रुजवण्यात या पोर्टलचा हातभार आहे.
“लिहिते व्हा” या साठी अनेकांकडे पाठपुरावा करण्याचा मा श्री देवेंद्र भुजबळ साहेबांचा स्वभाव आहे. “माहितीतील आठवणी” या मालिकेतील अनेक लेखकांचे लेख याचे उदाहरण आहे. श्रीमती वीणा गावडे यांनी अनेक मा. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यांनाही त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करावेत म्हणून विनंती केली. या पोर्टलवरील सदरांचे वैविध्य आकर्षक आहे. मा. श्री सुधाकर तोरणे, माजी संचालक (माहिती) यांचे “मी वाचलेले पुस्तक” हे सदर तर अतिशय वाचनीय व माहितीपूर्ण असते. हे पोर्टल एक व्यासपीठ आहे. दर्जेदार लिखाणाचे या पोर्टलवर नेहमीच स्वागत होत आले आहे.
साधारण एक वर्षांपूर्वी एक सदर “दुर्मीळ पुस्तके” असे परिचयात्मक असावे अशी कल्पना सुचली होती. त्या कल्पनेचे मा. श्री देवेंद्र भुजबळ साहेबांनी स्वागत केले. या मालिकेत मागे वळून पाहिले तर नाही नाही म्हणता ३९ भाग लिहून झाले व ते प्रसिद्ध झाले याबद्दल अतिशय समाधान वाटते. या पोर्टलवर माझा पहिला लेख” हवेतील मनोरे” या श्री ग. खं पवार यांच्या लघुनिबंध संग्रहाबद्दल दिनांक २८/४/२०२३ रोजी प्रसिद्ध झाला. त्यानंतर दर शुक्रवारी एक याप्रमाणे सलग ३९ भाग आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. दुधाची घागर, एकले बीज, आलोक, खुणेची पाने, गजरा मोतियाचा, वेचलेले क्षण, स्वाधीन की दैवाधीन, पारिजात, गारगोट्या, गुलाबी आयाळीचा घोडा, तृणपुष्पे, कागदी होड्या, पाण्यातले दिवस, आनंद सोपान, मृगाजिन, बालपण, मनाची मुशाफिरी, दाही दिशा, माझी विद्यापीठे, घुमटावरले पारवे, कथाशिल्प, रातराणी, खिरापत, काकांचे स्वप्न, वेळी-अवेळी, मन्वन्तर वाचनमाला, दीपकळी, मोळी, शर्यत, उघडे लिफाफे, श्वेतरात्री, पानदान, निबंध सुगंध, सुरंगीची वेणी व इतर कथा, महाश्वेता, भांगतुरा, चोरलेल्या चवल्या व पूर्वस्मृति ! दुर्मीळ पुस्तकांची ही खरे तर न संपणारी मालिका आहे.
माझ्या या मालिकेतील लेख दै जनादेश, ठाणे व दै. आपला महाराष्ट्र, अहमदनगर या वृत्तपत्रांनी मागवून घेतले आणि आता ते दर रविवारी प्रसिद्ध होत आहेत. काही वाचकांनी विशेषतः जळगाव, अहमदनगर भागातील वाचकांनी ही मालिका ते नियमित वाचत असल्याचे व त्यातील काही पुस्तकांचा परिचय वाचताना त्यांना भूतकाळात गेल्यासारखे वाटत असल्याचे व केवळ या मालिकेमुळे दर रविवारी ते तो पेपर घेत असल्याचे कळवले आहे. एका वयस्क लेखकाने मला त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके पाठवण्याची त्यांची इच्छा असल्याचे कळवले आहे. तर हे केवळ या पोर्टलमुळेच शक्य झाले.
क्रमशः मालिकेत लेख लिहिताना मला टंकलेखनाचा सराव झाला. लेख देण्याची कालमर्यादा पाळणे, शब्दसंख्येची मर्यादा पाळणे इ. कौशल्ये अगदी नकळत विकसित झाली. दुर्मीळ पुस्तके जमवणं हा छंद होताच पण लेख लिहिण्यासाठी ती इत्यंभूत वाचण्याची सवयही जडली. हे सांगण्याचे कारण माझ्यासारखे दुर्मीळ पुस्तके गोळा करणारे अनेक आहेत पण ते ती पुस्तके वाचत नाही किंवा त्यांना तेवढा वेळच मिळत नाही. सगळा वेळ अशी पुस्तके गोळा करण्यातच जातो.
हलकं फुलकं सारखे सदर लिहितांना आपल्यातील विनोदबुद्धीचा शोध लागला. ती सुप्त शक्ती या पोर्टलच्या माध्यमातून वाढीस लागली ही मोठी जमेची बाजू आहे.
सुरवातीला माझे लेख ढोबळ असायचे. ते वाचून त्यात काय असावे आणि काय नसावे याचे दिग्दर्शनसुध्दा मा. श्री भुजबळ साहेबांनी केले. सेवेत असताना ते मसुदा किती काळजीपूर्वक तपासायचे व त्यात किती दुरुस्ती करायचे ते मी अगदी जवळून पाहिले. यातूनच लिखाणाचा पोत सुधरत गेला आणि आज मी आत्मविश्वासपूर्वक लिहू शकतो हे या पोर्टलचे ऋण आहेत. या ऋणांची परतफेड नवनवीन लेख लिहूनच होऊ शकेल.
या पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि या पोर्टलची लोकप्रियता उत्तरोत्तर अशीच वाढीस लागो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा लिहिण्याचा संकल्प करुन अंमलशा वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया /अभिप्राय देण्याची संधी देतो. वाचकांनीही लिहिते व्हावे असे मला मनोमन वाटत असते. पण हे मनातल्या मनात राहू नये हीच वाचकांना विनंती आहे.
— लेखन : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800