पंचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणीत हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने “सफाई मित्र सुरक्षा” उपक्रमांतर्गत “उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार” नुकतेच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत व जबाबदार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहराची स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि कर्तव्यपरायणतेची दखल घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मधून सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता, शिस्त, वैयक्तिक स्वच्छता आणि व्यावसायिकतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाच्या वेळेत आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर, प्रशिक्षणांमध्ये सक्रिय सहभाग, आरोग्य तपासणी शिबिरांतील उपस्थिती, व्यसनमुक्त राहणे, तसेच शासकीय योजनांमध्ये नोंदणी या निकषांचा विचार करण्यात आला. याशिवाय कामातील प्रामाणिकता, वैयक्तिक स्वच्छता व शिस्त, तसेच स्वयं सहाय्यता बचत गटातील सहभाग आणि उत्पादन निर्मितीतील योगदान या बाबींनाही महत्त्व देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत फेब्रुवारी व मार्च २०२६ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शैलेंद्र चावरिया, गोपाल झांजोट, संजय विठ्ठल गायकवाड, संतोष सपकाळ, आकाश लोहरा आणि प्रल्हाद वैरागी यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व रेशन किट असे आहे.

या कार्यक्रमास पंचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, श्री. दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष श्री प्रकाश गोळे, आरोग्य सभापती
सौ. राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, सर्व नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक करत उपक्रमाची उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.
या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान होऊन त्यांच्यात अभिमानाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार असून, इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी घाटजाई शहर विकास आघाडीचे प्रमुख श्री. शेखर कासुर्डे यांनी हा उपक्रम स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे नमूद करत नागरिकांनी स्वच्छता उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे व “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन केले व घनकचरा व्यवस्थापनात हिलदारी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
