सुट्टी लागली की आपण सहसा राज्याबाहेरील पर्यटनस्थळे पाहण्याला प्राधान्य देतो… पण वनांनी समृद्ध अशा महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये वास करणाऱ्या विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते.
ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. आपल्या अशांत मनाला शांत करते. इथे रंगीबेरंगी फुलपाखरं आहेत, इथं आहे वनांचा राजा सिंह, इथे आहेत वाघोबा, इथे आहे गवा आणि हरणे, कधी अचानक दचकायला लावणारी तर कधी अचानक लक्ष वेधून घेणारी चित्रविचित्र हालचाल ही येथे आहे… शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचा एक सुंदर खजिना इथे आहे. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू… सगळंच कसं मनोहारी आहे… या सगळ्यांच्या जोडीला इथे आहेत चिवचिवाट करणारे असंख्य प्रकारचे पक्षी…
पर्यटनाच्यादृष्टीने महाराष्ट्रात काय पाहिजे असं जर कुणी विचारलं तर “जो जे वांछिल तो ते लाभो” असं भरभरून देणाऱ्या साऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रात आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकडे पाहून प्रत्येक वेळी नव्याने नतमस्तक व्हावेसे वाटते. पाऊस संपुन हिवाळा सुरू झाला की अनेकविध रंगांचे, आकारांचे, आवाजांचे हजारो पक्षी देशाच्याच नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून आपल्याकडे दाखल व्हायला सुरुवात होते.
कडाक्याच्या थंडीत शेकडो पक्षीप्रेमी त्यांचे कॅमेरे दुर्बीणी घेऊन पक्षीनिरिक्षणासाठी भटकण्याचे बेत आखायला लागतात. आपल्या “महाराष्ट्राचे भरतपुर “असा नावलौकिक प्राप्त असलेले असेच एक, किंचितसे दुर्लक्षित ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यामधिल निफाड तालुक्यामध्ये वसलेलं, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि वनविभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेलं “नांदूर मधमेश्वर” हे एक सुरेख पक्षी अभयारण्य.
एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच कडवा व गोदावरी नदीच्या संगमावर ब्रिटीशांनी मधमेश्वर धरणाची निर्मिती केली. १९८६ साली हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले. जवळपास १००.१२ चौ.कि.मी क्षेत्र असणारे तसेच संपन्न जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी नांदुरमधमेश्वर हे एक उत्कृष्ट असं स्थान आहे. हिवाळा सुरू होण्याची चाहूल लागायला लागली की या अभयारण्याचा परिसर फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यासारख्या विविधरंगी विदेशी पक्ष्यांच्या वास्तव्याने गजबजून जातो.
दाट धुक्याची चादर पांघरलेल्या मधमेश्वर जलाशयात विविध प्रकारच्या माश्यांची मेजवानी करणारे पक्षी पाहणं आणि बरोबरच्या कॅमेर्यामध्ये त्य़ांच्या छटा टिपण्यासाठी त्याचप्रमाणे एकमेकांना साद घालताना त्यांच्या किलबिलाटाची झलक अनुभवण हे अतिशय विलक्षण असते. काश्मीर सोबतच युरोप , श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान, रशिया या जगाच्या भागांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे परदेशी पाहुणे येथे दाखल होतात.
नांदुर मधमेश्वर परिसरामध्ये ग्रासलँड व वेटलॅड मिळून आतापर्यंत जवळपास २५० ते ३०० वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली गेली आहे. पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिलव्हर बिल, ग्रीन बिटर, लॅपविंग, ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शहेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमनटिल, पिग्मीगुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमनक्रेन, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक व्हाईट आय बीज, कोम डक, जिकाना, लेसर, व्हिललिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, नॉर्दन शाऊलर, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न या सारखे असंख्य पक्षी तसेच उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे आणि विविध प्रकारचे साप आढळून येतात.
मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा… ध्यानस्थ साधूसारखा उथळ पाण्यात उभा असलेला राखी बगळा… एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.
गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मधमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले असून धरणाच्या खालच्या बाजूला नदी पात्रातील खडकावर नांदूर मधमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. धरणातील जलाशयाचे पाणी दोन्ही बाजूने कालव्याद्वारे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात आलेले आहे. जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे.
या अभयारण्यात टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस, गुज, पेलिकन, गॉडविट, सॅण्ड पायपर, क्रेक, श्यांक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल यासारखे स्थलांतरित पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पाणकोंबडी, मुग्ध बलाक, गायबगळे, मध्यम बगळे, खंड्या आयबीस, स्टॉर्क यासारखे पक्षीही दिसून येतात. जलाशयाजवळ असणार्या गवताळ कुरणांमध्ये तसेच आसपास मोठ्या प्रमाणात असणार्या वृक्ष संपदेने अनेक जातीच्या लहान मोठ्या स्थानिक-स्थलांतरित पक्षांचावावर इथे दिसून येतो. पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर कुट यासारखे पक्षीही येथे आढळतात.
चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे हे विविध आकाराचे पक्षी या अभयारण्यात सहजतेने आपल्याला पहायला मिळतात. गोदावरीचा रम्य परिसर, हिरवीगार वनराई, दूरवर पसरलेला जलाशय आणि देश-विदेशातील पक्षी निरीक्षणाचा अभूतपूर्व आनंद यामुळे हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवनच ठरले आहे.
मुळात रामायण कालीन दंडकारण्याचा भाग असणार्या नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये असणार्या मंदिरांनी या क्षेत्राला अधिकच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नदीच्या काठावरील मधमेश्वर मंदिराचा उल्लेख हिंदू पुराणातही आढळतो.
सप्टेंबर ते मार्च हा या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. नाशिक-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर ४० कि.मी. चे आहे. नाशिक चांदोरी फाटा- सायखेडा-शिंगवेमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी व खाणगावथडी निसर्ग निर्वचन केंद्रात जाता येते. निफाड-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर केवळ १२ कि.मी. चे आहे. निफाड-दिंडोरी तास-नांदूर मधमेश्वरमार्गे खाणगावथडी निसर्ग केंद्र आणि चापडगाव निरीक्षण गॅलरीला जाता येते.
हिरवाईने नटलेल्या परिसरात आवश्यक साधने घेऊन मुक्तपणे भटकायचे, निसर्ग, वनस्पती व पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करायचे, जलाशयावरून येणारा थंडगार वारा अंगावर झेलायचा … थकवा जाणवला तर तिथेच झाडाखाली पक्षांच्या किलबिलाटात विश्रांती घ्यायची.. असा मनस्वी आणि मनमुराद आनंद देणारं हे अभयारण्य एकदा तरी पहायला हवं असं आहे.
सिन्नर-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर २५ कि.मी. चे आहे. सिन्नर-बारगाव पिंप्री, मांजरगावमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी आणि खाणगावथडी निसर्ग केंद्राला भेट देता येते.
डॉ.सलिम अली यांनीही भेट देऊन गौरविलेल्या या पक्षीतीर्थाची सफर अगदी आवर्जून करावी अशीच आहे. अतिशय कमी खर्चातली ही सफर वन्य अधिवास सफर घडविणार्या वाईल्ड हॅबिटाट जर्निज सोबत आपण करू शकतो.
चला तर मग, नाशिक जिल्ह्यामधल्या या अनोख्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या एका वेगळ्या अनुभुती देणार्या ठिकाणाच्या सफरीसाठी आपण सज्ज होऊयात.
– लेखन : नितात खं. राऊत.
वाईल्ड हॅबिटाट जर्निज
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
खुपच रम्य पर्यटनस्थळ आहे विविध प्रकारच्या पक्षाचे योग्य ठिकाण आहे