नमस्कार मंडळी, सौ अनुराधा जोगदेव यांचे न्यूज स्टोरी टुडे मध्ये स्वागत आहे.
या गृहिणी असून, संगीत अलंकार उत्तीर्ण आहेत. त्यांना लेखनाची व ज्योतिष विषयाची आवड आहे. हस्ताक्षरावरून मनोविश्लेषण या विषयावर त्यांचे लेखन आहे. शिवाय त्या प्रोफेशनल आर्टिस्ट (पोर्ट्रेट) आहेत…..
आपण आपल्या आजूबाजूला डोळसपणाने पाहिले तर आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येक माणूस आपल्या व्यस्त जीवनात विसाव्याचे 4 क्षण मिळविण्यासाठी धडपडत असतो.
कोणाला आपल्या सुट्टीच्या दिवशी स्वतःला सैल सोडावेसे वाटते, कोणाला वाटते की आपण एखाद्या सहलीला जावे, कोणाला वाटते की आपण एखाद्या कार्यक्रमाला जावे, तर कोणाला वाटते की आपण साहित्यात रमावे ! इतरांचे साहित्य समजून घ्यावे.
माणूस त्या त्या वेळी असे आनंदाचे क्षण शोधत असतो की जे त्याला पुन्हा नवी उमेद, नवी उमंग, नवी ताजगी, नवा उत्साह देऊन जातात आणि एखाद्या वेळी जर असा माणूस रसिक असेल, जीवनावर भरभरून प्रेम करणारा असेल, तर तो अगदी साध्या साध्या गोष्टीतून आपला आनंद शोधत असतो.
प्रत्येकाची स्वतःचा आनंद शोधायची पद्धत, शैली अगदी नाविन्यपूर्ण…अशा वेळी दुसरा माणूस आपले जीवन किती रसिकपणाने जगत आहे हे न्याहाळणे म्हणजे माझ्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणीच असते..
कोणी एखादा सायकलच्या आऱ्याला रंगीत मणी लावतो, कोणी बैलांच्या गळ्यात, तर कोणी उसाच्या रसाच्या मशीन ला घुंगरे बांधतो, कोणी बैलाची शिंगे रंगवितो, कोणी आपल्या पॉमेरियनला कुंकू लावतो, कोणी आपल्या ट्रकला प्लास्टिक ची फुले, काळ्या गोंड्यांचे घोस लावतो… याप्रकारे जीवन अधिक सुंदरतेने जगत असतो..ही यादी न संपणारी आहे…
कोणी रानवाटा शोधण्यासाठी बाहेर पडतो, कोणी पक्षांचे रंग टिपतो, मग कोणी देवासाठी फुले जरी आणली तरी तो ती छान परडीत आणतो. नक्षीदार तबकात ठेवतो. एखादी ‘ती’, तांब्याची, चांदीची ताम्हने रोजच्या रोज घासून पुसून अगदी लकलकीत ठेवते.. कोणी छान छान पुष्परचना करते, कोणी एखादी ‘ती’ आपला हॉल, बेडरूम छान सजविते.. जणू एखादे कलादालनच !
असे हे सर्व आनंदाचे पाइकच…. असे हे सर्व आनंदयात्री… असे आनंदयात्री दुसऱ्यांना आनंद शोधण्याचे जणू ‘डोळेच पुरवित असतात..’
अशा लोकांच्या भावना अगदी दाट पणाने आतून उमललेल्या, गायकांच्या तानांप्रमाणे उत्तरोत्तर रंगणाऱ्या..
निसर्गही या रसिकतेत, आनंदाच्या यात्रेत तितकाच सहभागी असतो हे नक्कीच ! एखादा गुलमोहोर आपल्या वाटेवर छान लालसर, केशरी गर्द फुलांचा सडा शिंपितो, त्याच्या विस्तीर्ण हृदयाने आपले स्वागत करतो.. तर कधी छान काळीभोर जांभळे आपल्या फिरायच्या वाटेवर आपली वाट पाहात बसलेली असतात… कधी काही गॅलऱ्या विविधरंगी पाना फुलांच्या कुंड्यांनी नटलेल्या असतात..
बकुळ, प्राजक्त, बुचासारखी फुले जणू काही आपल्यासारख्यांच्या आनंदासाठीच फुललेली असतात… मोगऱ्याचा, अनंताचा सुवास जणू आपल्यासाठीच असतो..
निसर्गानेच लावलेल्या या जणू उदबत्त्या आहेत, आपण फक्त त्यांचा गंध हुंगायचा.. मनभरून..
कधी निसर्गासारखा रसिक रंगपंचमीही खेळतो.. आकाशात छान इंद्रधनुष्य उमटतं.. कधी आकाशातील काळे ढग, पांढरे ढग आकाशात छान आकृत्या निर्माण करतात.., वेगवेगळी नक्षी रेखाटतात..
मग अमावस्या जरी आली तरी ती काळी रात्र न वाटता मला असे वाटते की ती परमेश्वरानेच चांदण्या रात्रीला लावलेली काळी तीट आहे !…
सगळीकडे काव्य..सगळीकडे सौंदर्यच सौंदर्य. . सगळीकडेच आनंदाची पखरण.. सगळीकडेच आनंदाचे उधाण… सगळीकडेच आनंदाचे उधाण…मात्र यासाठी आपली मनोभूमिका तशी हवी !

– लेखन : सौ. अनुराधा जोगदेव
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800