लावण्यांना हा शाप असतो का,
बुरख्यामध्ये दडून राहण्याचा
धर्म कोणताही असो,
सौंदर्याला आधार नेहमीच पडद्याचा
स्त्रीने नेहमीच दबून राहावे,
नमून राहावे,पुरुषी समाजामध्ये
हीच व्यवस्था केली पुरुषांनी,
हिंदुस्थानातही मध्ययुगामध्ये
कोठे घुंगट, कोठे पडदा,
कोठे सौंदर्य पदराखाली झाकले
रणरागिणी होती स्त्री जी,
शौर्याला आच्छादनात दाबले
युग बदलले, काळ बदलला,
वावरते स्त्री आज प्रगत जगात
तरीही लेक घराबाहेर पडताना,
माय करे काळजी घरात
सौंदर्याला दृष्ट न लागो,
नजर न पडो कोणा दुष्टाची मार्गात
भेदरलेली हरणी जणू ती,
चेहरा घेई झाकून रस्त्यात
नव्या युगाची आधुनिक तरुणी,
काय स्त्रीत्व तिचे हे शाप असे ?
नजर बोलकी, भेदक डोळे,
सौंदर्याला अभिशाप ठरती कसे ?
हे नारी, तू बदल आता,
फाडून टाक बुरखा समाजाचा
चिणून टाक मार्गातील बंधने,
घे खंजीर हाती शौर्याचा
रूप-रंग देणगी ईश्वरी,
त्यात तुझे काय कर्तृत्व दिसे ?
कर जागृत धमक तुझ्या मधली,
नको लपवू तुझे हे स्त्रीत्व
— रचना : सौ. मृदुला राजे. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800