लहानपणी आम्ही मावशीच्या गावी जात असु. १५ दिवस मस्त कौलारू घरात राहणं, स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरणं अगदी धमाल असे.
मावशीच्या परसदारी वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या असत. मिरच्या, वांगी, पडवळ वगैरे. काही लागलं की बाहेर जाऊन तोडून आणायचं. मला फार गंमत वाटायची.
एकदा पडवळ तोडताना, एक पडवळ तोडणार तेवढ्यात तिने सांगितलं, “अहं, ते नाही तोडायचं ते बियाण्यासाठी ठेवलय.”
असंच प्रत्येक झाडावर कुठे टोमॅटो, कुठे वांगं, पडवळ असं राखून ठेवलेलं असायचं. झाडावरचं पूर्ण पिकुन वाळू द्यायचं आणि मग पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी सुरक्षित ठेवुन द्यायचं. लहानपणी फक्त बियाण्यासाठी एवढेच लक्षात राहीले परंतु आता विचार केला तर कितीतरी गोष्टी जाणवतात.
या भाजींच्या पोटी बीज जरी असलं तरी ते काढण्याची घाई न करता त्याला पूर्ण पक्व होऊ द्यायचं व नंतरच त्याचा निर्मितीसाठी वापर करायचा.
हाच निकष आपण इतर ठिकाणी का बरं नाही लावत ? साहित्यात सुद्धा एखादं बीज स्फुरलं रे स्फुरलं की कागदावर उतरवण्याची घाई ! मग त्या बीजाला खतपाणी घालून, नैसर्गिक रित्या फुलु देऊन परिपक्वता साधली की जी निर्मिती होईल ती सुंदरच नसेल का ? पण एवढा वेळ आणि मुख्य म्हणजे संयम कोणाजवळ आहे.
बियाण्याच्या फळाला नैसर्गिक हवा पाण्यात छान पिकू दिलं तरच पुढच्या वर्षीची भाजी उत्तम येणार हे मनात पक्क असल्याने तिथे थांबण्याची सवय आहे. आणि ती भाजी आपल्या साठीच आहे त्यामुळे कुठेही स्पर्धा नाही. मग थांबणं आपोआप शक्य होतं. पण तिथे जसं आपलं बी चांगलं निपजावं, त्यामध्ये पूर्ण निर्मिती क्षमता यावी यासाठी जो संयम आपण दाखवतो तोच इतर बाबतीत अंगवळणी पाडून घेतला तर कितीतरी दर्जेदार कलाकृती निर्माण होतील ?
नात्याचही तसंच नाही का ? अनुभवानेच तर ते परिपक्व होतं. मैत्रीतही तेच. ते ही एक प्रकारचं नातचं ना ?
कोणतीही गोष्ट परिपक्व व्हायला आपण तितका वेळ देत नाही. एखादा अमुक अमुक वागला की आपण लगेच निकषाची फुटपट्टी लावतो. पण त्या व्यक्तीबरोबरचे अनुभव पक्व व्हायला वेळच कुठे देतो ?
एखाद्या प्रेक्षणिय स्थळाच्या ठिकाणी किंवा देवदर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहतो. का ?
कारण आपल्याला उत्कृष्ठ परिणाम बघायला मिळणार आहे याची खात्री असते. मग आपल्याच अंतरातील बीजांना मंथनाचं खतपाणी दिलं, सृजनाचा वारा घातला, भले वेळ जाईल पण बिघडलं कुठे ? स्पर्धा स्वत:शीच ठेवली तर हा प्रवास सोपा होईल आणि मग जी कलाकृती निर्माण होईल ती आत्मिक समाधान मिळवून देईल हे निश्चित.
आजकालच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात हे थोडं कठीण आहे पण परिपक्वतेची मुळे आपल्या मनात जर घट्ट असतील तर काही फरक पडत नाही. लक्ष फक्त निर्मिती क्षमतेकडे वळवलं की सगळं चित्र स्पष्ट दिसू लागेल.
वळणे येतीलच ती तर जीवनाचा स्थायी भाग आहेत. पण आपण किती अटळ राहतो हे आपल्या हातात आहे. आपल्या मनाची बैठक किती पक्की आहे हे मधुनमधुन चाचपडलं की बरचसं सगळं सुसह्य होतं. मात्र त्यासाठी स्वत:ची मुल्य आधी तपासुन, घासूनपुसून लख्ख करत रहायला हवी.
देवानंदच्या एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे, “कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे” ते तर होणारचं पण आपण स्वत:ला पक्व व्हायची संधी देतोय का ? हा विचार मनात असला तर काही घाबरण्याचं कारण नाही. आपलं मन आपल्या सोबत असेल तर मग दुसरं काय हवं ? तन आणि धन असतंच मन त्याबरोबर नसतं म्हणुनचं सगळं फिसकटतं.
तर सर्वप्रथम परिपक्वता साधण्याची आस हवी. नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे, एका भांडणानंतर परत कधी तोंड न बघणारे पायलीला पन्नास सापडतील.
या सर्वांपेक्षा वेगळं काही करायचं असेल तर मनातील मुल्य, संयम, जबाबदारी, स्वत:शीच स्पर्धा हे मात्र अंगिकारलं पाहिजे. कुठेतरी श्रद्धा ही जोडलेली असली पाहीजे, कारण श्रद्धा बऱ्या वाईट प्रत्येक प्रसंगात बळ देते. हे सर्व असेल तर मग उत्कृष्ठ निर्मितीचा क्षण आपल्यापासुन दूर नाही हे नक्की !

– लेखन: शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
खरंय, वाट बघायला लागणारी चिकाटी आता दिसेनाशी होत चालली आहे. छान, विचारप्रवर्तक लेख. धन्यवाद
पण वाट कोण पाहील ?
खुपच छान वाचनीय ,विचार करायला लावणारा लेख .
धन्यवाद ओघवते लिखाणाबद्दल.
very meaningful, really we should also start thinking and practicing this method.