- पत्रकारांनी तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल स्वीकारले पाहिजे पण पत्रकारितेचा धर्म विसरता कामा नये, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारदिन आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रमात महनीय वक्ते म्हणून बोलताना जेष्ठ संपादक, साहित्यिक महावीर जोंधळे यांनी काल केले.
सुरुवातीलाच आपल्याला पत्रकारितेत यायचे असल्याने घरून पळून येऊन मुंबई कशी गाठली, आचार्य अत्रे ह्यांनी पुरवणी संपादनाची जबाबदारी कशी सोपविली, या बद्दल त्यांचे तसेच काहीही संबंध नसताना सुरुवातीच्या काळात सहारा दिला ते जेष्ठ पत्रकार सर्वश्री आत्माराम परब आणि वसंत सोपारे यांचे ऋण व्यक्त केले.
पत्रकारांनी सत्याचा आग्रह धरल्यास लोकं त्यांच्या मागे निश्चितपणे उभे राहतात, तसेच पत्रकारांनी लेखणीशी प्रामाणिक राहिले पाहिजे असे सांगून त्यांनी आज पत्रकारितेला वाळवी ने पोखरले आहे, याबद्दल खेद व्यक्त केला. प्रत्येक पत्रकाराने भारतीय राज्य घटना आणि घटनेतील प्रत्येक कलम अभ्यासलेच पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकारितेतील विविध घटना, प्रसंग, आठवणी ही त्यांनी यावेळी तळमळीने सांगितल्या.
तसेच पत्रकारितेच्या खडतर व्यवसायात पत्नीने जी साथ दिली, त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. यावेळी त्यांनी त्यांच्या वतीने पत्रकार संघासाठी रुपये १० हजार देणगी म्हणून देत असल्याचेही जाहीर केले.
प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून पत्रकार संघाच्या वाटचालीची माहिती दिली. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख विश्वस्त राही भिडे यांनी करून दिली.श्री राजेंद्र हूंजे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन श्री महावीर जोंधळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एक पुरस्कार विजेते, पत्रकार श्री पांडुरंग म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना, पत्रकारितेत ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानून पुरस्काराची रक्कम पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या जेष्ठ पत्रकार सदस्यांना देण्यात येणाऱ्या मानधन निधीस देत असल्याची घोषणा केली.
याच कार्यक्रमात पत्रकार संघाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास जेष्ठ तसेच विविध पत्रकार, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800