दर्पण म्हणजे आरसा !!! आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ नावाचं नियतकालिक सुरु केलं. त्यामुळे मराठी पत्रसृष्टीचे जनक आणि या मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राची आठवण म्हणून प्रत्येक 6 जानेवारीला मराठी वृत्तपत्रसृष्टी ‘पत्रकार दिन’ साजरी करीत असते. याच दिवशी आहुति साप्ताहिकाचा वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्यात येतो.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे अल्पायुषी ठरले. केवळ 33 वर्षे जगलेल्या बाळशास्त्रींनी मराठी वृत्तपत्रसृष्टी, साहित्य यांना फार मोठे योगदान उपलब्ध करुन दिले आहे. त्यांच्या जीवन चरित्रावर लिहायचे झाल्यास लेखांची मालिका किंबहुना ग्रंथही अपुरे पडतील. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि भगवान श्रीकृष्णाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वांना उपलब्ध करुन दिले. 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांनाही ज्ञानेश्वरांसमोर नतमस्तक व्हावे लागले. त्यामुळे प्रगल्भ बुद्धीमत्तेला वयाचे कोणतेही बंधन नाही. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेली मराठी पत्रकारिता आज माहिती तंत्रज्ञानाच्या अवकाशात भरारी घेत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठी पत्रकारितेला भरीव योगदान दिले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचेही नेतृत्व लोकमान्यांनी केले. भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचेही मराठी पत्रकारितेला योगदान मिळाले आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात वृत्तांकन करणारे दिनू रणदिवे, मधु शेट्ये हे अखेरपर्यंत मार्गदर्शन करीत होते. मराठी पत्रकारितेत योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या तसबिरी आजही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात गेलो तर आपल्याशी बोलू शकतील. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, मार्मिक-सामनाकार बाळासाहेब ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ते निळूभाऊ खाडिलकर अशी असंख्य नावे मराठी पत्रकारिता म्हटले की आपल्या ओठांवर येतात. वृत्तपत्र आणि व्यंगचित्र ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आपण पाहतो. बाळासाहेब ठाकरे यांचे एक व्यंगचित्र पानभरुन प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरांच्या तोलामोलाचे आहे.
मराठी माणसाने हिंदी व इंग्रजी पत्रकारिता समृद्ध केल्याचेही आपल्या पाहण्यात आहे. दर्पण सुरु करुन मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे कोकणातील पोंभूर्ल्याचे जसे आचार्य बाळशास्त्री जांभेकर तद्वतच कोकणातील पराड गावचे बाबूराव पराडकर यांनी उत्तर भारतात सुरु केलेले ‘आज’ हे दैनिक आजही खपांचे विक्रम तोडणारे आहे. भारतकुमार राऊत, कुमार केतकर, दिनकर रायकर, दिलीप चावरे, वैजयंती कुलकर्णी-आपटे यांच्यासारख्या अनेकांनी इंग्रजी पत्रकारिता समृद्ध करीत मराठीत पदार्पण केले व तेही यशस्वी ठरले. आजही संजय जोग, सुधीर ब्रह्मे, रक्षित सोनावणे, सुरेंद्र गांगण, किरण तारे, प्रमोद चुंचूवार यांच्या पासून विनया देशपांडे पंडित, पांडुरंग म्हस्के, प्रफुल्ल मार्पकवार, संजीव शिवडेकर, विवेक भावसार अशी अनेक इंग्रजी पत्रसृष्टीतील मराठीतली आघाडीची नावे आहेत. नावे अनेक आहेत पण ती यादी हाच एक लेख होऊ शकतो. असो…!
आज पत्रकारिता, मराठी पत्रकारिता ही सतीचे वाण म्हणून खऱ्या अर्थाने चालवण्याची गरज आहे. आज खरेच आपण जांभेकर, टिळक, आगरकर ही नावे घेऊ शकतो की ? आपली पात्रता आहे का ? पत्रकारिता धर्म म्हणून चालवली पाहिजे. धंदा होता कामा नये. वृत्तपत्रातून अग्रलेखाचे पान किती मागे गेले आहे ? वृत्तपत्रात व्यंगचित्राला स्थान काय आहे ? कोणाचेही नाव घेत नाही पण आता ॲडव्हर्टाइज आणि एडिटोरीयल म्हणजेच जाहिरात आणि अग्रलेख यांचे संकरीत नाव ‘ॲडव्हर्टोरियल’ झाले आहे. कितीही नाके मुरडली तरी ‘पेडन्यूज’ घेत नाही असं छातीठोकपणे कोण सांगू शकतो ? इलेक्ट्रॉनिक मीडिया आज जोरात असला तरी वृत्तपत्रांची अजूनही दिमाखात वाटचाल सुरु आहे आणि ती अविरत सुरु राहील. अर्थात यासाठी वाचनाची आवड वाढवणे गरजेचे आहे.
मराठी पत्रकारिता शुद्ध व स्वच्छपणे पुढे चालली पाहिजे. प्रामाणिक व पारदर्शकपणे चालवली पाहिजे. राजकीय पक्षांची वृत्तपत्रे वेगळी आणि तटस्थपणे वाटचाल करणारी वृत्तपत्रे वेगळी आहेत. प्रत्येकजण आपापला विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण मतभेद असले तरी मनभेद नसावेत. निर्भिडपणे पत्रकारिता पुढे नेली पाहिजे. आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या बातमीदाराकडून, विशेष प्रतिनिधीकडून असेच राहिले पाहिजे. ‘आत्ताच हाती आलेल्या पाकिटावरुन’ असे होता कामा नये. अजूनही लोकांना बातमी आणि जाहिरात यातला फरक समजावून सांगण्याची गरज आहे. ‘अहो, ही बातमी द्यायची आहे, त्याला किती पैसे लागतील ?’ असं भोळसरपणे विचारणारे कमी नाहीत. लोकांचं प्रबोधन आपण करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे. लोकांचे प्रबोधन करणाऱ्यांचीच प्रबोधन करण्याची वेळ येता कामा नये. समाजाच्या भावना सरकारसमोर मांडणारा आरसा म्हणजेच दर्पण आहे हे लक्षात असू देऊया. या आरशाला तडे जाता कामा नयेत, माध्यमांची विश्वासार्हता टिकली पाहिजे.
– लेखन : योगेश त्रिवेदी. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800