मराठीतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा सहा जानेवारी १८१२ हा जन्मदिवस, विशेष म्हणजे
६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील “दर्पण” हे पहिले वृत्तपत्र सुरु केले. त्यामुळेच ते मराठीतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. म्हणूनच महाराष्ट्रातील पत्रकार संघटना आणि महाराष्ट्र शासन सुद्धा ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात.
ज्यावेळी बाळशास्त्रींनी पत्रकारिता सुरू केली, त्यावेळी वृत्तपत्रे हेच बातम्या देणारे प्रमुख माध्यम होते. नंतरच्या काळात रेडिओ आले. मग हळूहळू दूरदर्शन आले आणि आता खाजगी रेडिओ वाहिन्या, खाजगी वृत्तवाहिन्या, खाजगी न्यूज पोर्टल्स, खाजगी युट्यूब वाहिन्या असे विविध माध्यमांचे प्रकार बातम्या देण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे आज या सर्व माध्यमांमध्ये वेगवेगळे पत्रकार देखील तयार झालेले आहेत. परिणामी आज पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे.

मात्र जी पत्रकारिता बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केली होती किंवा नंतरच्या काळात जी ध्येयनिष्ठ पत्रकारिता लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा प्रभृतींनी सुरू केली होती, ती पत्रकारिता आज शिल्लक राहिली आहे काय याचे उत्तर आज नकारार्थीच मिळते. त्याचबरोबर आज आपण पत्रकार दिन साजरा करत असताना या विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेला पत्रकार हा अगदी ‘दीन’ झाला आहे असे दिसून येते.
पत्रकार असा ‘दीन’ का आहे याची कारणे कधीतरी समोर यायलाच हवीत. करण वृत्तपत्र हा समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो, आणि पत्रकार हे या वृत्तपत्रांचे किंवा आजच्या वृत्त माध्यमांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. त्यामुळे ते जर दीन असले तर ते पत्रकारिता करणार कशी आणि मग समाजाच्या व्यथा लोकांसमोर मांडणार तरी कसे, हा देखील प्रश्न निर्माण होतो.
आधी सांगितल्यानुसार सुरुवातीच्या काळात पत्रकारिता ही एका ध्येयाने प्रेरित झालेली होती. त्यामुळे ते पत्रकार देखील कशाचीही पर्वा न करता “जो फूॅंके घर अपना” अशा भावनेतूनकाम करत असत. मात्र तरीही त्या पत्रकारांना पोट तर होतेच, त्यांना घरदार संसार देखील असायचाच. त्यासाठी पैसा हा लागायचाच. त्या काळात वृत्तपत्रांचे मालक जे काही तूटपुंजे मानधन द्यायचे, त्यात हे ध्येयनिष्ठ पत्रकार आपला घर संसार चालवायचे आणि ध्येयाला समर्पित अशी पत्रकारिता करायचे.
सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रे ही पत्रकारांनीच सुरू केलेली होती. त्यामुळे संपादकांच्या नावाने वृत्तपत्रे चालायची. नंतर मग उद्योगपतींनी देखील वृत्तपत्रे काढायला सुरुवात केली. तिथे त्यांचा फक्त नफा कमवणे हाच उद्देश असायचा. त्यामुळे पत्रकारांना अपुऱ्या वेतनावर पिळून घेणे, ध्येयनिष्ठ पत्रकारिता बाजूला ठेवून आपल्या सोयीनुसार पत्रकारिता करायला लावणे असे प्रकार सुरू झाले. त्याच काळात मग पत्रकार संघटित व्हायला सुरुवात झाली आणि त्यातून पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा देखील बनवला गेला.
मात्र त्या कायद्यात ज्या पत्रकारांना वृत्तपत्राने नियमित नोकरीवर ठेवले आहे, कामगार कायद्यानुसार त्यांचा भविष्य निर्वाह निधी कापला जातो आहे, त्यांना रीतसर नेमणुकीचे पत्र दिले गेले आहे, अशाच पत्रकारांना कामगार कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाऊ लागले. त्यांना योग्य असे वेतन मिळावे म्हणून सरकारने वेतन आयोग देखील नेमले होते. मात्र अनेक वृत्तपत्रांमध्ये कोणतेही नेमणूक पत्र न देता कामावर ठेवले जात होते आणि ज्या दिवशी मालकाची मर्जी फिरेल त्या दिवशी त्याला लाथ मारून घरी बसवले जात असे. मग त्यावर देखील उपाययोजना सुरू झाल्या. मात्र मालकांनी त्यातूनही पळवाटा काढल्या. विशेष म्हणजे ही मालकांची लॉबी चांगलीच सशक्त होती. ती सरकारवर दबाव टाकून आपल्या सोयीचे कायदे बनवून घेऊ लागली.
मधल्या काळात देशात उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यापासून तर परिस्थिती अधिकच बदलली. आता कोणत्याही वृत्तपत्रात पूर्वीसारखे नियमित पत्रकार कामावर ठेवलेच जात नाहीत तिथे संपादकापासून तर खालच्या मुद्रीत शोधकापर्यंत सर्वच जण कंत्राटी कामगार असतात. तिथे एक महिन्याच्या सूचनेवर कोणालाही कामावरून कमी करता येते. शिवाय एकदा जे वेतन ठरले आहे त्यात कोणतीही वेतनवाढ दिली जात नाही.
अर्थात ही परिस्थिती मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मुख्यालयात काम करणाऱ्या पत्रकारांची आज झाली आहे. त्याशिवाय वृत्तपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी अर्धवेळ पत्रकार, स्तंभलेखक असे बरेच कार्यरत असतात. या सर्वांना कोणत्याही कायद्याचे संरक्षण नाही. आज महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना निवृत्तीनंतर काही अटी पूर्ण केल्या असल्यास निवृत्तीवेतन देणे सुरू केले आहे. मात्र या जिल्हा प्रतिनिधी आणि तालुका प्रतिनिधींना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही. इतकेच काय पण मुख्यालयी काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना देखील या वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे हातपाय थकल्यावर हे सर्वच पत्रकार पराधीन जीणे जगत असतात.
ही परिस्थिती मोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची आहे. त्याशिवाय अनेक पत्रकारांनी शहर स्तरावर जिल्हा किंवा तालुकास्तरावर आपली छोटी छोटी वृत्तपत्रे प्रकाशित करणे सुरू केले आहे. तिथे मालक सर्व काही असतो. मागे एका वृत्तपटात लोकमान्य टिळक केसरीचे अंक घरोघरी टाकताना दाखवले होते. आजही जिल्हा किंवा तालुकास्तरावर कित्येक मालक स्वतःचा पेपर घरोघरी वाटताना दिसतात. नागपुरात काही वर्षांपूर्वी काही सायं दैनिकांचे मालक संध्याकाळी चौका चौकात उभे राहून ओरडून आपले वृत्तपत्र विकताना अनेकांनी बघितले आहेत. ते पत्रकार म्हणूनच गणले जातात. मात्र त्यांच्या समस्या पूर्णतः वेगळ्या आहेत. त्यांना आयुष्याची कोणतीही शाश्वती नाही. राजकारणी, अधिकारी उद्योगपती हे कोणीही पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर त्यांच्यावर दबाव टाकू शकतात. मग तिथे तुमच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेची ऐसी तैसी झाली तरी चालते.
१९९५ पर्यंत देशात दूरदर्शन हेच एक दृकश्राव्य माध्यम होते, जे बातम्या दाखवीत असे. तिथे सरकारी कर्मचारीच वृत्त संकलन करायचे किंवा मग कंत्राटी पद्धतीवर वृत्त छायाचित्रकार नेमले जात असत. या कंत्राटी पद्धतीवरच्या वृत्त छायाचित्रकारांची अवस्था देखील फार वाईट असायची. १९९५ नंतर खाजगी वृत्तवाहिन्या आल्या. तिथेही असेच कंत्राटी पत्रकार नेमले जातात. आज खाजगी वृत्तवाहिन्यांचे ग्लॅमर लक्षात घेता या पत्रकारांना मानसन्मान भलेही मिळत असेल, पण सोयीसुविधांच्या नावे बोंबच आहे.
एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमे पुढे आली. मग हळूहळू बातम्या देणारे पोर्टल्स पुढे आले. या पोर्टलच्या माध्यमातून ज्यांच्याकडे संगणकाची सोय आहे त्यांना घडलेल्या घटनांच्या तात्काळ बातम्या मिळू लागल्या. वृत्तपत्र काढायचे म्हणजे सगळ्यात मोठा खर्च हा छपाईचा आणि कागदाचा असतो. तोच खर्च कमी झाल्यामुळे असे डिजिटल पोर्टल काढणारे बरेच पत्रकार पुढे आले. त्यामुळे आज अगदी कावळ्याच्या छत्र्यांसारखे हे डिजिटल पोर्टल्स पुढे आलेले आहेत. तिथे सुद्धा मालकच सबकुछ असतो. ज्याप्रमाणे हे डिजिटल पोर्टल्स पुढे आले, त्याचप्रमाणे यूट्यूब चैनल देखील पुढे आले. आधी दूरदर्शन किंवा खाजगी वृत्तवाहिन्या या मोजक्यात होत्या. त्यांचे प्रसारण सॅटॅलाइटच्या माध्यमातूनच होत असे. आता युट्यूबच्या माध्यमातून कोणीही आपले यूट्यूब चैनल सुरू करून त्याच्यावर बातम्या देऊ शकते. जेव्हापासून स्मार्ट मोबाइल फोन्स बाजारात आले आणि प्रत्येकाच्या खिशात ते दिसू लागले, तेव्हापासून या डिजिटल पोर्टल आणि युट्युब चॅनेल्सला अगदी पेव फुटले म्हटले तरी चालेल कारण आता पोर्टल्स बघायला संगणकाची गरज नाही ते मोबाईलवरच बघता येते तसेच युट्युब बघायलाही टीव्ही ची गरज नाही ते मोबाईलवरच बघता येते. मुंबईला मंत्रालयासमोर मुख्यमंत्री बोलायला आले की एकावेळी जवळजवळ ६५ ते ७० छायाचित्रकार कॅमेरे घेऊन किंवा मोबाईल हातात घेऊन उभे असतात. त्यातील जे मेन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत ते जेमतेम १५ ते २० असतात. बाकी सर्व हे युट्युबर्सच असतात. हे बघता अशा पत्रकारांची संख्या किती वाढली आहे हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे पत्र परिषदांना नियमित पत्रकारांसोबत या पोर्टलचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येत गोळा झालेले दिसतात त्यांचीही संख्या बरीच वाढलेली आहे.
विशेष म्हणजे मोठ्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे पत्रकार असो, तालुका, जिल्हा प्रतिनिधी असोत, छोटी दैनिके किंवा साप्ताहिके चालवणारे पत्रकार असोत, किंवा मग असे पोर्टल चालवणारे किंवा युट्युबर्स असोत, यांना आज कोणतेही संरक्षण नाही. नोकरीवर लागताना कोणतेही नियुक्तीपत्र दिले जात नाही. सरकार दरबारी त्यांची कोणतीही नोंदणी नसते. त्यांना कोणत्याही सोयी सवलती मिळत नाहीत. त्यांच्यावर कोणतीही आपत्ती आली तर त्यांना मदत करणारे कोणीही नसतात. पत्रकारांना मदत करण्यासाठी सरकारी योजना आहेत मात्र नोकरशहांनी लादलेल्या अटी इतक्या किचकट आहेत, की काही मोजक्याच पत्रकारांना त्या सवलतींचा लाभ मिळतो. बाकी भगवान भरोसेच असतात असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळेच आज हा पत्रकार अगदी ‘दीन’ झाला आहे, असे पत्रकार दिनाच्या निमित्तानेच म्हणावेसे वाटते.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पत्रकार म्हटला की त्याला समाजात एक मान असायचा, भलेही त्याच्याजवळ पैसा नसेल पण वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी नेते त्यालाच दबून असायचे. आज परिस्थिती बदललेली आहे. आज अनेक राजकारण्यांनीच आपली वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. परुळेकरांचे दैनिक सकाळ आता पवारांनी विकत घेतले आहे तर लोकनायक बापूजी अणेंचे लोकमत दर्डांनी विकत घेतले आहे. त्यामुळे अशा पत्रकारांच्या सेवा हे राजकारणी पैसा मोजून विकत घेत असतात. ज्यांची वृत्तपत्रे नसतील, ते प्रसंगी पत्रकार देखील विकत घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. जे पत्रकार त्यांना दबतात त्यांचे बरे चालते. बाकीच्यांच्या नोकऱ्या मालकांवर दबाव आणून हे राजकारणी केव्हा घालवतील याचा भरोसा नसतो. महाराष्ट्रात गाजलेल्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकाला त्याने एका राष्ट्रीय स्तरावरील राजकीय नेत्याची ऐकले नाही आणि त्याच्या विरोधात बातमी लावली म्हणून त्या वृत्तवाहिनीने कामावरून काढून टाकले, आणि नंतर कुठल्याही वृत्तवाहिनीत त्याला नोकरी मिळू दिली नव्हती. विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांवर अनेकदा हल्ले करून त्यांना जीवे देखील मारल्याच्या घटना या देशात घडल्या आहेत. असे अनेक प्रकार सापडतील. त्यामुळे ध्येयनिष्ठ पत्रकारिता आता संपलेली आहे.
त्याचवेळी पत्रकार आता विकाऊ झाले आहेत, आजच्या पत्रकारितेत काही दम राहिला नाही, अशी टीका जनसामान्य करायला अगदी अग्रक्रमाने तयार असतात. त्यामुळे पत्रकाराची समाजातील इज्जत पुरती संपलेली दिसते आहे. म्हणूनच आधी मी म्हटल्यानुसार हा पत्रकार आज खरोखरीच ‘दीन’ झाला आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
त्यासाठी संवेदनशील राज्यकर्ते जर असले तरच काही बदल घडवला जाऊ शकेल. आज पत्रकारांसाठी तसेच वृत्तपत्र मालकांसाठी काही आचारसंहिता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या वृत्तपत्रांची तसेच सर्वच प्रसिद्धी माध्यमांची शासकीय स्तरावर नोंदणी असणे गरजेचे आहे. आज वृत्तपत्रांना रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स यांच्याकडे नोंदणी करावी लागते. मात्र पोर्टल्स आणि युट्यूब चॅनल्सला कोणतीही नोंदणी करावी लागत नाही. त्यांनाही अशी नोंदणी करावी लागेल आणि त्यांनाही नियमांच्या चौकटीत आणले जाण्याची गरज आहे.
त्याचवेळी या माध्यमांना आणि त्यात कार्यरत असलेल्या पत्रकारांना योग्य ते संरक्षण कसे मिळेल याची देखील काळजी घेतली जायला हवी. या पत्रकारांना सर्वात प्रथम म्हणजे नियमित वेतन कसे मिळेल, तसेच त्यांना काम करण्यासाठी इतर सोयी सवलती कशा मिळतील, त्यांच्यावर कोणताही दबाव आणला जाणार नाही, त्यांच्यावर हल्ले झाल्यास हल्लेखोरांवर त्वरित कारवाई केली जाईल, आणि त्यांना दहशत बसवली जाईल, पत्रकारांना वैद्यकीय सेवा, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती या सर्व कशा मिळू शकतील याचा विचार व्हायला हवा. तरच पत्रकारांची परिस्थिती सुधारेल आणि पत्रकारितेचा दर्जा देखील सुधारेल.
दुसरे असे की आज २१व्या शतकात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या मदतीने माहितीचा प्रस्फोट झालेला आहे. त्यामुळे पूर्वी जी बातमी वाचण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळची वाट बघावी लागत होती, ती आता काही मिनिटात आमच्यापर्यंत पोहोचते. ही बाब लक्षात घेऊन पत्रकारांनी देखील आपल्यात आवश्यक ते बदल करायला हवेत. आता पत्रकारांना आणि वृत्तपत्रांना फक्त बातम्या देऊन चालणार नाही, तर विश्लेषणात्मक लेखन करून बातमी मागची बातमी कशी देता येईल याचा विचार करायला हवा. त्यासाठी पत्रकारांना देखील बदलत्या काळानुसार अपडेटेड राहायला लागेल. त्याची तयारी पत्रकारांनी देखील करायला हवी. पूर्वी वृत्तपत्रात खिळे जुळवून छपाई केली जात होती. आज संगणकाच्या युगात सारे काही झटपट होते. या सर्व नव्या तंत्रज्ञानाची जुन्या पिढीतल्या पत्रकारांना देखील ओळख करून घ्यावी लागेल. जर पत्रकार सर्वार्थाने सक्षम झाले तर ते देखील स्पर्धेत टिकू शकतील. त्याचवेळी शासनाने आणि समाजाने त्यांना सक्षम बनवण्यासाठी जर योग्य असा हातभार लावला तरच ते सक्षम होऊ शकतील.
बातमीसाठी वृत्तपत्रे आणि प्रसिद्धी माध्यमे ही १९ व्या शतकातही गरज होती. आज २१ व्या शतकात देखील तितकीच गरज आहे, आणि पुढल्या शतकांमध्ये देखील ही गरज राहील. या माध्यमांसाठी पत्रकार हा महत्त्वाचा कणा राहणार आहे. त्यामुळे हा पत्रकार सर्वार्थाने सक्षम होण्याची सुरुवात जर होऊ शकली तर खऱ्या अर्थाने आम्ही पत्रकार दिन साजरा केला असे म्हणता येईल.
त्यासाठी आजच्या मराठी पत्रकार दिनी आम्ही सर्वांनीच संकल्प करायला हवा, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

— लेखन : अविनाश पाठक. जेष्ठ पत्रकार, नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
