संगमनेर येथील दैनिक युवावार्ता व साप्ताहिक संगम संस्कृती या वृत्तपत्रांचे संस्थापक -संपादक किसनभाऊ हासे यांची पत्रकारितेत 35 वर्षे वाटचाल सुरु आहे. त्यांच्या साप्ताहिकाचा 33 वा व व दैनिकाचा 14 वा वर्धापन दिन साजरा होत आहे, ही आजच्या घडीला अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने युवावार्ता परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.
आज जरी हा परिवार एखाद्या वटवृक्षासारखा दिमाखदार पणे उभा आहे, इतरांना मायेची सावली देत आहे, आधार देत आहे, तरी त्यांची वाटचाल सहजसोपी नाही. किसनभाऊ व त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाबाई यांच्या वाटचालीचा संघर्षमय आढावा आजच्या वाचकांसाठीच नव्हे तर पत्रकारितेसाठी दीपस्तंभासारखा आहे.
2012 साली मी नाशिक विभागाचा माहिती उपसंचालक असताना किसन भाऊ हासे यांची भेट झाली. मुळातच संगमनेर माझे आजोळ असल्याने या गावाविषयी मला नेहमीच ममत्व वाटत आलं आहे. त्यात तेथील वृत्तपत्र असल्याने युवावार्ता विषयी साहजिकच अधिक जवळीक वाटू लागली.
त्यामुळे माझे मामा, सोमनाथ गंगाधर रासने यांच्याकडे
किसनभाऊ हासेंविषयी चौकशी केली असता, तेव्हा अत्यंत संघर्षमय व आदर्श व्यक्तीमत्त्वाचा जवळून परिचय झाला.
ऑगस्ट 2014 मध्ये किसन भाऊ हासे यांनी संगमनेर येथे संपादक-पत्रकारांचे राज्य संमेलन अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात यशस्वीपणे आयोजित केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थित राहण्याचा योग आला. तत्कालीन व विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी किसन भाऊंच्या खडतर वाटचालीची व पत्रकारितेची खुल्या मनाने प्रशंसा केली. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कामाचा गौरव केला.
त्यानंतर एकदा संगमनेर भेटीत किसनभाऊंच्या दैनिक युवावार्ता कार्यालयास भेट दिली असता मला अतिशय सुखद धक्का बसला. संगमनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अतिशय अद्ययावत व चकचकीत कार्यालय, संपादन, जाहिरात, छपाई, स्वागत असे वेगवेगळे विभाग बघून तळघरात छपाई मशिनरी तसेच वरील मजल्यावर निवासस्थान, पत्रकारांसाठी प्रशिक्षण हॉल हे सर्व बघून मला अतिशय आनंद झाला.

किसनभाऊंची दोन मुले एम.ई. कॉम्प्यूटर होऊन इंजिनिअरींग कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याचे समजले. ग्रामिण भागात पत्रकारितेची काहीही परंपरा नसलेल्या व्यक्तीने केलेली वाटचाल नेत्रदिपक असल्याचे मला अनुभवास आले.
अशा या किसनभाऊंच्या जीवन वाटचालीची माहिती आपल्याला निश्चितच प्रेरणादायी वाटेल अशी खात्री आहे.
किसन भाऊंचा जन्म संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावी 1959 साली शेतकरी कुटूंबात झाला. आई-वडील निरक्षर असले तरी वारकरी होते. त्यांच्या संस्कारात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. 1981 साली ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर येथे त्यांना ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळाली. 1985 साली सौ. सुशीलाशी त्यांचे लग्न झाले. त्याच साली त्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देऊन रद्दी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यास जोड म्हणून रबरी शिक्के बनविण्याचे काम सुरु केले.
आनंद प्रिंटर्स नावाने छापखाना सुरु केला. व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठलीही परंपरा नव्हती. आर्थिक आधार नव्हता. प्रचंड कष्ट करण्याची जिद्द व धाडसी विचार यावरच भाडे तत्त्वावरील पडक्या घराची जागा निवडून, 1989 साली त्यांनी “साप्ता. संगम संस्कृती” हे साप्ताहिक सुरु केले.
वारकरी सांप्रदायाचे संस्कार व वाचण्याची प्रचंड आवड असल्याने विविध विषयांचे प्रचंड वाचन केले. ग्रंथपाल असल्याने हवी ती पुस्तके वाचण्यास मिळाल्याने सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करावे, महिलांना निर्भयता सांगावी, शेतकर्यांनी स्वावलंबी व्हावे या विचारांचा सतत प्रभाव असल्याने पत्रकारितेव्दारे समाज प्रबोधन, समाज परिवर्तन करावे म्हणून साप्ताहिक संगम संस्कृतीची निर्मिती झाली.
सामाजिक कार्याची आवड असली तरी कर्ज काढून सुरु केलेला व्यवसाय, भांडवलाचा अभाव आणि कुशल मनुष्यबळ नसल्याने व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. ते कर्जबाजारी झाले. पत्नी सुशीलास फार काळजी वाटत असल्याने त्यांनी प्रिंटींग प्रेस, साप्ताहिक कामात अतिशय मदत केली.
1990 साली त्यांनी पहिली संगमनेर-अकोले तालुका टेलिफोेन डिरेक्टरी प्रसिध्द केली. त्याचवर्षी दिवाळी अंक प्रसिध्द केला. थोडे फार पैसे मिळाले आणि त्यांचा संघर्षातील संसार मार्गस्थ होऊ लागला.
सामाजिक परिवर्तनाचा विचार स्वस्थ बसू देत नसल्याने ‘युवाशक्ती’ नावाने युवकांची संघटना सुरु केली. ‘युवासंगम प्रतिष्ठान’ नावाने सेवाभावी संस्था स्थापन केली. मोठा मुलगा आनंद याचा 1986 साली जन्म झाला. 1989 साली सुदीपचा जन्म झाला. कुटूंब मोठे झाले मात्र उत्पन्नात फारशी वाढ न झाल्याने प्रचंड आर्थिक ओढाताण व्हायची. पावशेर दुधात दिवसभरातील चहा, मुले आणि पाहुणे यांचा सांभाळ करणे हे अग्नीदिव्य होते. ते सौ सुशीलाबाईंनी कठोर परिश्रमाने पूर्ण केले.
किसनभाऊंचा साप्ताहिक प्रकाशनानिमित्त वृत्तपत्रे, पत्रकार संघटनांशी संपर्क आला. 1992 साली नागपूर येथील राजू पवार यांनी महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद या संस्थेचे राज्य समन्वयक म्हणून काम करण्याची त्यांना संधी दिली. त्यानंतर महाराष्ट्र संपादक परिषद या संस्थेत संघटनात्मक कामाची उभारणी केली. शेगाव येथे 2004 साली महाराष्ट्र संपादक-पत्रकार अधिवेशन पार पाडले. त्यानिमित्त वृत्तपत्रांचे प्रश्न, संपादक-पत्रकारांचे प्रश्न याविषयीचा त्यांचा अभ्यास झाला. राज्यभर भरपूर प्रवास झाला. सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री, प्रशासनातील सचिव, महासंचालक, संचालक, जिल्हा माहिती अधिकारी ही यंत्रणा माहित झाली. संपर्क वाढला. 2007 साली सर्व राज्यात फिरुन त्यांनी महाराष्ट्र संपादक डायरीची निर्मिती केली. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
ऑक्टोबर 2007 मध्ये दैनिक युवावार्ताचे प्रकाशन सुरु झाले. याप्रसंगी अतिशय सुखद अनुभव त्यांना आला, तो असा की, संगम संस्कृती साप्ताहिकाबरोबरच दैनिक वृत्तपत्राची घोषणा करताच समाजातून विविध घटकांनी स्वयंस्फुर्तीने 5-6 लाख रुपयांचे सहकार्य केले. 20-22 वर्षे केलेल्या सामाजिक व वृत्तपत्रीय कामाची ती पावती होती असे त्यांना वाटते. दैनिक सुरु झाले पण आर्थिक संघर्ष वाढला. त्याचे सर्वाधिक चटके पत्नी सुशीलास बसले. विचाराने सुरु केलेल्या कामात काही झाले तरी माघार घ्यायची नाही असा निर्धार असल्याने दैनिकाचे काम उत्तमरित्या चालू आहे.
स्वयंपाकघरात गॅसवर कुकर लावलेला असता. खालून जाळ असला तरी शिट्ट्या वाजत असतात. त्याप्रमाणे कर्जाचा बोजा, साधनांची अपूर्तता कुटूंबाची हेळसांड ही आग असली तरी सामाजिक कार्यातील यश, प्रभाव वाढल्याने स्विकारलेले काम त्यांनी बंद होऊ दिले नाही. त्यामुळेच 1998 साली श्रीसंगम ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेची स्थापना केली. 2002 साली संगमनेर तालुका बेरोजगार सहकारी संस्थेची स्थापना केली. मराठा समाज विकास संस्थेची स्थापना केली. 2011 साली संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेची स्थापना केली. या सर्व संस्था कार्यरत असून अनेक व्यक्तींना या संस्था कार्याचा लाभ होत आहे.
सामाजिक उद्दिष्टांसाठी दैनिक वृत्तपत्र नियमित प्रकाशित करणे ही बाब अत्यंत अवघड असली तरी किसनभाऊ हासे हे कार्य व्रतस्थपणे करीत आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, संघटनात्मक काम करणे, आर्थिक व्यवस्थापन सांभाळणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे, भविष्याचा वेध घेऊन नियोजन करणे या प्रकारचे काम करीत असताना किसन भाऊ हासे दैनिक युवावार्ता वृत्तपत्राची 14 वर्षे पूर्ण करुन पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या अविरत कार्यास, समाजाभिमुख प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक