लोकांच्या पसंतीवरून देण्यात येणारा, ‘अप्रतिम मीडिया’ चा चौथा स्तंभ, जीवन गौरव पुरस्कार श्री प्रकाश कथले यांना जाहीर झाला आहे. श्री कथले यांच्या गौरवशाली पत्रकारितेचा हा मोठाच गौरव आहे. या निमित्याने आपल्या पोर्टलवर 8 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली त्यांची यशकथा आज पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. श्री कथले यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– संपादक.
फार थोड्या व्यक्ती असतात, ज्या आपल्या नावाला आणि व्यवसायाला जागतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे वर्धा येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले हे होत.
प्रकाशजी नावाप्रमाणेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सतत योग्य प्रकाश देत आले आहेत. तर थोरामोठयांच्या सहवासात येऊनही, राहूनही त्यांनी कधीच त्या संबंधांचा स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोग किंवा दुरुपयोग करून घेतला नाही. आजच्या काळात तर त्यांचं हे वेगळेपण विशेषत्वाने उठून दिसते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु असलेले संत अडकोजी महाराज यांच्या जवळच्या नात्यातील असल्याने प्रकाशजींना तुकडोजी महाराज यांचा निकटचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या कीर्तनात प्रकाशजी सातत्याने सहभागी होण्याचे त्यांना भाग्य लाभले.
पुढे पत्रकारितेमुळे व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांमुळे, आचार्य विनोबा भावे, गजल सम्राट सुरेश भट अशा अनेक मोठ्या व्यक्तींचा त्यांना सातत्याने सहवास लाभला. पण या थोरामोठयांची शिकवण त्यांनी अंगी बाणवल्यामुळे त्यांच्यातील साधेपणा, सहजपणा तहहयात टिकून आहे.
प्रकाश नत्थुजी कथले यांचा जन्म १२, जुलै १९५२ रोजी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. २ पर्यंत झाले आहे. ते संगीत विशारद असून ग्वाल्हेर घराण्याचे गायक स्व.पं शंकरराव मांडगवडे यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे.
पत्रकारितेचा पूर्णवेळ व्यवसाय निवडलेल्या
प्रकाशजींनी दै नागपूर पत्रिका, दै. नागपूर टाईम्सचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी म्हणून १९८२ ते १९९६ काम पाहिले. तर १९९७ ते २००० ते दै. जनवादमध्ये होते. ऑक्टोंबर २००० पासून ते दै. सकाळ करिता कार्यरत राहिले. जुलै २०१२ मध्ये ते सकाळमधून सेवानिवृत्त झाले. या निवृत्तीनंतर ते ऑगस्ट २०१२ पासून दै. देशोन्नतीच्या वर्धा आवृतीचे संपादकीय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
प्रकाशजींनी नेहमीच विधायक पत्रकारितेला अग्रक्रम दिला आहे. त्यामुळे त्यांनी आदर्श गाव निर्मिती आणि जलसंवर्धनाचे उपक्रम, वेगवेगळ्या विषयांवरील विधायक बातम्या, लेख सातत्याने प्रसिद्ध केले आहेत.
प्रदीर्घ पत्रकारितेच्या कालावधीत आपल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रकाशजी १९८६ मध्ये मा. बा. गांधी ट्रस्ट नागपूर पुरस्कार, २००० मध्ये श्री. अरविंद देशमुख स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार, २००४ मध्ये दर्पण पुरस्कार, मुंबईतील कार्यक्रमात ज्येष्ठ नट प्रभाकर पणशीकर गौरव आदी पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी विभागीय व राज्य अधिस्वीकृती समिती स्थापन करण्यात येत असते.या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती होणे हे पत्रकारितेत व शासन दरबारी अत्यन्त मानाचे समजले जाते. अशा नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून त्यांची फेब्रुवारी १९९७ ते मार्च २००० पर्यत नियुक्ती करण्यात आली होती.
प्रकाशजींनी पत्रकारितेबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक कार्यातही सतत सक्रिय सहभाग घेतला आहे. २००३ आणि २००४ झाली अखिल भारतीय ग्वाल्हेर घराना संगीत संमेलनाचे ते आयोजक होते.
अशा या व्रतस्थ पत्रकार प्रकाशजी कथले यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐
– देवेंद्र भुजबळ 9869484800
अभिनंदन प्रकाश कथले साहेब ! पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !
पत्रकारितेतील दीपस्तंभ.