वर्धा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश कथले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नुकताच मुंबई येथे अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील “चौथा स्तंभ : जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात मला देखील उत्कृष्ट सामाजिक संवादाबद्दल ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टलचा संपादक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकाच व्यासपीठावर आम्हा दोघांनाही पुरस्कार मिळाले, याचा मला फार आनंद झाला. असो. यानिमित्ताने प्रकाशजींचा हा प्रेरक जीवन परिचय….
फार थोड्या व्यक्ती असतात, ज्या आपल्या नावाला आणि व्यवसायाला जागतात आणि जगवितात. त्यातून प्रेरणांचे उर्जास्त्रोत निर्माण होते. अशीच एक व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले होत. वैचारिक समृद्धतेसोबतच थोरामोठ्यांच्या सहवासातून मिळालेली वैचारिक प्रेरणा जागवत त्यांनी पत्रकारितेचा प्रवास निरंतर सुरू ठेवला आहे.
प्रकाशजी नावाप्रमाणेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सतत योग्य प्रकाश देत आले आहेत. निष्कांचन राहून त्यांच्या ध्येयनिष्ठ, विधायक पत्रकारितेचा गौरव त्यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारातून झाला, यात आम्हा सर्वांनाच धन्यता वाटते.
वैचारिक धन वाटत जावे, समाजातील जे काही चांगले आहे, त्याचा शोध घेत प्रेरणाचे स्तंभ समाजापुढे सादर करावे, हाच त्यांच्या पत्रकारितेचा वसा आहे.

प्रकाशजी अनेक थोरामोठ्यांच्या सहवासात राहिले आहेत. पण त्यांनी स्वत:च्या फायद्याकरीता या संबंधाचा उपयोग किंवा दुरुपयोग कधीच केला नाही. आजच्या काळात त्यांचे हे वेगळेपण विशेषत्त्वाने उठून दिसते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु असलेले शतायुषी समर्थ आडकुजी महाराजांच्या जवळच्या नात्यातील प्रकाश कथले आहेत. राष्ट्रसंतांच्या तीन वर्षांच्या सहवासात त्यांनी राष्ट्रसंतांना भजनात खंजिरीची साथ केली. आजही त्यांचे खंजिरी वादन राष्ट्रसंतांच्या खंजिरीची आठवण करून देते. एक पत्रकार खंजिरी भजनात रमतो, हे आगळे स्वरूप पत्रकारितेच्या नव्या झगमगाटी आयामात उठून दिसते. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप त्यांच्या खंजिरी भजनाने होतो, यातच त्यांच्या विधायक, सोज्ज्वळ जीवन वैशिष्ठ्याचे स्वरूप समजून घेण्यास पुरेसे आहे.
`प्रकाश ! मी तुला माझी इस्टेट लिहून देतो` म्हणत राष्ट्रसंतांनी त्यांना एक पत्र लिहून दिले. त्यात लिहिले आहे, `प्रकाश, सच्चे रहो, अच्छे रहो,!` खाली राष्ट्रसंतांनी तुकड्यादास, अशी स्वाक्षरी केली.
एवढ्यावरच राष्ट्रसंत थांबले नाहीत तर त्यांनी मी या मुलाला माझी इस्टेट लिहून दिली, हे त्यांच्या सामूदायिक भाषणात किमान पाच ते सात मिनिटे सांगितले. हा प्रसंग आहे, २४ जानेवारी १९६८ चा. हाच जिवाभावाचा ठेवा प्रकाश कथले आयुष्यभर जपत आले आहेत.
प्रकाशजींना पत्रकारितेमुळे व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांमुळे आचार्य विनोबा भावे, गझलसम्राट सुरेश भट, नानासाहेब गोरे, बॅ.नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस, ग.प्र.प्रधान, आर.के.पाटील, बाबूजीदादा मोहोड, शंकरराव चव्हाण, विविध स्वातंत्र्यसेनानी तसेच नामवंत पत्रकार गोविंदराव तळवलकर, कुलदीप नय्यर, शांताराम बोकिल, युधिष्ठिर जोशी, अनंत दीक्षित, मराठवाडाकार अनंतराव भालेराव आदींसोबतचा निकटचा स्नेह मिळाला.
शोध पत्रकारिता त्यांचे आवडते क्षेत्र असले तरी त्याला शुचिर्भूततेचा आयाम त्यांनी सातत्याने दिला. पत्रकारितेतील अर्धशतकीय वाटचाल पूर्ण करीत वयाची सत्तरी पार करूनही त्यांचा उत्साह कायम आहे. तो वयात मोजता येत नाही. स्पॉट रिर्पोटिंग करताना ते तरुणाईला प्रेरक ठरतात, असे त्यांचे योगदान आहे.
महासागर, नागपूर पत्रिका, नागपूर टाईम्स, जनवाद, सकाळ, देशोन्नती आदी वृत्तपत्रातून त्यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना संपादकीय पदे केवळ जनतेत राहता यावी, म्हणून नाकारली. निर्भिडतेने वास्तव मांडतानाच कोणावर अन्याय होणार नाही, याची ते कायम दक्षता घेतात. याचवेळी खंजिरी भजनाद्वारे त्यांची जनजागृती कायम सुरू असते.
पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांना १९८६ मध्ये मा.बा.गांधी ट्रस्टचा नागपूरचा पुरस्कार, २००० मध्ये अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार, २००४ मध्ये दर्पण पुरस्कार, मुंबईतील कार्यक्रमात ज्येष्ठ नट प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते सत्कार, कवीवर्य केशवसुतांच्या गावी सागरचे संपादक नानासाहेब जोशी यांच्या हस्ते सत्कार, अशा कितीतरी पुरस्कारांची गौरव मालिकाच त्यांच्या मागे उभी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून त्यांनी 1997 ते 2000 पर्यंत गौरवास्पद काम केले आहे.
शास्त्रीय संगितात त्यांनी ग्वाल्हेर गायकीचे गुरुकुल पद्धतीने धडे घेतले. पं.कृष्णराव शंकर पंडितजी महाराजांचे शिष्य पं.शंकरराव मांडवगडे हे त्यांचे गुरु. यातूनच त्यांचा पं.भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, मालिनी राजूरकर, पं.प्रभाकर कारेकर, पं.फिरोज दस्तूर, उस्ताद डागर बंधू.पं.एल.के.पंडित, डॉ.मिता पंडित, यांच्यासोबत त्यांचा निकटचा स्नेह निर्माण झाला. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकांचे त्यांनी संमेलन सातत्याने आयोजित केले. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800