२६ जून शाहू जयंतीचा, राज्यातील पुरोगामी चळवळीसाठी अभिमानाचा दिवस ! १५ वर्षांपूर्वी याच दिवशी पत्रकार, कपिल पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वावर,
त्यांचे सहकारी श्री जालिंदर देवराम सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष – मुंबई ग्रॅज्युएट फोरम यांनी टाकलेला एक दृष्टिक्षेप….
छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते होत. पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा चळवळीतील कार्यकर्ता, पत्रकार, संपादक म्हणून महाराष्ट्राला परिचीत असणारे कपिल पाटील मुंबईतील शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले.
शिक्षक मतदारसंघातुन वर्षोनुवर्षे भाजपा प्रणित शिक्षक परिषदेचा आमदार निवडून येत होता. खरंतर उच्चशिक्षित मतदार संघावर बीजेपीचं वर्चस्व होतं. ते वर्चस्व कपिल पाटील यांनी तोडलं, इतिहास घडवला तो देखील शाहू जयंतीच्या दिवशी !
कपिल पाटील शिक्षक आमदार म्हणून निवडून आले आणि सलग १५ वर्ष ते शिक्षक आमदार म्हणून शिक्षण क्षेञाचे “अनभिषिक्त सम्राट” ठरले आहेत. शिक्षक नसणारी व्यक्ती “शिक्षक आमदार” म्हणून निवडून येते आणि सलग तीन टर्म आमदार राहते ही सामान्य बाब नाही.
राज्यातील शिक्षणाची दशा आणि दिशा बदलण्यात आमदार कपिल पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी शिक्षकांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठीचा लढा अव्याहतपणे चालू ठेवला आहे. प्रश्न पगाराचा असेल तर एक तारखेला पगार होण्यासाठी त्यांनी लढा दिला. १ तारखेला पगार हे शिक्षकांचे स्वप्न सत्यात उतरवले. शिक्षकांना आदर आणि उत्कृष्ट अर्थार्जन हे कपिल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनीच मिळवून दिले. महिलांना १८० दिवसाची “मॅटर्निटी लिव्ह” मंजूर करुन घेतली. आपले मतदार नसणार्या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सन्मान मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. सर्व शिक्षक चळवळीतील संघटनांनी याचा अभ्यास करुन दखल घ्यावी असा तो यशस्वी लढा होता.
कपिल पाटील आमदार म्हणून निवडून गेल्यामुळे तत्कालीन विधान परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांना फार आनंद झाला. त्यावेळेस त्यांनी म्हटले की, “कपिल पाटील यांच्यामुळे सभागृहाचं कामकाज दर्जेदार होईल” याची प्रचिती राज्याने अनुभवली आहे. पञकारितेचा आणि लेखनाचा प्रगाढ अनुभव आणि शिक्षण क्षेञाचा प्रचंड अभ्यास ही शिदोरी घेऊन सत्यमार्गावरील हा एकांडा शिलेदार या शिक्षणाच्या क्षेत्रात आला आणि अक्षरशः किमया घडली. “शिक्षकांनाही वाली असतो” हा नवा साक्षात्कार शिक्षकांनी अनुभवला.
पुरोगामीत्व तर त्यांच्या नसानसात भिनले आहे. म्हणूनच
कपिल पाटील म्हणजे पुरोगामी चळवळींचा बुलंद आवाज आहे ! राज्याच्या कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर त्यांच्या मतांची दखल राज्य सरकारला घ्यावी लागते.
फक्त मुंबईतील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शिक्षक आणि शिक्षण तसेच सामाजिक, राजकीय घडामोडींवर त्यांचे लक्ष असते. त्यांचे वक्तृत्वही तेजःपुंज आहे, सभागृहातील त्यांची भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. अतिशय कमी शब्दांत व कमी वेळेत अभिव्यक्त होण्याचं कसब त्यांना अवगत आहे.
कपिल पाटील यांना प्रश्नाची उकल तात्काळ होते. “अभिनव प्रकारची आंदोलने” हे त्यांचं वैशिष्टय, त्यामुळेच त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनाचे फलित हे यशात रुपांतरीत झाले आहे. गेली १५ वर्षे राज्यातील शिक्षकांना कपिल पाटील यांचा आधार वाटतो आहे. राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं एकमेव आशास्थान कपिल पाटील आहेत. केवळ शिक्षकांचे प्रश्न नाहीत तर त्यांच्या अजेंड्यावर नेहमी शिक्षणाचे प्रश्न असतात.
राज्यातील अभ्यासक्रम बदलावा, तो केंद्रीय अभ्यासक्रमाच्या दर्जाच्या व्हावा यासाठी त्यांनी केलेली खटपट फार मोलाची होती. त्यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेत बिहार, दिल्ली, केरळ याठिकाणी तज्ज्ञ शिक्षक मुख्याध्यापक व अधिकारी यांचे शिष्टमंडळ पाठवले. या शिष्टमंडळांनी दिलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. त्यानुसार राज्यातील नववी- दहावीचा विज्ञान व गणिताचा अभ्यासक्रम सीबीएसई दर्जाचा बनविण्यात आला.
मुलांना परीक्षेचं ओझं वाटू नये म्हणून “स्टूडंट फ्रेण्डली” टाइमटेबल बनविण्यात आले. मुलांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून मुंबईतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांना एकत्र करून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून प्रशिक्षित करण्यात आलं. मराठी विषय विशेष स्कोरिंग व्हावा यासाठी राज्यातील तज्ज्ञ मंडळींची मीटिंग घेऊन चर्चा घडवून आणण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात कपिल पाटील यांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे. शिक्षकांचा प्रश्न मग नोकरीतील असो वा वैयक्तिक, साहेब आवर्जून मदतीचा हात देतातच !
कोव्हीड महामारीच्या या काळात शिक्षक किंवा त्याचे कुटुंबिय कोरोनाग्रस्त झाल्याचे कळताच आमदार कपिल पाटील ताबडतोब त्यांच्यासाठी हाॕस्पिटलची सोय करतातच ! अशा कित्येकांना वाचवणारे, जीवदान देणारे हे एकमेव आमदार ! कोणत्याही आमदाराला फोन करायचा तर आधी पीएशी बोलून मगच संपर्क साधावा लागतो, पण आमदार कपिल पाटील हे सर्वांसाठी कायम उपलब्ध असतात. काही कारणास्तव फोन घेऊ न शकल्यास ते फ्री होताच ताबडतोब फोन करतात. हेही त्यांचे एकमेवाद्वितियत्वच !
विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि शिक्षणाचं होणारं शोषण त्यांना मान्य नाही. खाजगी विद्यापीठाला सभागृहात विरोध करणारे ते एकमेव आमदार होते. “तुमच्या खाजगी विद्यापीठांमध्ये या महाराष्ट्रातील गोरगरीब दलित वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल काय ?” असा ठणकावून सवाल विचारणारे ते एकमेव आमदार होते. “जोपर्यंत मी या सभागृहात आहे तोपर्यंत हे बील मी मंजूर होऊ देणार नाही” असा सज्जड दम त्यांनी सरकारला दिला. शेवटी सरकारने माघार घेत त्यात आरक्षण टाकले, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची तरतुद केली. हे फार मोठं यश होतं.
गेली कित्येक वर्ष सभागृहात अंधश्रद्धा निर्लमूनाचे विधेयक पास होत नव्हते. आमदार कपिल पाटील यांनी यात महत्वाचे बदल सुचवले. शेवटी सभागृहात हे ऐतिहासिक बील मंजूर झाले याचं मोठं श्रेय आमदार कपिल पाटील यांना द्यावंच लागेल.
राज्यात २००० सालापासून शिक्षणसेवक योजना लागु केली गेली. ही योजना राज्याला काळीमा फासणारी बाब होती. कपिल पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी या विरोधात जोरदार लढा दिला. शिक्षणसेवक या योजनेविरोधात सभागृहात खाजगी विधेयक मांडले. या विधेयकावर मतदानाची मागणी केल्यामुळे सरकार संकटात सापडले. सरकार मतदानात हरणार हे दिसताच शिक्षणमंत्र्यांनी कपिल पाटील यांना विनंती करुन विधेयक मागे घ्या अशी विनंती केली. या विधेयकाची परिणिती म्हणून शिक्षणसेवक नाव हटवून “टिचर्स ऑन प्रोबेशन” हे नवीन नाव आले. शिक्षणसेवकांचे मानधन दुप्पट केले गेले. आमदार कपिल पाटील यांच्या या ऐतिहासिक कामगिरीवर सभागृहातील सगळ्यात जूने नेते दिवाकर रावते यांनी “संसदीय आयुधांचा योग्य वापर करुन सरकारला नमवणारा एकमेव आमदार” असा कपिल पाटील यांचा गौरव केला. हे यशही अभूतपूर्वच होते. एकटा आमदारही सरकारला झुकवू शकतो याचं एकमेव उदाहरण आमदार कपिल पाटील !
कोव्हिडच्या काळात राज्य सरकार आर्थिक संकटात आले. शिक्षकांचे पगार थांबवले गेले. शिक्षकांना केवळ ५० ते ७५ टक्केच वेतन देण्याचा जीआर काढण्यात आला. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. यात यशस्वी शिष्टाई केवळ आमदार कपिल पाटील यांनी केली. वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्याला शिक्षकांचा पगार रोखता येणार नाही असे ठणकावले. जर आपण असा प्रयत्न केला तर त्याची जबर किंमत राज्य सरकारला चुकवावी लागेल असा इशाराही दिला. सरकारने ते परिपत्रक मागे घेतले. कापलेला पगारही परत केला. इतकी नैतिक ताकद कोणत्याही आमदारात नाही.
ग.प्र. प्रधान मास्तर असतील किंवा बी.टी देशमुख असतील यांचा दैदिप्यमान वारसा कपिल पाटील यांनी अव्याहत पणे सुरु ठेवला आहे. ज्यांना सामाजिक भूमिका आहे असे फार कमी लोक देशाच्या राजकारणात आहेत त्यापैकी एक कपिल पाटील आहेत. तरुणांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच आमच्या सारख्यांना सोबत घेऊन राज्यातील सर्वोत्कृष्ट संघटन त्यांनी उभ केलं. राष्ट्र सेवादल असेल, छात्रभारती असेल त्यांचं योगदान हे वादातीत आहे.
साने गुरुजींनी चिंतीलेले स्वप्न साकरण्याची त्यांची धडपड सदोदीत सुरु आहे. राज्यातील शिक्षकांचा, शिक्षणाचा ते आधार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा ते समर्थपणे संभाळत आहेत. राज्याच्या राजकारणात, समाजकारणात असे फार कमी लोक उरले आहेत त्यांना आपण जपलं पाहीजे, सांभाळलं पाहिजे. त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहीलं पाहिजे !
– लेखन : जालिंदर देवराम सरोदे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सर, आद. कपिल पाटील सरांच्या उदात्त व चौफेर कार्यकर्तृत्वाची अतिशय सुंदर मांडणी केलीत.
आद. कपिल सरांनी तळागाळातील, वाडी-वस्तीवरील,उपेक्षित वंचिताच्या सकारात्मक बदलासाठीच्या आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधासाठी केलेले कार्य संबंध महाराष्ट्र जाणून आहे. शिक्षण क्षेत्रासह शेतकरी कामगारांच्या लढ्यातलं त्यांच योगदान मैलाचा दगड आहे . कष्टकरी, कामकरी, मजुरांच्या प्रती असलेली कणव त्यांना अस्वस्थ करते. बळीराजाच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात ते अग्रेसर राहिले आहेत. गरिब, वंचित, नाकारलेल्या वर्गातील मुलांसाठीच्या शैक्षणिक हक्कासाठी ते सजग असतात. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे ते आधारवड आहेत. साहेबांच्या या सुवर्णमय कार्यास सलाम…
1991-92 च्या दरम्यान चेंबूरच्या संत एकनाथ वसतिगृहात राहत असतांना साहेबांचा एक उमदा,निर्भीड पत्रकार म्हणून परिचय झाला. निखिलजी वागळे व त्यांच मुंबईतील इतर वसतिगृहाप्रमाणे इथं ही येणजानं असे. तमाम वसतिगृहे हे नेहमीच परिवर्तनाचं, उठवाचं केंद्र राहिलेले आहे. आमच्या वसतिगृहाच्या प्रत्येक रूममध्ये आज दिनांक, महानगर हमखास वाचलं जाई. साहेबांचा पत्रकार ते मुरब्बी शैक्षणिक समाजभान असलेला आमदार हा प्रवास एक लढाई आहे. परिवर्तनाची, पुरोगामी विचारसरणीची…
साहेब,दिव्यांगांच्या शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनासाठी चालणाऱ्या सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या विशेष शाळा/कर्मशाळा राज्यातून हद्दपार होताहेत. जाचक अटीशर्तीच्या क्लिष्ट फेऱ्यात अडकल्या आहेत. दरवर्षी शे-दिडशे शाळा/कर्मशाळा विविध कारणास्तव बंद करून दिव्यांगांच्या शिक्षण हक्क कायद्यास नख लावले जात आहे. आयुक्त, दिव्यांग पुणे व मंत्रालयीन कारभाराच्या उदासीनतेमुळे उध्वस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हजारो मागण्या यक्ष प्रश्न बनून समोर आहेत. आपणच त्याला समर्थपणे भिडू शकता, लढू शकता हा आम्हास विश्वास आहे. तुमच्या प्रत्येक लढ्यावर आमची निष्ठा आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांना आपल्या हाकेची गरज आहे……
आजच्या आपल्या दिड तपाच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वानिमित्त आपणांस हे नम्र आवाहन आहे.
(विलास पंडित, शिक्षक भारती विशेष शाळा/कर्मशाळा)
अप्रतिम कपिल पाटील व शिक्षण, शिक्षक एक न तुटणारे नाते आहे व ते कधीही तुटू शकणार नाही सर्व सामान्य विद्यार्थी व शिक्षकांचा एवढेच नव्हे तर संस्था चालकांना त्याचाच आधार आहे
परीपूर्ण आढावा घेतला आहे.
खूप छान सर, व आठवणींना उजाळा मिळाला.
धन्यवाद सर .