आपल्या महाराष्ट्राचे आणि या देशाचे भूषण असलेले एक श्रेष्ठ विद्वान, बुद्धिमान, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सी. डी. देशमुख म्हणजेच डॉ .चिंतामणराव द्वारकानाथ देशमुखांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाते या गावात रावसाहेब बळवंतराव महागावकर (आईचे वडील) यांच्या घरी १४ जानेवारी १८९६ रोजी मकर संक्रांतीला झाला. तेव्हापासून त्यांचे पूर्वीच्या कुलाबा सध्याच्या रायगड जिल्ह्याशी “नाते” जुळले.
सी डींचे शिक्षण रायगडमधील रोहा येथे झाले. एक असामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला. १९१२ च्या शालान्त परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी संस्कृतची अतिशय मानाची अशी जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप त्यांना मिळाली. त्या काळी त्यांनी मिळविलेले हे दैदिप्यमान यश पाहून त्यांच्यावर प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी उर्फ कवी गोविंदाग्रज यांनी एक अप्रतिम कविता लिहिली आणि ती कविता घेऊन स्वतः गडकरी चिंतामणराव देशमुखांना भेटले.
पुढे त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे ते प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
चिंतामणरावांच्या ठायी असलेली अलौकिक बुद्धिमत्ता पाहून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या ‘आय सी एस’ या परीक्षेला बसावे असा सल्ला त्यांना त्यावेळच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रो. मुल्लर आणि प्रो. अँडरसन यांनी दिला व एव्हढेच नव्हे तर त्यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळावा म्हणून मदतही केली.
पुढे चिंतामणरावांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेऊन पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, इंग्लिश भाषा आणि कॉम्पोझिशन, संस्कृत, इतिहास इत्यादी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते आय सी एस ही अतिशय अवघड अशी प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
पुढे आय सी एस चा प्रोबेशन पिरिअड त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीत काढला आणि त्याचवेळी ते तेथील बॅरिस्टरच्या परीक्षेला बसले आणि पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्यावेळी त्यांच्याकडे शेवटच्या परीक्षेस बसण्याकरिता लागणाऱ्या फी ची रक्कम २१ गिनी नव्हत्या म्हणून ते बॅरिस्टरची शेवटची परीक्षा देऊ शकले नाहीत. पण गंमत पहा, पुढे जवळ जवळ ३० वर्षानंतर ब्रिटीश सरकारचे लॉर्ड स्पेन्सर यांनी त्यांना बॅरिस्टर ही पदवी सन्मानाने प्रदान केली.
त्या दरम्यान आपल्या देशात स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला होता. त्याच सुमारास लोकमान्य टिळक हे लंडनला आले होते. आय.सी एस च्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या चिंतामणरावांनी लंडनमध्ये लोकमान्यांची भेट घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्याची आपली मनीषा लोकमान्यांना सांगितली. पण लोकमान्य टिळकांनी चिंतामणरावांचा हा मनोदय मोडुन काढत त्यांना सांगितले की, “चिंतामणराव असा आततायी विचार आता करू नका. कारण आपला देश आता लवकरच स्वतंत्र होईल व त्यानंतर आपल्याला अनुभवी आणि कार्यक्षम असे प्रशासकीय सेवेतील अधिकारी लागतील व त्यावेळी तुम्ही तेथे असणे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे असा विचार करू नका.” चिंतामणराव देशमुखांनी लोकमान्यांचा हा सल्ला मानला आणि ते प्रशासकीय सेवेतच राहिले.
लोकमान्यांच्या या द्रष्टेपणामुळेच पुढे आपल्या देशाला चिंतामणराव देशमुखांसारखा एक असामान्य आणि अलौकिक असा प्रशासकीय अधिकारीच नव्हे तर वित्त तज्ञ मिळाला.
चिंतामणरावांनी भारतात येण्यापूर्वी इंग्लंड मध्ये रोझीना या इंग्रज मुलीशी विवाह केला. १९२० साली ते मायदेशी भारतात परतले. १९२१ साली त्यांना कन्यारत्न झाले. तिचे नांव ‘प्रिमरोझ’ असे ठेवले. निवृत्ती नंतर त्यांनी इंग्लड मध्ये स्थाईक होण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी तेथे बंगला बांधला. त्या बंगल्याला त्यांनी त्यांचे बालपण ज्या रोहा गावात गेले त्या गावाचे “रोहा” हे नांव दिले. परंतु त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने तसेच मुलगी आई वडिलांजवळ न राहता इंग्लड मध्येच मावशीकडे रहात असल्यामुळे त्यांनी भारतात परत येऊन कायमचे राहण्याचे ठरवले.
१९१९ ते १९४१ हा काळ चिंतामणरावांच्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या नोकरीतील विविध खात्यांचा अनुभव घेण्यात गेला. मध्यप्रदेशात उपजिल्हाधिकाऱ्याच्या जागेवर रुजू होऊन नंतर महसूल सचिव व थोड्याच दिवसात अर्थसचिव या जागेपर्यंत ते पोहोचले. नंतर त्यावेळच्या भारत सरकारने त्यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि त्यांची प्रथम आरोग्य विभागात संयुक्त सचिव म्हणून नेमणूक केली व पुढे त्यांची “रिझर्व्ह बँकेच्या” मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती केली. त्यानंतर त्यांची प्रशासकीय सेवेतील कारकीर्द खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर जाण्यास सुरुवात झाली.
चिंतामणराव देशमुख हे इंग्लडमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेस एक सचिव म्हणून उपस्थित होते. त्या वेळी त्यांचा मालवीय, शास्त्री, सप्रू, जयकर, झाफरुल्लाखान, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी इ. नेत्यांशी संबंध आला. देशमुखांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आणि उद्योगशीलतेने महात्मा गांधींसह सर्व नेते प्रभावित झाले. पुढे ते १९३९ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव, १९४१–४३ मध्ये डेप्यूटी गव्हर्नर व पुढे १९४३–४९ या कालावधीकरिता रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. १९४३–४९ मध्ये जागतिक मुद्रा परिषदेस भारतीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि जागतिक बँक यावर भारताचे गव्हर्नर, १९४६–४९ भारतीय सांख्यिकीय संस्थेचे अध्यक्ष, १९४५–६४ यूरोप व अमेरिका यांमधील भारत सरकारचे वित्तप्रतिनिधी, १९४९–५० भारताच्या नियोजन आयोगाचे सभासद, १९५०–५६ मध्ये आंतरराष्ट्रीय चलन निधी व जागतिक बँक यांचे अध्यक्ष अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
रिझर्व्ह बँकेचे पहिले “भारतीय गव्हर्नर” म्हणून ११ ऑगस्ट १९४३ रोजी डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला. ते सहा वर्षे या पदावर राहिलॆ. चिंतामणरावांची ही कारकीर्द अतिशय संस्मरणीय ठरली. या कारकिर्दीत रिझर्व्ह बँक ही भागीदारी बँक न राहता राष्ट्रीय बँक झाली. डॉ. देशमुखांनी देशातील सर्व बँकांचे व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणले आणि बँकिंग रेग्युलेशन कायदा आणला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. देशमुख त्यावेळी जे काम करीत होते त्याचे पडसाद त्याकाळी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उमटत होते. १९४३–४९ मध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी परिषदेस भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९४५ मध्ये यूरोप व अमेरिका यांमधील भारत सरकारचे वित्तप्रतिनिधी व पुढे आंतरराष्ट्रीय चलन निधी व जागतिक बँक यांचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि जागतिक बँक यावर भारताचे गव्हर्नर अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ. चिंतामणराव देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच भारताला स्वातंत्र्य मिळाले पण अखंड भारताची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. देशमुखांनी आपल्या
“द कोर्स ऑफ माय लाईफ” या आत्मचित्रात या वेळच्या अनेक घटना नमूद करून ठेवलेल्या आहेत. त्यावेळी या दोन्ही देशांची रिझर्व्ह बँक ही एकच असल्यामुळे या बँकेच्या मालमत्तेची या दोन देशांच्या क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार विभागणी करणे आणि पाकिस्तानने मागितलेल्या ५५ कोटी रुपये या देय रक्कमेची पूर्तता करणे या दोन जबाबदाऱ्या डॉ. देशमुखांनी अत्यंत जबाबदारीने, अतिशय दक्षतेने आणि काटेकोरपणे पार पडल्या. यात रोख रक्कम आणि सोने व चांदी याचे त्यांनी दोन्ही देशांना अतिशय काटेकोरपणे वाटप केले. त्याबद्दल त्यांचे भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेत्यांकडून खूपच कौतुक झाले. अर्थात हे सगळे विस्ताराने लिहिता येत नाही. पण त्यांनी त्यावेळी या रक्कम देताना पाकिस्तानच्या फाळणी झालेल्या एका पोलीस ठाण्यात त्याकाळचे २५५ रुपये अधिक खर्च झालेले होते ते सुद्धा त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या रक्कमेतून वळते केले. इतके डॉ. देशमुखांनी फाळणीच्या वेळी काटेकोरपणे हिशोब केले होते.
डॉ चिंतामणराव देशमुख १३ मे १९५० रोजी भारताचे अर्थमंत्री झाले. त्यांनी त्यावेळच्या कुलाबा (सध्याचा रायगड) जिल्ह्यातून १९५२ साली लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर निवडून आले आणि पुन्हा भारताचे अर्थमंत्री झाले. त्यांची या देशाच्या अर्थमंत्री पदाची कारकीर्द अतिशय दैदिप्यमान होती. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण केले आणि देशातील सर्व विमा कंपन्यांना एका छत्राखाली आणले. हे एक क्रांतिकारी पाऊल होते. विमा उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणामुळे देशाला कोट्यावधी रुपये विकासाकरिता उपलब्ध झाले.
नियोजन मंडळाची म्हणजे प्लॅनिंग कमिशनची स्थापना डॉ. देशमुखांच्याच पुढाकारामुळे झाली. ते प्लॅनिंग कमिशनच्या पाच सभासदांपैकी एक सभासद होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती होण्याचा बहुमान त्यांना व देशाला मिळाला.
सी. डी. देशमुख २२ जानेवारी १९५३ रोजी दुर्गाबाई ह्या आंध्र प्रदेशातील महिला खासदार यांच्या बरोबर विवाहबद्ध झाले. पुढे १९५६ च्या काळात महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला होता. मुंबईला केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडण्याच्या पंडित नेहरूंच्या प्रयत्नांविरुद्ध महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत होता. नेहरूंच्या या कृतीविरोधात संतप्त झालेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखत आपल्या अर्थमंत्रीपदाचा लोकसभेत एक प्रदीर्घ भाषण करत राजीनामा दिला. मुंबईला केंद्रशासित करण्याच्या नेहरूंच्या या डावपेचाच्या विरोधात, अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या त्यांच्या या कृतीमुळे लोकसभेचे सारे सभागृह अवाक झाले.
डॉ. देशमुखांच्या देशाच्या अर्थमंत्रीपदाच्या या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे आणि नाट्याचे आचार्य अत्रे यांनी आपल्या “कऱ्हेचे पाणी” या आत्मचित्राच्या पाचव्या खंडात अप्रतिम शब्दात वर्णन केलेलं आहे ते अतिशय वाचनीय झालेले आहे. आचार्य अत्रे आपल्या “कऱ्हेचे पाणी” या आत्मचित्राच्या पाचव्या खंडातील “चिंतामणी देशाचा कंठमणी झाला” या प्रकरणात मुंबईच्या प्रश्नावर डॉ. देशमुखांच्या देशाच्या अर्थमंत्रीपदाच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाच्या प्रसंगाचे वर्णन करताना लिहितात, “डॉ. चिंतामणराव देशमुखांचे लोकसभेतील भाषण ऐकताना अनेक लोकसभा सभासदांना अंगावर कंप उठल्यासारखे वाटत होते. देशमुखांनी जवळ जवळ ३० मिनिटे भाषण केले. अगदी निर्विकार स्वरात. निर्भेळ सत्याखेरीज त्यांच्या भाषणात दुसरे काही नव्हते. पण ते सत्य इतके भयानक होते की त्यामुळे सगळेच गारद झाले. उभ्या हयातीत नेहरूंना शेकडो लोकांसमक्ष इतके स्पष्ट कोणीही सांगितले नव्हते की, तुम्ही नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे एक हुकूमशहा आहेत म्हणून..!” देशमुखांच्या भाषणाचे शेवटचे शब्द तर संस्मरणीय होते. ते आपल्या भाषणात नेहरूंना उद्देशून शेवटी म्हणाले, “हिंसेचे नियंत्रण न्यायाने आणि समजूतदार वागण्याने होते. मुंबईबाबत ज्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या आक्रमक अहिंसेने भारताच्या ऐक्याला धोका पोहोचणार आहे.”
पंडित नेहरूंनीही डॉ. चिंतामणराव देशमुखांचे मुंबईच्या प्रश्नावरील हे ऐतिहासिक भाषण अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले आणि नंतर त्यांना राजीनाम्याचा त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. असे हे सगळे एका वेगळ्याच उंचीचे नेते होते.
जेव्हा देशमुखांचे या राजीनाम्यानंतर अभिनंदन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचे आचार्य अत्रे, एसेम जोशी, बी टी रणदिवे, दत्ता देशमुख इत्यादी नेते त्यांच्या घरी गेले गेले तेव्हा, डॉ. चिंतामणराव देशमुख त्यांना म्हणाले, “आतापर्यंत महाराष्ट्रातले कित्येक लोक वीरश्रीच्या मोठमोठ्या वल्गनाच करीत होते. आम्ही राजीनामे देतो, आम्ही लढतो, आम्ही असे करतो, आम्ही तसे करतो पण प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची मात्र कोणाचीच तयारी नाही. या संग्रामाचा पहिला बळी पडण्याची संधी मला मिळाली हेच मी माझे भाग्य समजतो. महाराष्ट्राचा लढा हा केवळ प्रांतीय लढा नसून महाराष्ट्राच्या तीन कोटी जनतेची सेवा म्हणजे या देशाचीच ही सेवा आहे असे मी मानतो” असे होते डॉ. चिंतामणराव देशमुखांचे मुंबई आणि महाराष्ट्रावरचे प्रेम.
मुंबई हा महाराष्ट्राचा आर्थिक प्राण आहे हे डॉ. देशमुखांनी त्या वेळी ओळखले होते. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातच असावी याकरिता ते अतिशय आग्रही होते. मुंबईच्या त्यावेळच्या १३ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर गुजरात आणि केंद्र यांचा डोळा होता पण देशमुखांच्या राजीनाम्यामुळे केंद्राला व नेहरूंना मुंबईला केंद्रशासित करणे अशक्य झाले.
यानंतर भारत सरकारने डॉ. चिंतामणराव देशमुखांना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे अध्यक्ष केले. नाममात्र १ रुपया वेतनावर त्यांनी या पदावर काम केले. त्याच काळात त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना मानाचे असे आंतरराष्ट्रीय ‘रॅमन मॅगसेसे अवॉर्ड’ देण्यात आले.
पुढे १९६८ मध्ये त्यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली. पण त्यात ते अपयशी ठरले. नंतर १९७४ मध्ये त्यांना व त्यांची पत्नी दुर्गाबाई यांना भारत सरकारने “पदमविभूषण” या पुरस्काराने सन्मानित केले.
साहित्यिक सी. डी. देशमुख
देशमुख यांचे मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी कवि कुलगुरू कालिदासाच्या मेघदूताचे मराठीतून भाषांतर केले. भारताची आर्थिक प्रगती, बुद्धाचे धम्मपद, अमरकोशातीलकाव्यरत्ने, संस्कृत काव्यमाला, रवींद्र वंदना ही पुस्तके प्रकाशित केली. महात्मा गांधी यांच्या निवडक शंभर कविता संस्कृत मध्ये भाषांतरित केल्या. रवीन्द्रांच्या निवडक बंगाली कवितांचे मराठीत भाषांतर केले. त्यांचे आत्मचरित्र सुध्दा प्रकाशित झाले आहे. इंग्रजी भाषेत त्यांची विविध विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत .
सी. डी. देशमुख यांचे स्मारक व्हावे
डॉ .चिंतामणी देशमुख यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील त्यांचे आजोबा (आईचे वडील) रावसाहेब बळवंतराव महागावकर यांच्या “नाते” या गावी असलेल्या घरी झाला.
सध्या हे घर ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या सहकाऱ्याने रायगड जिल्हा परिषद अथवा महाराष्ट्र शासनाने स्मारक बांधले तर पुढच्या पिढीला त्यांची माहिती व महती कळू शकेल. मुंबई व महाराष्ट्राच्या प्रेमाखातर ज्या सी.डी. देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांना खरे तर महाराष्ट्रतील ज्या नेत्यांचे दिल्लीत वजन आहे अशा नेत्यांनी “भारतरत्न” पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न केला असता. कमीत कमी “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी सुध्दा सर्व मुख्यमंत्र्यानी गमावली आहे. अजूनही ज्या नेत्यांना सी.डी. देशमुख यांच्या बद्दल आदर आहे त्यांनी मरणोत्तर भारत रत्न अथवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना द्यावा. त्याचप्रमाणे सी.डी.देशमुख यांचे रायगड जिल्ह्यातील महाड जवळील नाते गांव तसेच ज्या रोहा गावात त्यांचे शिक्षण झाले व इंग्लंड येथे आपल्या बंगल्याला रोहा नांव देऊन गावाचा सन्मान केला त्या रोहा येथे सी.डी.देशमुख यांचे भव्य स्मारक उभे करावे. त्यासाठी रायगड जिल्यातील खासदार व सर्व आमदार यांनी प्रयत्नं करावा ही अपेक्षा.
डॉ सी.डी.देशमुख यांना विनम्र अभिवादन.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत, जि .रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800