जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतीच भारत सरकारने पद्मश्री जाहीर केली आहे. या निमित्याने त्यांना गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा “महाराष्ट्र भूषण” हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर आपल्या “चित्र सफर” याच सदरात २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला आणि श्री नागेश शेवाळकर यांनी लिहिलेला लेख, काही नवी भर घालून आज पुनश्च प्रसिद्ध करीत आहे.
श्री अशोक सराफ यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
– संपादक
एका चित्रपटाचे छायाचित्रिकरण सुरू असताना एक मुलगी तिच्या वडिलांसोबत तिथे आली होती. तिचे वडील छायाचित्रकार होते. तिथे एका व्यक्तिच्या अवतीभवती बरेच लोक फिरत होते. ती व्यक्तिही सर्वांसोबत हसतखेळत, बोलत होती. त्या मुलीने वडिलांना त्या व्यक्तिबद्दल विचारले असता वडील म्हणाले, “ते तुझे मामा…”
तेव्हापासून मराठी चित्रपटात कसदार, दमदार आणि नानाविध भूमिका सहजतेने साकारणारे अशोक सराफ हे ‘अशोकमामा’ या नावाने ओळखले जाऊ लागले आणि कोट्यवधी रसिकांच्या हृदयी विराजमान झाले.
अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत ०४ जून १९४७ रोजी झाला. त्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत अशोककुमार या नटाची विशेष मोहिनी होती. त्यामुळे सराफ कुटुंबीयांनी बाळाचे नाव ‘अशोक’ ठेवले. योगायोग असा की, भविष्यात अशोककुमार यांच्या तोडीसतोड अभिनय मराठमोळ्या अशोक सराफ यांनी केला.
अशोक यांचे बालपण चिखलवाडी परिसरात फुलले. त्यांचे वडील आयात- निर्यातीचा व्यवसाय करीत असत. अशोक यांचे शिक्षण डीजीटी विद्यालयात झाले. त्यांना अभिनयाची आवड होती परंतु वडिलांची इच्छा अशोकने चांगले शिक्षण घ्यावे आणि छानशी नोकरी करून आरामात जीवन जगावे अशी होती. अशोक सराफ यांनी वडिलांच्या इच्छेचा मान राखून बॅंकेत दहा वर्षे नोकरी केली. पण आपली आवड ओळखून ही नोकरी करीत असतानाच अभिनयही सुरूच ठेवला.
भविष्यात अशोक सराफ यांचा चित्रपट क्षेत्रात चांगला जम बसला. नाव लौकिकाबरोबरच चांगले मानधन मिळू लागल्याने तसेच रसिकांना त्यांचे काम आवडू लागल्याने त्यांच्या वडिलांचा विरोध मावळला. ते पाहून अशोकमामांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित केले.
अशोक सराफ यांच्या अभिनयाची सुरुवात ज्येष्ठ लेखक वि.स.खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीवर आधारित नाटकापासून झाली. या नाटकात मामांनी एका विदुषकाची भूमिका साकारली.तेव्हापासून त्यांच्या कडे अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका येऊ लागल्या आणि त्या त्यांनी सक्षमपणे साकारल्या.
अर्थात अशोक मामांनी जशा खुसखुशीत विनोदी भूमिका केल्या तितक्याच सक्षमतेने त्यांनी खलनायक, प्रेमळ, कठोर अशा विविधांगी भूमिकाही केल्या. अशोकमामा म्हणजे विविधांगी भूमिकांचा सम्राट अशी ओळख सर्वदूर पोहोचली. रसिकांसोबत चित्रपटनगरीतील अनेक मान्यवरांनी त्यांच्या भूमिकांची स्तुती केली. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार जेव्हा सराफांची पाठ थोपटून ‘क्या गजबकी टायमिंग है आपकी !’ असे प्रशंसोद्गार काढले होते, यातच सारे काही आले आहे.
अशोक सराफ यांनी अडीचशे पेक्षा अधिक मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचे एक वाक्य अत्यंत लोकप्रिय झाले. ‘धुमधडाका’ या चित्रपटात ते महेश कोठारे यांचे वडील म्हणून ‘धनाजी वाकडे’ ह्यांना भेटायला जातात. तिथे बागकाम करणाऱ्या एका गृहस्थाशी त्यांची भेट होते. त्या गृहस्थाला माळी समजून ते धनाजी वाकडे कोण आहेत असे हातातील पाईपचा झुरका घेत विचारतात आणि ‘मीच धनाजी’ असे उत्तर मिळताच सराफ यांची अवस्था बिकट होते आणि त्यांच्या मुखातून ‘वाख्या… वाख्या…’ असे खोकलायुक्त शब्द निघतात ते शब्द रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत.
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी अशोकमामांची विनोदी भूमिकांची नाळ खूप छान जुळली होती. सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अशोकमामा हवे असतात ही आहे मामांच्या अभिनयाची जादू!
अशोक सराफ यांनी अनेक नायिकांसोबत नायकाची भूमिका बजावली आहे. एकदा त्यांची ओळख निवेदिता जोशी या नायिके सोबत झाली. निवेदिता यांचा शांत, पावित्र्यमय चेहरा पाहून त्यांना त्या आवडल्या. दुसरीकडे मामांचे अभिनय कौशल्य आणि सहज वावर ह्या गोष्टींमुळे निवेदिताही त्यांच्याकडे आकर्षित झाल्या. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली. निरागस मैत्री फुलत असताना ते गोव्याच्या मंगेशीदेवीच्या मंदिरात जात. तिथे प्रेमाची कबुली देताना भविष्यातील स्वप्ने रंगू लागली. मंगेशीदेवी ही सराफ कुटुंबीयांची कुलदेवी आहे. दोघांनी आपापल्या घरी जोडीदार निवडीची कल्पना दिली, त्यावेळी निवेदितांच्या आईला ते आवडले नाही. त्यांना निवेदिताने अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलाशी लग्न करू नये असे वाटत होते. परंतु, निवेदिताची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी पुढाकार घेऊन आईची समजूत काढली. त्यामुळे अशोक- निवेदिता हे दोघे मंगेशीदेवीच्या मंदिरात देवीच्या साक्षीने लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. गेली अनेक वर्षे उभयतांचा संसार सुखमय, आनंदमय आणि भरभराटीचा सुरू आहे.
रंगमंचावर काम करताना अशोक सहकलाकारांना आपल्यामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्ष असतात. एकदा एका चित्रपटाचे छायाचित्रिकरण सुरू असताना अशोकमामांची मान दुखावली. सोबत एक मलम असूनही तो न वापरता ते काम करत राहिले. नंतर त्यांनी सांगितले की, त्या मलमाचा वास खूप उग्र असल्याने तो इतरांना सहन होणार नाही म्हणून मी तो वापरला नाही.
मध्यंतरी एकदा शर्टच्या वरच्या बाजूची दोन बटणे न लावण्याची फॅशन होती. ती सराफ यांच्या पथ्यावर पडली. कारण शर्टची सर्व बटणे लावली तर अशोकमामांना गुदमरल्यासारखे होत असे. त्यामुळे त्यांच्या काही चित्रपटात शर्टची वरची दोन बटणे उघडी असल्याचे आपणास दिसून येते.
अशोक सराफ यांचे लाखो रसिकांच्या हृदयावर राज्य आहे. ते प्रेक्षकांचे आवडते कलाकार आहेत. शिवाय मराठी चित्रपटात ‘बिग बी’ म्हणून त्यांच्याकडे परंतु पाहिले जाते. अशोक सराफ यांचे आवडते दिग्दर्शक म्हणजे शांताराम बापू आणि राजाभाऊ परांजपे हे आहेत.
अशोकमामा यांचे आवडते छंद प्रवास आणि संगीत ऐकणे हे आहेत.
आजचे युग भ्रमणध्वनीवरील विविध माध्यमांच्या आहारी गेलेले आहे. परंतु अशोकमामा या माध्यमांपासून दूर आहेत. आलेला फोन उचलणे आणि फोन करणे एवढीच त्यांची भ्रमणध्नीशी बांधिलकी आहे.
उत्कृष्ट अभिनय, सहजसुंदर विनोदाची पखरण, चेहऱ्यावरील हावभाव, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये आहेत. अशा या हरहुन्नरी आणि रसिकांनी गौरविलेल्या नायकाला शोधत अनेक पुरस्कार आले. त्यात प्रामुख्याने फिल्मफेअर पुरस्कार मराठीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता, पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, सवाई हवालदार या चित्रपटासाठी स्क्रीन अवॉर्ड, मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकारचे अनेक पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार इत्यादी अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या वर्षी त्यांना ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर
या वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या चाहत्यांना झालेला आनंद अवर्णनीय आहे. सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ जोशी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. त्या म्हणाल्या, “हा एकट्या अशोकचा सन्मान नाही तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे. कारण त्यांनी नेहमीच अशोकवर, त्याच्या अभिनयावर प्रेम केलं. अशोकने नेहमी एकाग्रतेने, मेहनतीने अभिनय एके अभिनयच केला. त्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची, जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा सर्व कुटुंबियांसाठी खूप आनंदाची बाब आहे.”
अशोक सराफ यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या, “सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरश: उचंबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता संबंध भारताचा पुरस्कार मिळाला. हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे. मी चांगलं काहीतरी करतोय यावर शिक्काच मिळाला आहे.” मराठी रसिकांची मनोमन इच्छा आहे की, आमच्या लाडक्या अशोकमामांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात यावे.
सर्वसाधारणपणे आईवडील ज्या क्षेत्रात कार्यरत असतात मुलेही तेच क्षेत्र निवडतात किंवा त्यांनी तेच क्षेत्र निवडावे, अशी आई वडिलांची तरी अपेक्षा असते. परंतु अशोक – निवेदिता यांचा मुलगा अनिकेत ह्याने स्वतःची आवड ओळखून हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग आर्ट हा अभ्यास क्रम पूर्ण केला आणि शेफ म्हणून आपले करिअर निवडले.
आता मराठी रसिकांची मनोमन इच्छा आहे की, लाडक्या अशोकमामांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या “दादासाहेब फाळके पुरस्कार” या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे. अशोकमामा यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा !
— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद, सर!
अत्यंत आकर्षक स्वरूपात लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे!!