Wednesday, December 4, 2024
Homeयशकथापद्मश्री उषा बारले

पद्मश्री उषा बारले

गायिका उषा बारले यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.

कापालिक शैलीतील पांडवानी गायिका उषा बारले यांचा जन्म २ मे १९६८ रोजी भिलाई येथे झाला. उषा ही त्यांच्या घरात मोठी मुलगी होती. वडिलांना 50 वर्षांनंतर दुसऱ्या पत्नीपासून मूल झाले. म्हणूनच त्यांनी उषा दोन वर्षांची असतांना तिचे लग्न करून दिले जेणेकरून तिचा नवरा त्यांच्या पश्चात तिचा आधार बनू शकेल. उषा आजूबाजूची मुले आणि आपल्या पतीसोबत विटी-दांडू, धावाधावी इ.खेळ खेळत मोठी झाली आणि त्याच्यासोबत पांडवानी शिकली. परिसरातील मुलांसोबत खेळताना ती लाकूड चिकारा समजून खेळायची आणि मग पांडवानी गायची. तिचे काका आणि गुरू महेत्तर दास बघेल यांनी तिचे गाणे पाहिले तेव्हा ते म्हणाले की ही मुलगी काहीतरी करेल.

उषा बरले यांनी सांगितले की, त्यांचे वडील खानसिंग जांगडे यांना त्यांच्या मुलीने कलाकार व्हावे असे वाटत नव्हते. ते स्वतः नाच-गाण्याचे कलाकार होते. ते म्हणायचे की कलाकाराचे जीवन संघर्ष आणि गरिबीने भरलेले असते. उषा ही मुलगी आहे, ती कुठे जाणार, कशी धडपडणार. वयाच्या ७ व्या वर्षी जेव्हा उषाने शाळेतील एका कार्यक्रमात पहिला परफॉर्मन्स दिला तेव्हा तिचे वडील खूप रडले. त्यांनी मुलीला गाणे गाण्यास बंदी घातली. उषाने गाणे म्हणण्याचा अतोनात हट्ट केल्यावर त्यांनी तिला विहिरीत फेकून दिले. आजूबाजूच्या लोकांनी व तिची आई धनमतबाई यांनी तिला विहिरीतून बाहेर काढले व वडिलांना समजावले. त्यानंतर त्यांनी मुलीला पुढे जाण्याचे आशीर्वाद दिले आणि आपल्या चुकीबद्दल पश्चातापही व्यक्त केला.

यानंतर उषाने परिसरातील अनेक मुला-मुलींसोबत पांडवानी शिकवायला सुरुवात केली. या मुलांमध्ये तिचा पती अमरदास बारले यांचाही समावेश होता. तिने गुरूंच्या उपस्थितीत पांडवानी गाण्यास सुरुवात केली आणि नंतर प्रसिद्ध पांडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाईंकडून कलेतील बारकावे शिकून घेतले. आजवर केवळ छत्तीसगडमध्येच नाही तर न्यूयॉर्क, लंडन आणि जपान देशांसह १२ हून अधिक देशांमध्ये त्यांनी पांडवानी सादर केला आहे.

उषा १० वर्षांची असतांना तिच्या वडिलांचे निधन झाले. उषा खूप रडत होती. त्या दिवशी तिची आई घरी नव्हती. कॉलनीतील लोकांनी मृतदेह घरात ठेवला होता. आई आल्यानंतर अंत्यसंस्कार करायचे असे तिला सांगितले. रात्री घरातील भैय्या बिसाहू राम बघेल यांनी वाद्य बाहेर काढले आणि नोनी तू गा असे म्हटले. वडिलांच्या मृतदेहासमोर बसून रात्रभर ती पांडवानी गात राहिली, ही आठवण सांगतांना आजही त्यांचे डोळे भरून येतात.

पांडवानी – म्हणजे पांडवकथा, म्हणजेच महाभारताची कथा. या कथा छत्तीसगडमधील गोंडजातीच्या पोटजाती असलेल्या परधान आणि देवार जातींची गायन परंपरा आहे. या दोन्ही जातींच्या बोलण्यात आणि वाद्यांमध्ये फरक आहे. परधान जातीतील कथा सांगणार्‍या किंवा वाचकाच्या हातात “किंकणी” असते आणि देवरांच्या हातात रुंझू असते. परधान आणि देवरांनी पांडवानी लोककथा संपूर्ण छत्तीसगडमध्ये पसरवली.

तिजनबाईंनी पांडवानीस आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी मिळवून दिली. परधान जातीचे गायक आपापल्या यजमानांच्या घरी जाऊन पांडवानी म्हणायचे. तशाच प्रकारे पांडवानी हळूहळू छत्तीसगडच्या लोकांच्या मनामध्ये रुजली, प्रिय झाली. परधान गायक नेहमी गोंड राजांची स्तुती आणि शौर्यगाथा गात असत. गोंडांचा भूतकाळ त्यांच्या गाण्यातून जिवंत झाला आहे. काही लोक परधान यांना गोंडांचा कवी म्हणतात.

परधान जातीतील पांडवानी हे महाभारतावर आधारित गोंड पुराणकथांचे मिश्रण आहे. महाभारताचा नायक अर्जुन आहे तर पांडवाणीचा नायक भीम आहे. पांडवांचे सर्व संकटांपासून रक्षण करणारा भीमच आहे. पांडवानीमध्ये कुंतीला माता कोतमा आणि गांधारीला गन्धारिन म्हणतात. यांत गांधारीचे एकवीस पुत्र सांगितले आहेत. पांडवानीमध्ये दाखवलेले महाभारताचे क्षेत्र फक्त छत्तीसगड आहे. पांडवांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाला जैतनगरी असे म्हणतात. कौरवांच्या निवासस्थानाला हसनानगरी म्हटले जाते.

पांडवाणीमध्ये पांडव आणि कौरव दोघेही पशुपालक आहेत. पांडव आणि कौरव प्राणी चरायला जात असत. जनावरांमध्ये गायी, शेळ्या, हत्ती यांचा समावेश होता.कौरव नेहमी अर्जुनाच्या खोड्या काढायचे आणि केवळ भीमच कौरवांना धडा शिकवायचा.
पांडवानीमध्ये महाभारताच्या युद्धाचे वर्णन महाधन युद्ध असे केले आहे.या युद्धाच्या संदर्भात द्रौपदीची विचारसरणी अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

पांडवनी करायला कोणत्याही सणाची किंवा उत्सवाची गरज नाही. पांडवानी कधीही कुठेही आयोजित करू शकतात. कधीकधी पांडवानी अनेक रात्री सतत चालू असते. सध्या पांडवानी गायक हातात डफ घेऊन रंगमंचावर फेरफटका मारतात आणि कथा सादर करतात. डफ कधी भीमाची गदा बनते तर कधी अर्जुनाचे धनुष्य. संगतीचे कलाकार अर्धवर्तुळात मागे बसतात. त्यापैकी एक “रागी” आहे, जो हुंकार भरत गातो आणि मनोरंजक प्रश्नांद्वारे कथा पुढे नेण्यास मदत करतो.

पांडवानीच्या दोन शैली आहेत – कापालिक आणि वेदमती. कापालिक शैली जी गायकाच्या स्मृतीमध्ये किंवा “कपाल” मध्ये अस्तित्वात आहे. कापालिक शैलीतील प्रसिद्ध गायिका म्हणजे तिजनबाई, शांतीबाई चेलकणे, उषाबाई बारले. वेदमती शैली शास्त्रावर आधारित असून खडी भाषेतील सबलसिंग चौहान श्लोक स्वरूपात यांच्या महाभारतावर आधारित आहे तर कापालिक शैली वाचक परंपरेवर आधारित आहे.

गुरू घासीदास यांचे चरित्र पहिल्यांदा पांडवानी शैलीत सादर करण्याचे श्रेय उषाजींना दिले जाते. पांडवानीसाठी २०१४ मध्ये त्यांना छत्तीसगड राज्य सरकारने गुरू घासीदास पुरस्कार प्रदान केला आहे. भिलाई स्टील प्लांट मॅनेजमेंटतर्फे दाऊ महासिंग चंद्राकर सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गिरोधपुरी तपोभूमीमध्ये त्यांना सहा वेळा सुवर्णपदकेही मिळाली आहेत.

पद्मश्री मिळाल्याच्या वृत्ताने कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. उषाजी म्हणाल्या की, २५ जानेवारी २०२३ रोजी जेव्हां त्यांचे नांव पद्मश्री पुरस्कारासाठी जाहीर झाले, तेव्हां विश्वास बसत नव्हता की, इतका मोठा सन्मान आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यांनी सांगितले की ही बातमी मिळताच पती, मुलगा आणि मुलगी या सर्वांनी अश्रू ढाळले आणि एकमेकांना मिठी मारली. सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले. आपल्या कलेला हा सन्मान दिल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची आभारी असल्याचे त्या सांगतात.

उषाजींचे पती अमरदास बारलेही पांडवानी गातात. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या उषाजींचा छत्तीसगड राज्याच्या आंदोलनातही सहभाग होता आणि १९९९ मध्ये वेगळ्या राज्यासाठी दिल्लीत झालेल्या निदर्शनादरम्यान त्यांना अटकही करण्यात आली होती. वयाच्या सातव्या वर्षांपासून केवळ पांडवानीच नव्हे तर छत्तीसगढ येथील पारंपरिक गाणी, तसेच लोकसंगीतही गात असलेल्या उषाजी सांगतात, “मी विनंती करते सर्वांना की, आपल्या देशातील प्रत्येक घरांत एखादी कला जोपासाच. एक तरी कलाकार प्रत्येक घरी हवा. कुटुंबाला तर ते आनंददायी पण आपली संस्कृती जपली जाईल. लोकसंगीतातून पुराणातील, इतिहासातील कथा मुलांना लहान वयात कळतील. त्यांच्यावर संस्कार होतांना कलेसाठी किती संघर्ष करावा लागतो हेही प्रत्येकाला कळेल आणि परस्परांबाबत आदर वृद्धिंगत होईल.” अर्थात हे त्या आपल्या भाषेत तळमळीने सांगतात त्यावेळी त्यांचा चेहरा संगीताच्या आत्मीयतेने उजळून निघतो.

अशा गुणसंपन्न व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आपल्यालाही आनंद होतो. त्या कशा गातात याचे काही व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. उत्सुकता वाढली नां ? चला तर मग, मी थांबते येथेच, तुम्ही व्हिडिओ बघायला लागा.
(स्रोत:आंतरजाल)

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे, सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. तिजन बाईं बद्दल ऐकले होते, वाचले होते़, दूरदर्शनवर पाहीले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पद्मश्री पर्यंत मजल मारणे, सोपी गोष्ट नाही. मुळात असा पुरस्कार मिळावा या हेतूने हे कार्य केले नसावे. तर स्वयंस्फूर्तीने उषा बाई या पद्मश्री पुरस्काराप्रत पोचल्या, धन्य आहेत.
    आमच्या नीला ताई बर्वे यांनी असे तेजस्वी रत्न शोधून त्यावर अतिसुंदर आणि प्रेरणादायी लेख लिहिला, त्यांचे खुप खूप कौतुक. धन्यवाद

  2. Hatts of ti Ushatai! Khupach Sunder mahiti milali. Aapli sanskruti kitti vividhatene natali aahe n aaplya kade kiti umade kalakar aahet te aaj punha navyane dakhavalya baddal Neela tuze khup khup aabhar .🙏🥰

  3. तिजनबाईं बद्दल वाचले होते, ऐकले होते, दूरदर्शनवर पाहिले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पद्मश्री पर्यंत मजल मारणे, सोपी गोष्ट नाही, मुळात असा पुरस्कार मिळावा या हेतूने हे कार्य केले नाही तर स्वयं स्फुर्ती ने उषा बाई पद्मश्री पुरस्कारा पत पोचल्या, धन्य आहेत.
    आमच्या नीला बर्वे ताई यांनी असे तेजस्वी रत्न शोधून त्यावर अती सुंदर आणि प्रेरणादायी लेख लिहिला, त्यांचे खुप खूप कौतुक. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments