ज्या व्यक्तीची लहानपणापासून तरुण होईपर्यंत फक्त दु:खाशी गाठ पडली असेल ती व्यक्ती आज ९०० करोडच्या कंपनीची मालकीण आहे हे खरंच अविश्वसनीय वाटतंय ना ?
पण जर एक महिला जिद्दीने, खंबीरपणे चालायला लागली तर ती अशक्याला ही शक्य करून दाखवते. हे कळतं कल्पना सरोज यांच्याकडे बघून.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रोपरखेला या गावात कल्पनाचा जन्म झाला. तीन बहीणी आणि दोन भाऊ, आई, वडील असं हे कुटुंब. वडील कॉन्स्टेबल होते. घरात तशी गरीबीच होती. कल्पना शाळेतून आल्यावर, शेण गोळा कर, शेतात काम कर असं काहीसं करून घरखर्चाला हातभार लावायची.
कल्पना दलित असल्याने शाळेत तिच्यासोबत भेदभाव व्हायचा. कार्यक्रमात ही ती भाग घेऊ शकत नव्हती. शाळेतील पोरा पोरींचे आईवडील तिला घरात घेत नसायचे. या सगळ्यांचा तिच्या बालमनावर परिणाम व्हायचा आणि मग ती रडत बसायची.
कल्पनाच्या भाग्यात शिक्षण ही नव्हतंच. नातेवाईकांच्या टोमण्यांमुळे कल्पनाचे शिक्षण थांबवून वयाच्या अकराव्या वर्षी तिचं लग्न, तिच्यापेक्षा दहा वर्षाने मोठ्या असलेल्या माणसासोबत लावून दिलं गेलं आणि कल्पना लग्नानंतर मुंबईच्या झोपडपट्टीत पोहोचली.
सासरी कल्पनावर खूप अत्याचार झाले. सतत मार झोड, उपाशी ठेवणं हे प्रकार सुरू झाले. मार खाऊन तिच्या अंगभर जखमा झाल्या होत्या. तशातच एक दिवस तिचे वडील तिला भेटायला आले आणि आपल्या कृशकाय आणि जखमी मुलीला बघताच ते तसेच तिला घेऊन गावी निघून आले.
गावातील लोकांना हे मुळीच आवडलं नाही. गावचे लोक येताजाता तिला टोमणे मारायचे. अशा या सर्व परिस्थितीमुळे कल्पना अतिशय निराश झाली होती. तिला जगण्यात काही स्वारस्य वाटत नव्हतं. निराशेच्या खोल गर्तेत गेलेल्या कल्पनाने आपल्या आत्याकडे जाऊन गुपचुप कीटकनाशकांच्या तीन बाटल्या पोटात घेतल्या पण तिच्या तोंडातून येणारा फेस आणि थरथरतं शरीर बघताच आत्या तिला ताबडतोब दवाखान्यात घेऊन गेली आणि तिचा जीव वाचवला.
या प्रसंगानंतर मात्र कल्पनाने ठाम निर्धार केला की जर मला दुसरं जीवन लाभलं आहे तर आता काहीतरी करून दाखवायचच. तिला थोडं बहुत शिवणकाम येत होतं. ती पुन्हा मुंबईला आपल्या काकांकडे आली. काकांनी तिला एका गारमेंट कंपनीत नोकरीला लावून दिलं. तिथे कल्पनाला दोन रुपये रोज अशी मजुरी मिळायची. काही दिवसाने तिने “ज्योतिबा फुले” योजने अंतर्गत एक शिवण मशीन विकत घेतली आणि ती घरीच कपडे शिवायला लागली. सतत १६-१७ तास काम करून ती थोडा पैसा आपल्यासाठी ठेवून बाकी पैसे गावी पाठवू लागली. त्यात तिच्या बहिणीला कैंसर झाला आणि उपचारा अभावी तिचा जीव ही गेला. कल्पनाला कळलं होतं की जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे.
पुढे कल्पनाने पैसे साठवून एक फर्नीचरचे दुकान काढले. एक ब्युटी पार्लर ही सुरू केलं. कल्पनाला कळलं की एक भूखंड खूप कमी किंमतीत विकला जातो आहे कारण तो न्यायप्रविष्ट होता. कल्पनाने पै,पै जोडून तो भूखंड विकत घेतला आणि न्यायालयाचा पाठपुरावा करत सारे अडथळे दूर केले. आता त्या भूखंडाची किंमत रातोरात वाढली होती. भूमाफियांनी तिला धमकवण्याचा प्रयत्न सुरू केला पण एव्हानं कल्पना चांगलीच निडर आणि खंबीर झाली होती. ती सगळ्यांना पुरून उरली.
पुढे एका बिल्डरच्या मदतीने, कल्पनाने एका बहुमंजिली इमारतीचं बांधकाम हाती घेतलं. त्यात तिला पाच कोटींचा फायदा झाला आणि तिने बांधकाम व्यवसायात प्रवेश केला.
मध्यंतरी १९८० मध्ये कल्पनाने एका व्यावसायिक समीर सरोज यांच्याबरोबर लग्न केलं खरं पण काही वर्षानंतर मात्र पतीचे निधन झाले.
रामजी हंसराज लखानी जे एक स्वतंत्रता सेनानी आणि मोठे उद्योजक ही होते, त्यांची कुर्ला येथे “कमानी ट्यूब्स व कमानी इंजिनियरिंग” नावाची ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी होती. त्यांच्या मरणोपरांत मुलांमध्ये संपत्ती विवाद वाढले. कोर्टात केस गेल्यावर कोर्टाने कंपनीची मालकी कामगार यूनियनकडे दिली. कंपनीचे दोन हजार मालक झाले होते. कंपनी धड चालली नाही आणि कर्ज करून काही महिन्यांत बंद पडली. या कर्जाच्या परतफेडीसाठी उच्च न्यायालयाने कंपनीचा लिलाव करण्याचे ठरवले.
कल्पनाकडे काम करत असलेल्या लोकांनी कल्पनाला ती कंपनी विकत घेण्याचा आग्रह केला. तिने कंपनीबद्दल माहिती काढली आणि शेवटी ती विकत घेण्याचं ठरवलं. कंपनी विकत घेणं काही सोपं नव्हतं. एकतर त्यावर असलेलं भरमसाट कर्ज आणि दुसरं शेकडो दावेदार. कल्पना सरोज यांनी २००० ते २००६ पर्यंत कोर्टाच्या चकरा मारून केस जिंकली आणि त्या कंपनीच्या सर्वेसर्वा झाल्या. अर्थमंत्री आणि कर्ज देणाऱ्या बैंकेशी बोलून कर्ज फेडण्यासाठी सात वर्षांची मुदत मागून घेतली. त्यातच त्यांनी पेनाल्टी आणि व्याज माफ करवून एक आणखी विजय मिळवला. यामुळे कर्जाची रक्कम अर्ध्यावर येऊन ठेपली. ही रक्कम कल्पनाने वर्षभरातच फेडली. इतकंच नाहीतर कामगारांचा थकित पगार ही दिला.
हा विक्रम घडवून आणला होता कल्पनाने. तोट्यात असलेल्या कंपनीला नफ्यात आणून ठेवलं होतं. आज त्याचं बाजार मूल्य करोडोत आहे.
आज त्या अनेक कंपन्या चालवतात. कमानी ट्यूब्स, कमानी स्टील, के.एस. क्रियेशन, कल्पना बिल्डर एण्ड डेव्हलपर, कल्पना एसोसिएट्स, या त्यातील काही.
ना कंपनी चालवण्या अनुभव, ना मैनेजमेंट सांभाळण्याचा. शिक्षण नाही, डिग्रीही नाही. कल्पना जवळ होती फक्त प्रचंड इच्छाशक्ती. या इच्छाशक्तीने त्यांना कुठेच थांबू दिलं नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्ट प्रमाणे, अनेकदा त्यांना मारण्याची सुपारीही दिली गेली पण त्यांनी कधीच नमतं घेतलं नाही. त्या म्हणतात,
“माणूस वी.आय.पी. डिग्री आणि फैंसी एम. बी. ए. ची डिग्री घेऊन उद्यमी बनत नाही. धैर्य, दृढता आणि विश्वासाची अलौकिक क्षमता त्याला उद्यमी बनवते.”
कल्पना DICCI च्या सदस्य आहेत. तसंच भारतीय महिला बैंकेच्या डायरेक्ट बोर्डावर ही आहेत.
कल्पना सरोज यांना सामाजिक कामात ही रस आहे त्यांनी एन.जी.ओ. सुरु केली आहे. त्यांची शिक्षणसंस्था ही आहे. दरवर्षी त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार ही देतात.
कल्पना सरोजने के. एस. नावाने एक प्रोडक्शन हाऊस ही सुरू केलं. “खैरलांजी” नावाचा एक मराठी चित्रपट ही काढला. कल्पना सरोज “स्लमडॉग मिलेनियम” ही म्हणवल्या जातात.
आपल्या दृढइच्छाशक्तीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना सरोज यांना वुमन एम्पावरमेंट कारकिर्दीसाठी भारत सरकारने २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
या महिला शक्ती कल्पना सरोज यांना सादर नमन.
— लेखन : राधा गर्दे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800