आयुष्यभर कुष्ठरोगाने ग्रासलेल्या लाखो रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर विजयकुमार विनायक डोंगरे यांचा जन्म मुंबई येथे २९ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. त्यांचे वडील विनायकराव मुंबईच्या टाकसाळीत लेबर ऑफिसर या पदावर होते. बदली झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी पुलगाव येथील दारुगोळा कारखान्यात आणि नंतर काही वर्षे देहू येथील आयुध निर्माण कारखान्यात काम करून पुन्हा मुंबईच्या टाकसाळीत रुजू झाले आणि तेथूनच सेवानिवृत्तही झाले.
डॉक्टर विजयकुमार यांचे शालेय शिक्षण दादर येथील बालमोहन विद्यामंदिरात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी रुईया महाविद्यालयातून इंटर सायन्स झाल्यानंतर त्यांनी वरळीच्या आर.ए.पोद्दार आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयातून ‘जी.एफ.ए.एम.’ अर्थात (ग्रॅज्युएट ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन) ही पदवी मिळवली.
डॉ विजयकुमार यांना ज्यावेळी पदवी प्राप्त झाली त्याचवेळी आपल्या देशाच्या उत्तर सीमेवर चिनी आक्रमण होऊन युद्धाचे वारे वाहू लागले. त्यामुळे लष्कराला अधिक डॉक्टरांची जरुरी भासली आणि तरुणांना थोड्या कालावधिसाठी लष्करात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली. नसानसात देशभक्ती असलेल्या डॉक्टर विजयकुमार यांनी यासाठी त्वरित अर्ज दाखल केला परंतु त्याकाळात आयुर्वेदशास्त्रातली त्यांची पदवी ही अशा नियुक्तीसाठी मान्यताप्राप्त पदवी नव्हती. त्यामुळे त्यांना या संधीचा लाभ मिळाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एक जाहिरात वर्तमानपत्रांत वाचली की, वडाळा येथील ‘अॅक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल’या निमशासकीय रूग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी हवे आहेत. तद्नुसार ते तिथे गेले, पण तिथेही आयुर्वेदातली त्यांची पदवीच त्यांच्या मार्गात पुन्हा एकदा आली. विजयकुमार खूपच निराश झाले पण तरीही एक प्रयत्न म्हणून ते रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना भेटले आणि आपल्याला त्यांच्या रुग्णालयात किमान तीन महिने काम करण्याची संधी द्यावी यासाठी कळकळीची विनंती केली. त्यांच्या आत्मविश्वास आणि रुग्णालयाची जरुरी यांची सांगड घालून त्यांना ही संधी देण्यात आली. त्यांचे कार्य, रुग्णांबद्दल वाटणारी आत्मीयता यामुळे विजयकुमार त्यानंतर ३४ वर्षे याच रुग्णालयात सेवा देत राहिले. त्याबरोबरच त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवत, एम.बी.बी.एस’ पदवी प्राप्त केली .त्यानंतर डिप्लोमा इन सोशल वेल्फेअर’ही पदविका मिळवली. शिक्षणाची आवड असल्याने जनसंपर्क आणि जाहिरात व्यवस्थापन आणि वैद्यकीय-कायदेशीर प्रणालींमध्ये पदव्युत्तर पदविकाही प्राप्त केल्या. या सर्व अभ्यासानुसार कुष्ठरोग्यांवरच्या उपचारपद्धती संदर्भात अत्यावश्यक असे सर्वंकष ज्ञान प्राप्त केले.
एक सेवाभावी डॉक्टर म्हणून अॅक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल’मध्ये नियम किंचित काळ बाजूला ठेवून काही काळासाठी दिल्या गेलेल्या संधीमधून रुजू झालेल्या विजय कुमार यांची याच रुग्णालयात ‘डेप्युटी सुप्रिटेन्डेन्ट’ म्हणून पदोन्नती झाली.
कुष्ठरोगाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर विजयकुमार यांनी आपले सारे आयुष्य वाहून घेतले. औषधोपचाराबरोबर त्यांच्याशी आत्मीयतेने वागून, त्यांना सर्वसामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगता येईल ही उमेद सतत देत त्यांचे मनोबल उंचावले. त्याच वेळी समाजामध्येही याविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात डहाणू-तलासरी, वाडा – मोखाडा, धुळे-नंदुरबार, गोंदिया-गडचिरोली अशा अनेक ठिकाणी व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली. (येथे असे रुग्ण बहुसंख्येने होते.) जनजागृतीसाठी सारा महाराष्ट्र पिंजून काढताना त्यांनी रुग्णांची मोफत तपासणी आणि औषधोपचार केंद्रे सुरू केली. त्यांच्या कार्याची दखल समाजही घेत होता. पेण जवळील तारा गावातल्या ‘युसुफ मेहेरअली सेंटर’ मध्ये रुग्णसेवा करण्यासाठी त्यांना आग्रहाने बोलवण्यात आले आणि त्यांनीही तेथे भरपूर काम केले. समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कार्यास पाठिंबा दिला.

‘पद्मश्री’ डॉ. रामचंद्र विश्वनाथ वारदेकर, एम.डी. (पॅथॉलॉजी) आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रमिला वारदेकर, एम.डी. (गायनॅकॉलॉजी), यांनीही कुष्ठरोग्यांशी संबंधित प्रचंड कार्य केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार, नोकरीतून सेवानिवृत्त होताच डॉक्टर विजयकुमार एकही क्षण वाया न घालवता, रातोरात वर्ध्याला निघून गेले आणि सेवाग्राममधल्या न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे अध्यक्ष असलेल्या गांधी ‘मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन’ची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तेथे जवळजवळ ८ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते.
डॉक्टर विजयकुमार यांनी कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या विविध संस्थांमध्ये पुढीलप्रमाणे अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ती अशी..अध्यक्ष; राष्ट्रीय कुष्ठरोग संघटना (NLO), सचिव; सोसायटी फॉर द एरॅडिकेशन ऑफ लेप्रसी, मुंबई वरिष्ठ सल्लागार; LEAP, (अलर्ट-इंडिया) अध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रोलॉजिस्ट (महाराष्ट्र शाखा) सचिव, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघ, पुणे; सचिव, हिंद कुष्ट निवारण संघ, महाशाखा प्रकाशने; सचिव. तसेच दिल्लीच्या ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन’चे ते चार वर्षे अध्यक्ष होते. याच संस्थेतर्फे प्रसिद्ध होणार्या ’हेल्थ फॉर मिलियन्स’ या पत्रिकेच्या कुष्ठरोग विशेषांकाचे त्यांनी संपादनही केले.
कुष्ठरोग्यांच्या समस्यांवर शासनाला उपाययोजना सुचवण्यासाठी रा.सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली १९८१ साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे डॉक्टर विजयकुमार एक सन्माननीय सदस्य होते. कुष्ठरोग्यांना समाजाकडून नेहमीच मिळणारी हेटाळणीची आणि अपमानजनक वागणूक आणि त्यापासून मानवी हक्क संरक्षण कायद्यान्वये कुष्ठरोग्यांना मिळू शकणारे संरक्षण यावर प्रकाश टाकणारी एक पुस्तिका ‘युनिसेफ’ने प्रसिद्ध केली होती.तिचा मराठीत अनुवाद डॉक्टर विजयकुमार यांनी करून तो प्रकाशित केला. तसेच कुष्ठरोगाच्या गेल्या अडीच हजार वर्षांच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकणारी एक संशोधनपर पुस्तिकाही त्यांनी लिहून प्रकाशित केली.
डॉक्टरांनी कुष्ठरोग निर्मूलनाशी संबंधित अनेक संशोधन पत्रे प्रकाशित केली आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांसह सहलेखन केलेल्या काही संशोधन प्रकाशनांचा उल्लेख गुगल स्कॉलर पोर्टलमध्ये करण्यात आला आहे. कुष्ठरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांनी कुष्ठरोगावर ५२ पुस्तिका लिहिल्या आणि त्यांचे वाटपही केले.डहाणू-कोसबाडच्या वनवासी भागात दौरे करत असताना ते श्यामराव आणि गोदुताई परुळेकर यांच्या संपर्कात आले. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याने ते अधिक उत्साहित झाले.
डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा एक जिवलग मित्र तरुण वयात अकाली निधन पावला, तेव्हां निराधार झालेल्या त्याच्या पत्नीशी डॉ. डोंगरे यांनी दि. ३१ मार्च, १९७६ रोजी रीतसर विवाह करून तिला आधार दिला आणि त्याचबरोबर तिच्या दोन्ही मुलांचे पालकत्वही स्वीकारले. त्यावेळी ते ३७ वर्षांचे होते. त्यांच्या या कुटुंबवत्सल आणि गृहकृत्यदक्ष धर्मपत्नी, सीमन्तिनी डोंगरे (माहेरच्या प्रतिभा अनंत कारखानीस) यांनी त्यांना उत्तम साथ दिली. त्यांचे स्वतःचे सुपुत्र डॉ. हिमांशु डोंगरे हे ‘एम.डी.’ (अॅनेस्थेशिया) असून, पुण्यात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर स्नुषा डॉ.अदिती डोंगरे या ‘क्ष किरणतज्ज्ञ’ अर्थात ‘रेडिऑलॉजिस्ट’आहेत.

डॉ विजयकुमार यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच त्यांना मिळालेल्या सन्मानांची आणि पुरस्कारांची यादीही लांबलचक आहे. सेवाग्रामच्या गांधी ‘मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन’ तर्फे दर दोन वर्षांनी दिले जाणारे ‘इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड’ डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे यांना २०१३ या वर्षासाठी जाहीर झाले .ते प्रत्यक्षात दि. १४ फेब्रुवारी, २०१४ रोजी महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. विजयकुमार यांना ‘इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रॉलॉजिस्ट’(२०२१), ‘रोटरी क्लब नागपूर’, ‘लायन्स क्लब मुंबई’ अशा अनेक संस्थांनी जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

काही अंदाजानुसार, १९८१ मध्ये भारतात अंदाजे ४० लाख कुष्ठरोगी होते, परंतु डॉ.डोंगरे आणि इतरांच्या प्रयत्नांनंतर ही संख्या ८३,००० पर्यंत कमी झाली आहे. खरोखर लाखो कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे, त्यांना रोगमुक्त करून, आत्मविश्वास देणारे, त्यासाठी समाजाचे मतपरिवर्तन करण्यासाठी झटणारे, अनुभवी त्वचारोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सेवेची दखल घेऊन २०२२ मध्ये, भारत सरकारने विजयकुमार विनायक डोंगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी पद्म पुरस्कार मालिकेतील तिसरा सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. नुकतीच आपल्या वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेले डॉ.विजयकुमार डोंगरे हे गेल्या १५ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत परंतु आजही ते “द सोसायटी फॉर एरेडिकेशन ऑफ लेप्रसी, मुंबई,” शी संलग्न आहेत आणि सोसायटीचे मानद सचिव म्हणून काम करत आहेत.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे, असे मानून त्यांनी आपले सारे आयुष्य केवळ आणि केवळ कुष्ठरोगाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांवर उपचार करून त्यांना सन्मानाने जगण्यास मदत करणाऱ्या या सेवाव्रती, वयोवृद्ध, तपोवृद्ध, कर्मयोगी, डॉक्टरांच्या त्यांचे नांव सार्थ करीत केलेल्या डोंगराएव्हढेच नव्हे पर्वताएव्हढे केलेल्या कार्याने स्तिमित होतो, प्रचंड आदर वाटतो त्याचवेळी हे आमच्या महाराष्ट्राचे, मराठी माणूस म्हणून अतीव अभिमानही वाटतो.
जयहिंद, जय महाराष्ट्र !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
(स्रोत:आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800