अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांना नुकतीच पद्मश्री प्रदान करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या कॉलेज जीवनात, त्यांच्या सोबत क्रिकेट खेळलेले,
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव जयंत येलूलकर यांनी व्यक्त केलेल्या हृद भावना….
पोपटराव पवार…
क्रिकेट मैदानावरील आमचा ज्येष्ठ सहकारी खेळाडू..
अहमदनगरच्या क्रिकेट विश्वात आपल्या जलद गोलंदाजीने भल्या भल्यांची भंबेरी उडविणारा आमचा मित्र पोपट…
खेळाच्या मैदानावर क्रिकेटची मोठी स्वप्न पाहणारा.
त्यासाठी मेहनत घेणारा..
हसरा, बुजरा.. आपल्या स्वभावाने अनेकांची मने जिंकणारा..
खूप सारे मित्र जोडणारा.. आमचा प्रिय मित्र..
खेळाडू कधीही कोत्या मनाचा नसतो..
आपल्या डोळ्यांमधे जसं खेळाच मैदान मावत नाही.
तीच व्यापक दृष्टी हे मैदान आपल्याला जगण्याचा मंत्र देतं असतं..
पोपटराव अगदी तसेच…
मनमोकळे .. मित्रांच्या सूख दुःखात सहभागी होणारे, हवं ते सहकार्य करणारे..
आम्हा खेळाडूंचा हा लाडका खेळाडू..
क्रिकेटच्या मैदानावर ही इतिहास घडवू शकला असता..
हे वास्तव आहे..
पण त्याही पलीकडे जात आपल्या दुष्काळी गावाचा कायापालट करायचा..
गावकऱ्यांना जगण्याचं सूख द्यायचं..
या साऱ्यांना विकासाच्या दिशेने नेत त्यांचं जीवन समृद्ध करायचं..
याचं एका वेड्या ध्येयान पछाडून त्यांच्या आयुष्यातील खऱ्या स्वप्नांची पहाट आणतो..
यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह तब्बल तीस वर्ष आपल्या आयुष्याचं दान गावाला देतो..
आज पोपटरावांचं हिवरेबाजार देशासाठी प्रेरणा बनून गेलेलं आहे..
माणूस एका ध्येयाने निस्वार्थी भावनेने लोकांसाठी, आपल्या गावच्या विकासासाठी काय करु शकतो.. याचं हिवरेबाजार उत्तम उदाहरणं आहे..
आमचा हा दिलखुलास मित्र… आमच्यावर भरभरुन प्रेम करणारा… आमच्या कोणत्याही सेवाभावी कार्यात सोबत असणारा. ..
आज साऱ्या देशाचा आयकॉन झाला आहे. खूप अभिमान वाटतो.
भारत सरकारच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते माननीय श्री.पोपटराव पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला…
अहमदनगर जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंददायी,
अभिमानास्पद घटना..
आज पद्मश्री श्री.पोपटराव पवार यांचे आपल्या गावात आगमन झाले… जल्लोषात स्वागत झाले.
पोपटराव आत्मीयतेने भेटले.. अन् आम्हा साऱ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू तरळले…
यावेळी आम्ही माजी क्रिकेट खेळाडूंच्या वतीने त्यांचा खास सत्कार केला. ज्येष्ठ क्रिकेटपटू सर्वश्री प्रकाश राठोड, मिलन कदम, प्रा.श्रीकांत निंबाळकर, अहमद परवेझ, प्रवीण अंतापेलू, शिवाजी खोडदे,भास्करराव चेमटे व मी या सुखद प्रसंगी उपस्थित होतो.
आपला सहकारी खेळाडू, आपला मित्र जेव्हा देशाच्या प्रतिष्ठित, उच्च अशा पुरस्काराने सन्मानित होतो..
गर्व वाटतो..
हिवरेबाजार गावकऱ्यांच्या वतीने संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना माननीय पद्मश्री पोपटराव यांनी क्रिकेटच्या मैदानावरील किस्से सांगत आमचा उल्लेख केला. मन भरून आलं..
हल्लीच्या काळात खूप माणसे भेटतं असतात..
ज्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत आपणं कायम ज्यांच्या सोबत असतो.. ती माणसे थोडा पैसा हाती येऊ द्या…
ओळखही विसरतील… हे कटू सत्य आहे..
म्हणूनच पोपटराव यांच्यासारखी जमिनीवरची, स्वत:च्या मातीवर प्रेम करणारी माणसे समाज जीवनाचा श्वास आहेत…
पद्मश्री पोपटराव, तुम्हीं आमची उर्जा आहात…
तुमचं यश उत्साह देणारं आहे…
तुम्हीं आपल्या कर्तुत्वाने भविष्यात खूप मोलाचे पुरस्कार मिळवणार आहात हा विश्र्वास आहेच..
मनपूर्वक अभिनंदन पद्मश्री….

– लेखन : जयंत येलुलकर (माजी क्रिकेटपटू, मा. सचिव, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन)
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800