पारंपारिक कला जपणारे, सतत कार्यरत असलेले श्री.भानुभाई चितारा, वय ८० वर्षे, यांना २०२३ चा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आणि त्यांचे सारे गांव आनंदले.
सुमारे 400 वर्षे जुनी गुजराती हस्तकला ‘माता नी पछेडी’ आजपर्यंत जिवंत ठेवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ही भारतीय हस्तकला गुजरातच्या इतिहासाशी निगडीत आहे.
माता नी पछेडी चा शब्दशः अर्थ ‘मातेच्या मागे’ असा होतो. याचे मूळ 3,000 वर्षांहून अधिक जुने मानले जाते, कापडावरील चित्रकलेची ही शैली असून देवी-देवतांची विविध रूपे आणि त्यांच्या कथा यांत कौशल्यपणे चित्रित केल्या जातात.
ही भारतीय हस्तकला कुठून आली याचा शोध घेता विविध उत्तरे मिळाली. एका समजुतीनुसार गुजरातमधील एका समुदायाला जातीयवादामुळे मंदिरात जाण्यापासून रोखले गेले होते. त्या काळात ते स्वतः देवतांची चित्रे बनवून त्यांची पूजा करू लागले.तर काहींच्या मते ही कला मुघलांच्या काळापासून आली आहे. पण त्याची जोपासना केली वाघरी समाजाने.
वाघरी समाजाचे लोक गुजरातमधील साबरमती नदीच्या काठावर राहणारे भटके होते. साधारणपणे हे लोक शेती व संबंधित कामे करायचे. यासोबतच ते जुन्या वस्तूंची विक्री किंवा देवाणघेवाणही करत असत. सुमारे 300 वर्षांपूर्वी हे लोक कलाकार बनले आणि माता नी पछेडी ही कपड्यांवर उत्कृष्ट कलाकृती चितारू लागले.. एकेकाळी समाजात उपेक्षित आणि समाजापासून दुरावलेल्या लोकांसाठी ही कला श्रद्धेचे रूप झाले.
भानुभाई चितारा यांचे नातू ओम चितारा म्हणाले, “त्याची सुरुवात कुठून झाली याचा कोणताही ठोस पुरावा नाही. पण वर्षानुवर्षे माझे कुटुंब या भारतीय हस्तकलेशी निगडीत आहे.” ओम चितारा हे माता नी पचेडी बनविणाऱ्या कुटुंबातील नवव्या पिढीतील युवक आहेत.
मातानी पचेडी, एक कलात्मक आणि पवित्र कापड आहे. ते बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक टप्पे आहेत. नैसर्गिक रंगांनी बनवलेल्या इतर कपड्यांप्रमाणे, त्यावर रंग किंवा पेंटिंग करण्यापूर्वी फॅब्रिक तयार करण्याची एक लांबलचक प्रक्रिया आहे. यामध्ये कापड भिजवून धुतल्यानंतर त्याची भुसी (husk) काढली जाते. त्यावर कलाकार प्रथम काळ्या रंगाने बाह्यरेखा काढतो. हा रंग लोखंडापासून बनवला असतो आणि तो तयार करण्यास १५ दिवस लागतात.
माता नी पचेडीच्या संपूर्ण कलाकृतीच्या मध्यभागी देवीची आकृती असते. उर्वरित आकृत्या इमारतीवर केलेल्या सजावटीप्रमाणे जाळीच्या आत बनविल्या जातात. या जाळीला कलात्मकतेने बनवलेले दरवाजे आणि कमानीचे स्वरूप दिलेले असते. साधारणपणे वरच्या दोन्ही कोपऱ्यात सूर्य आणि चंद्र बनवले जातात. कलाकृतीमध्ये गायक, संगीतकार, जादूगार, पक्षी आणि प्राणी असतात. हे सर्वजण देवीच्या उत्सवात गातांना, नाचतांना दिसतात.
माता नी पचेडी बनवण्यासाठी वुड ब्लॉक प्रिंटिंग आणि हॅन्ड पेंटिंग तंत्राचा वापर केला जातो. ब्लॉक्समधून (लाकडी ठोकळे) बॉर्डर आणि काही खास आकार तयार केले जातात. हे ब्लॉक्स पिढ्यान पिढ्या वापरले जातात, त्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक जतन केले जातात. हे ब्लॉक्स ही त्या त्या घराण्याची वडिलोपार्जित अनमोल संपत्तीच असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ब्रश आणि पेंटसह, कलाकार त्याच्या कल्पनेतून नवीन किंवा विद्यमान आकार तयार करतो. काही गोष्टी कोणत्याही स्केलशिवाय बनवल्या जातात, तर काही वर सांगितल्याप्रमाणे ब्लॉक्स वापरून.
बाह्यरेखा तयार झाल्यानंतर बांबूच्या ब्रशच्या मदतीने लाल रंग भरला जातो. हा लाल रंग तुरटी आणि चिंचेच्या बियांच्या पावडरपासून बनवलेल्या द्रावणापासून तयार केला जातो. लाल रंग भरण्यासाठी बांबूचे ब्रश वापरले जातात. कलाकार द्रावणात रंग घालतात, त्यामुळे द्रावण पिवळे दिसते आणि ते कापडावर स्पष्ट दिसते.हा रंग नंतर काढला जातो.डाय योग्य प्रकारे तयार करण्यासाठी धवडाच्या फुलांमध्ये मॉर्डंट अॅलिझारिन मिसळले जाते. द्रावणात कापड बराच वेळ उकळले जाते, त्यानंतर त्याचा रंग गडद लाल होतो. डाईंग केल्यानंतर, जास्तीचा डाय काढून टाकण्यासाठी कापड धुतले जाते.
मातानी पचेडी बनवायला लागलेल्या वाघरी समाजाचे लोक भटके होते. हे लोक खूप गरीब होते आणि हा समुदाय परंपरेने साबरमती नदीजवळ रहातो. त्यामुळे नदीच्या वाहत्या पाण्यात ही प्रक्रिया करण्यात येते. हे कपडे नदीच्या काठावर पाईप आणि खडकांवर वाळवले जातात.
वाघरी कलाकारांना आता चित्रा कलाकार म्हणून ओळखले जाते. ग्राहक या कलाकारांना त्यांच्या संरक्षक मातृदेवतेच्या कलाकृती तयार करण्यास सांगतात.या कलाकृतींमध्ये, देवी हा कलेचा मुख्य भाग असतो, आणि भोवताली तिचे इतर अवतार, इतर देवी-देवता, धार्मिक कथांचे भाग आणि संतांची चित्रे चितारली जातात.
नवरात्रीच्या काळात माता किंवा देवीच्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. या नऊ दिवसांमध्ये, भारतातील बहुतेक भागांमध्ये दुर्गा देवीच्या अवतारांची पूजा केली जाते.
‘माता नी पछेडी’ कलेवर काम करणाऱ्या मूठभर कुटुंबांपैकी चितारा कुटुंब हे एक आहे. आज देशात माता नी पछेडी कलेवर जो कोणी काम करत आहे, त्यांनी चितारा परिवाराकडून प्रशिक्षण घेतलेले असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ओम चितारा यांनी सांगितले की पूर्वी हे पेंटिंग फक्त लाल आणि काळ्या रंगांनी केले जात होते, परंतु आज यामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक रंग वापरले जात आहेत. त्याचे आजोबा, वडील आणि काकाही यासाठी प्रशिक्षण देतात.
आजच्या काळांत लोकांमध्ये अशा पारंपरिक कलांची आवड वाढत आहे आणि ते विकतही घेत आहेत. आता तर विविध कलाकृतींसह साडी आणि दुपट्ट्यांवरही मातानी पचेडी ही कलाकृती तयार केली जात आहे.
ओम सांगतात की, त्यांच्या वडिलांना या कलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि आता आजोबांना पद्मश्री सारखी पदवी मिळणे ही संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करतांना भानुभाई चितारा उद्गारले की, यामुळे कलेलाही नवीन स्थान मिळाले, देशात सर्वाना या कलेबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळाले आणि गांवातील अधिक तरुण ही कला जोपासू लागतील पर्यायाने ही कला जीवित राहील.
मातानी पचेडी वस्त्र तयार करण्याची अनोखी कला पाहून त्याची एखादी तरी साडी खरेदी करण्याचा विचार मनीं आला नां ? चला तर, मी ही येते !
(स्रोत: आंतरजाल)

– लेखन : नीला बर्वे, सिंगापूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पद्मश्री भानूभाई चितारा यांच्या वरील लेख छान आहे. लेखिका नीला बर्वे यांनी अतिशय परिश्रमाने सखोल माहिती दिली हे जाणवते.त्यांना आणि अशी दुर्मिळ माहिती शोधून प्रकाशित करण्यारया संपादिका अलका भुजबळ मॅम यांनाही खूप धन्यवाद.