Sunday, September 14, 2025
Homeयशकथापद्मश्री मधु मंगेश कर्णिक

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

कोकणातील एका छोट्याशा गांवात गेल्या शतकात जन्माला आलेल्या एका बालकाच्या ५ पुस्तकांचे प्रकाशन २५ एप्रिल २०२५ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मोठ्या दिमाखाने झाले आणि आणि त्यानंतर त्यांची पुस्तकतुलाही झाली. एक छोटेसे गांव ते साहित्यरत्न म्हणून पुस्तकतुला हा जीवनप्रवास खरोखरच वंदनीय आहे. मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे त्यांचे नाव तुमच्याही लक्षातआले असेलच ! हो, बरोबर, आपले साऱ्यांचे आवडते व्यक्तिमत्व मधु मंगेश कर्णिक !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करुळ गांवी मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील आरस या गांवचे. त्यांच्या पूर्वजांनी स्वकर्तृत्वावर पेशव्यांकडून कर्णिक ही सनद मिळविली. त्यांनीच अडीचशे वर्षांपूर्वी करूळ गांव वसविले. इंग्रज सरकारने त्यांना खोती दिली. कुटुंबातील दहा अपत्यांपैकी मधु मंगेश कर्णिक नवव्या क्रमांकाचे. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या काळात खोत होते. दुर्दैवाने मधुभाई चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे आणि सोळा वर्षाचे असताना आई अन्नपूर्णाचे निधन झाले. परिणामी जीवन फारच कठीण होते. तरीही शालेय शिक्षण करूळ येथे पूर्ण करून कणकवली येथील माध्यमिक विद्यालयातून ते १९५१ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यात (एस्‌टीत) नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात तीन-साडेतीन वर्षे माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी या पदावरही त्यांनी काम केले.

मधू मंगेश कर्णिक यांची पहिली कविता ‘बालसन्मित्र’ मधे तर पहिली कथा “कृष्णाची राधा” ही रत्‍नाकर मासिकात प्रकाशित झाली तेव्हा ते मॅट्रिकच्या वर्गात होते. त्यांच्या कोल्हापुरातील वास्तव्यात खऱ्या अर्थाने लेखनाची सुरुवात झाली. संगीत व नाटक या कलांचे निस्सीम उपासक तसेच संवादिनीपटू गोविंदराव टेंबे यांच्या चाळीत ते रहात असत. टेंबे यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. ‘‘तुम्ही राहता त्या खोलीत कवी माधव ज्यूलियनांचं बिऱ्हाड होतं. तुम्ही त्यांच्यासारखं भाग्य उजळा’’, असे उद्‌गार टेंबे यांनी एकदा काढले होते. हे ऐकून मधुभाऊ भारावले. हे बोल आणि टेंबे यांच्या सहवासात झालेला काव्य-शास्त्र-विनोद त्यांच्या पुढच्या वाटचालीस प्रेरक ठरला. शिवाय पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे या प्रथितयश साहित्यिकांच्या आशीर्वादाचा हात त्यांना सातत्याने लाभला. तो काळच नवकथेच्या बहराचा होता. त्यांनी प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. अरविंद गोखले, पु. भा. भावे आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा समरसून वाचल्या. वास्तव जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली आणि आपला बाज माडगूळकरांच्या लेखन प्रकृतीशी जुळतो असे त्यांना मनापासून वाटले. योग्यवेळी हे आकलन होण्यामुळे त्यांच्या लेखनाचे सूर त्यांना सापडले. प्रोत्साहित मनाने मधुभाईंनी त्यानुसार साहित्याच्या विविध दालनांत आत्मविश्वासाने पदार्पण केले. यश संपादन केले.’लोकसत्ते’ बरोबरच ‘धनुर्धारी’, ‘विविधवृत्त’ या साप्ताहिकांमधूनही त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यांच्या कथांना प्रसिद्धी आणि मानधनही मिळत होते.

मधुभाऊंनी इ.स.१९५० ते १९६५ या काळात खूप कथा लिहिल्या. ‘सत्यकथे’त कथा प्रकाशित झाल्यानंतर ते दर दिवाळीला पंधरावीस कथा सहज लिहू लागले आणि कोकणातील लाल मातीचा स्पर्श, येथील निसर्गाच्या हिरव्या बोलीचा नाद, नित्य निरंतर सागरगाज, वाचकांनाही प्रिय झाला. कथा, कादंबरी आणि ललित निबंध हे बंध हाताळताना, आपल्या भूमीशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. यातील व्यक्तिचित्रे चं. वि. बावडेकरांच्या ‘आलमगीर’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. ‘मालवणी मुलुखातील माणसं’ हे त्याचं पहिलं नांव होतं. कोकणच्या भूमीतील चैतन्यदर्शन कर्णिकांनी या व्यक्तिचित्रांद्वारे वाचकांना घडविले.

विविध विषय हाताळण्याची शैली, समृद्ध अनुभवविश्व आणि सातत्याने लिहिणे यामुळे मधुभाईंच्या नावे सुमारे सत्तरच्या घरात पुस्तके आहेत त्यात तिसांहून अधिक कथासंग्रह आहेत. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होते व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकही होते. अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले.

मधुभाई २००६ साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली,आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या; आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले. जुईली, भाकरी आणि फूल, रानमाणूस, सांगाती या दूरदर्शन मालिकांचे ते लेखक आहेत. त्यांनी “करूळचा मुलगा” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. संवेदनक्षम वयात कवितेने लेखनारंभ, नंतर कथा नाट्य ललित लेखन विपुल केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कविता स्फुरू लागली. मात्र वास्तवाशी असलेले आपले नाते त्यांनी अबाधित ठेवले. सच्चा कलावंतच. हे करू शकतो असे मला वाटते.

सर्वच माणसांबद्दल ममत्व, भाववृत्तींतील जिव्हाळा निसर्गप्रियता, प्रसन्न शैली यामुळे लेखनाच्या आलेख उंचावतच होता आहे आणि गेल्या ८० वर्षे इतक्या प्रदीर्घ कालखंडात मराठी साहित्य क्षेत्रांत मधुभाऊंनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा उमटविलेली आहे. ते १९९० मध्ये रत्नागिरी येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. मुंबई ही कर्मभूमी असलेले आणि मुंबईमध्ये कायमचे वास्तव्य असलेले मधु भाई रमले खऱ्या अर्थाने कोकणातल्या लाल मातीतच. येथील माणसांच्या सहवासात, येथील मातीतूनच त्यांचे लेखन बीज अंकुरले अशी त्यांची धारणा आहे आणि कोकणाबद्दल ते कायम कृतज्ञ आहेत. त्यांच्या लेखनातून ही जाणीव आपल्याला विविध रूपाने भेटते परंतु सामाजिक स्थित्यंतरांच्या सूक्ष्म अवलोकन आणि वाढते अनुभवविश्व यामुळे त्यांचे लेखन विस्तीर्ण होत गेले. निरीक्षण आणि विविध अनुभव शब्दबद्ध करण्याची ताकद यामुळे विपुल लेखन झाले.

‘माहीमची खाडी’ मध्ये कर्णिकांनी परिघाबाहेरचे जग रंगविले आहे. मुंबईसारख्या महानगराला लगटून असलेल्या माहीमच्या खाडीतील झोपडपट्टीचे वास्तववादी चित्रण त्यांनी केलेले आहे. ‘देवकी’ ही त्यांची पहिली कादंबरी. बाबीकाका आणि भावीण देवकी यांची ही प्रेमकहाणी त्यांनी हळुवारपणे रंगविली आहे. तर ‘कातळ’ ही नव्या उत्साहाने कोकणात परतलेल्या दिगंबर व अवधूत यांच्या प्रयत्नांची कहाणी आहे. ‘वारूळ’ या कादंबरीत उद्योजक जगताचे प्रातिनिधिक चित्रण केले आहे. मनस्विनी तरुणीच्या जीवनावर आधारलेली कादंबरी म्हणजे जुईली.

मधुभाईंच्या लिखाणावर अनेकांनी सविस्तर लिहिले आहे. काहीजण तर त्यांच्या लिखाणावर पीएचडी करीत आहेत. मी किंचित उल्लेख करीत पुढे जात आहे. त्यांच्या अफाट लेखनाचा केवळ आढावा घेण्यासाठी प्रदीर्घ लेख लिहावा लागेल. जाता जाता त्यांच्या अलिकडच्या कादंबरीचा उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे ‘तारकर्ली’. यात त्यांनी माणसाचा हव्यास, त्यात होरपळणारा निसर्ग, आधुनिकतेमुळे जुन्या संस्कृतीवर झालेला आघात , बदललेली नातेसंबंधांची गणिते सखोलपणे चित्रित केले आहे. त्यांनी आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखन केले, पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली, आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या.
त्यांनी कोकण कला अकादमी स्थापन करून त्याद्वारे कोकणी मराठी साहित्य परिषदेचा पाया रचला ज्यामुळे हजारो साहित्यप्रेमी जोडले गेले. नाथ पै वनराई ट्रस्टचे ते संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले.

कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि ते उत्कृष्ट करण्याचा ध्यास घेऊन अतिशय देखण्या रूपात साकारले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे.

मधुभाईना मिळालेल्या पुरस्कारांची यादी भलीमोठी आहे, त्यापैकी काही सांगायचे तर, ग.दि. माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०), दमाणी प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६), महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचा पुरस्कार (२५-१-२०१८), पद्मश्री विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२००९), विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२७-२-२०१८), लाभसेटवार पुरस्कार (पाच लाख रुपये), शिवाय अनेक राज्य पुरस्कार, पाठयपुस्तकांसाठी निवडले गेलेले लेख असेही सन्मान त्यांना लाभले. साहित्यसेवेतील त्यांच्या लक्षणीय कर्तृवाची दखल सरकार दरबारीही घेतली जाऊन २००२ मध्ये त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने १ मे २०१० रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंतांचा सत्कार झाला. त्यांत मधु मंगेश कर्णिक हे एक सत्कारमूर्ती होते.

खऱ्या अर्थाने सहचारिणी असणारी पत्नी शुभदा, आपापल्या व्यवसायात यशस्वी असे पुत्र तन्मय, अनुप आणि दूरदर्शनवर अधिकार पदावर राहिलेली कन्या अनुजा देशपांडे ! हे सारे कुटुंबिय सालस, प्रेमळ, दिलदार आणि स्वाभिमानीही.
आपल्या या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ या कुटुंबियांचे कित्येक वर्षांपासून स्नेही आहेत. त्यांनी मधुभाईंवर, त्यांच्या वाढदिवसानिमित्त २८ एप्रिल रोजी सविस्तर लेख लिहिला आहेच. त्यातील द्विरुक्ती टाळून मी हा लेख लिहीत आहे, तेही थोडक्यात कारण मधुभाऊंचे जीवन अफाट आहे.

तीव्र इच्छा असून मी २५ तारखेच्या कार्यक्रमास येऊ शकले नाही. पण त्यांच्या शतकपूर्तीच्या कार्यक्रमात माझा सक्रिय सहभाग असेल हे नक्की.
मधुभाई आणि कुटुंबियास खूप शुभेच्छा !
जिवेत् शरद: शतम् शतम्
सुदिनं सुदिनं जन्मदिनम्
भवतु मंगलं जन्मदिनम्
यशस्वी भव, समृद्ध भव
स्वस्थ भव, विजयी भव II
जन्मदिनस्य: अन्त:करणस्य शुभेच्छा सर्वदा I

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खूप छान लेख आहे.माझ्या वडिलांची संपूर्ण साहित्यिक वाटचाल अधोरेखित केली आहे.खूप खूप धन्यवाद!

  2. मधु मंगेश कर्णिक यांच्यावर आपण हा खूप अभ्यासपूर्ण आणि समर्पक असा लेख लिहिल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि तो वाचण्यासाठी मला पाठवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा