महाराष्ट्राचे “अरण्यऋषी”, रानयात्री म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, त्या मारुती चितमपल्ली यांना नुकतीच पद्मश्री जाहीर झाली आणि मला खूप आनंद झाला.त्यांच्या विषयीच्या काही आठवणी ताज्या झाल्या.
मारुती चितमपल्ली यांनी पशु-पक्षी, निसर्ग, वन्यजीव, झाडा-फुलांतून जे साहित्य उभे केले, त्याला तोड नाही. पहिला पक्षीकोष त्यांनी तयार केला, त्यासाठी काही निवडक छायचित्रण व मलपृष्ठावरील चित्तमपल्ली यांचे चाफ्याच्या झाडाखालून चालत जाण्याचे छायचित्र माझे बाबा, विजय होकर्णे यांनी नवेगाव बांध येथे त्यांच्या सहवासात घेतले. तत्कालीन माहिती संचालक प्रल्हाद जाधव सरांनी “जो माणूस नवा चाफा रमतो, त्याच्या मनात तो फुलतो” या समर्पक छायचित्र ओळीने ते गौरवले. हे पक्षीकोष गाजले.
विविध भाषांमध्ये पारंगत असलेल्या चितमपल्लींनी २१ हून अधिक ग्रंथ लिहिले. वन्यजीव अभ्यासक, पक्षिमित्र आणि निसर्ग साहित्याला मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले.नुकतीच त्यांना पद्मश्री जाहीर झाली
हा महाराष्ट्रातील पक्षिमित्रांसाठी अभिमानाचा क्षण आहेच, पण आमच्यासाठी होकर्णे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनाशा झाला आहे. त्यांचा प्रदीर्घ सहवास, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे.
चितमपल्ली हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर नांदेड येथे आयोजित केलेल्या सत्काराच्या वेळी प्रल्हाद जाधव सरांनी त्यांची घेतलेली प्रकट मुलाखत आणि नंतर आम्ही होकर्णे कुटुंबीयांनी त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला, हे आम्हाला एक सौभाग्य वाटते.
विदर्भातील, विशेषतः नागपूरमधील दीर्घ वास्तव्यानंतर, चितमपल्ली सर हे सोलापूरात आपल्या पुतण्याकडे ,श्रीकांत चितमपल्ली याच्याकडे वास्तव्यासाठी निघाले असताना वाटेत नांदेड येथे निसर्गप्रेमी मित्रांसह होकर्णे कुटुंबाने त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी बोलताना, “नांदेडशी माझा कायम ऋणानुबंध राहिला असून, सोलापूरात वास्तव्यात गेल्यानंतरही हा ऋणानुबंध कायम राहील,” असे ते म्हणाले. “आपल्या आदरातिथ्यामुळे मी भारावलो असून, बोलण्यासाठी शब्द फुटत नाहीत. हृदय भरून आले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.ती आमच्या चिरकाल स्मरणात राहिल.
याशिवाय, यावेळीची एक लक्षवेधक घटना:
मारुती चितमपल्ली यांच्या आवडीचे जेवण ध्यानात घेऊन माझी आई सौ अरूणा होकर्णे यांनी खास करून नाचणीची स्वादिष्ट खीर तयार केली. चितमपल्ली सरांनी खीर चाखली आणि “उत्तम झाली” असा अभिप्राय दिला. त्यावर आमच्या होकर्णे कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
आदरणीय चितमपल्ली सरांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— लेखन : रेणू गंदिगुडे होकर्णे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800