Saturday, March 15, 2025
Homeयशकथा"पद्मश्री" सिलबी पासाह

“पद्मश्री” सिलबी पासाह

मेघालयातील शिलाँगमधील रियातसमथिया येथे ३ मार्च १९५२ रोजी जन्मलेल्या श्रीमती सिलबी पासह यांनी हिंदी (कोविद) मध्ये पदवी पूर्ण केली. त्या १९८२ मध्ये मावखर शिलाँग येथील खासी जैंतिया राष्ट्रीय सरकारी उच्च प्राथमिक शाळा येथे हिंदी शिक्षिका म्हणून सेवेत रुजू झाल्या. त्यावेळी हिंदी या भाषेबद्दल मुलांना आस्था आणि प्रेम निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविले. जनमानसातही त्याकाळी एकंदरीत हिंदीबद्दल विशेष आत्मीयता नव्हती. त्यासाठी अनेक कार्यक्रमातून त्यांनी हिंदी विषयी जागृतता निर्माण केली. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ शिलाँग (AIRS) द्वारे प्रसारित होणाऱ्या “हिंदी धडा” या रेडिओ कार्यक्रमातही भाग घेतला. त्यांच्या तळमळीने आणि कार्याने मुले हिंदी भाषेवर प्रेम करू लागली. काहीजण त्यातील साहित्याचा अभ्यास करू लागली. समाजातील अनेक व्यक्तींनी हिंदी भाषा मनापासून स्वीकारली.

सिलबी पासाह यांना २००५ मध्ये, हिंदी-खासी कॉन्ट्रास्टिव्ह व्याकरण तयार करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी (आग्रा) येथे नियुक्त करण्यात आले. सिलबी पासाह सर्व शिक्षा अभियान आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या आदरणीय व्यक्ती आहेत. त्या एक प्रसिद्ध कलाकारही आहेत. त्यांनी खासी जैंतिया लोकगीते आणि पारंपारिक वाद्ये संस्था येथे प्रशिक्षण घेतले आहे. राज्यात गेली कित्येक वर्षे त्या संगीत आणि संस्कृतीचा प्रचार करीत आहेत. कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून नॉर्थ ईस्ट झोन कल्चरल सेंटरच्या सहकार्याने, त्यांना आणि त्यांच्या पथकाला देशातील विविध झोन जसे की साउथ झोन कल्चरल सेंटर, साउथ वेस्ट झोन कल्चरल सेंट्रल, वेस्ट झोन इत्यादींनी आयोजित केलेल्या विविध अष्टक महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

या व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांनी मेघालयाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दूरदर्शन केंद्र शिलाँगमध्ये प्रसारित होणारे “हिंदी भाषा हमारी राष्ट्रभाषा है” हे हिंदी स्किट तयार करणाऱ्या त्या पहिल्या खासी महिला आहेत. २०२३ मध्ये त्यांच्या पथकाने “आदि शौर्य पर्व पराक्रम का” पारंपारिक नृत्य प्रकार विविध ठिकाणी सादर केला.
कोंग सिलबी पासह या एक प्रसिद्ध खासी-जैंतिया कलाकार, संगीतकार, कवी, नाटककार आणि शाळेतील शिक्षिका आहे. त्यांनी केवळ शालेय शिक्षिका म्हणूनच नव्हे तर संगीत, पारंपारिक नाटक, संगीत नाटक आणि सर्वसाधारणपणे कलांच्या प्रशिक्षक म्हणूनही खासी आणि पारंपारिक संगीत, नृत्य आणि लोकनाट्याचे समर्थन करण्यासाठी त्या अनेक वर्षे योगदान देत आहेत.

पासह यांच्या प्रामाणिक प्रामाणिक सेवा, भक्ती आणि समर्पणाची दखल घेत, त्यांना विविध क्षेत्रात विविध पुरस्कार मिळाले. २००१ मध्ये त्यांना राज्य सरकारकडून जिल्हा सन्मान प्रमाणपत्र, सेंग खासी, सेंग केमी मानद पुरस्कार (२००८), राज्य पुरस्कार (२००५), पीपल्स चॉइस पुरस्कार NETV (२००५), शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२००६), जीवन रॉय पुरस्कार (२००८), खासी जैंतिया कल्याण पुरस्कार (२००९), आंतरराष्ट्रीय गोल्ड स्टार पुरस्कार (बँकॉक २०१०), सेंग सामला सेंग केमी मानद पुरस्कार (२०११), लेडी ऑफ होप (केप टाउन साउथ आफ्रिका) (२०१२), कला आणि साहित्यासाठी यू तिरोट सिंग पुरस्कार (मेघालय २०१४), युवा अफेअर पुरस्कार (२०१९), ईशान्येकडील अनसंग थॉहीरोज रेड कार्पेट सोशल पुरस्कार (२०२१) आणि संगीत नाटक शैक्षणिक पुरस्कार (२०२१) प्रदान करण्यात आला.

मेघालय चे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या समवेतi

कोंग सिलबी वेगवेगळ्या साहित्यिक आणि सामाजिक संघटनांच्या सदस्या आहेत आणि त्यांच्या काही प्रकाशनांमध्ये ‘का जिंगशाई की किन्थेई मिंटा’ वरील कविता, खासी कवितांचा पहिला संग्रह, लघु नाटक – यू किलँड बॅड यू आणि ‘का पुट का टेम यू खासी’ आणि मूळ खासी वाद्ये (का सुर नोंगकिन्डोंग) यांचा समावेश आहे.

सध्या, कोंग सिल्बी लोकनृत्य, लोकगीते आणि पारंपारिक वाद्यांसाठी खासी जैंतियाची संस्था चालवितात. त्या एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता असून मेघालय स्काउट गाइड फेलोशिपची सदस्य देखील आहेत.

सिलबी सिल्बी लोकनृत्य, लोकगीते आणि पारंपारिक वाद्यांसाठी खासी जैंतियाची संस्था चालवितात. त्या एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता असून मेघालय स्काउट गाइड फेलोशिपची सदस्य देखील आहेत.

एक निवृत्त हिंदी शिक्षिका आणि मेघालयाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या प्रचारात एक कणखर व्यक्तिमत्व असलेल्या, आपले जीवन शिक्षण आणि कला या दोन्हीसाठी समर्पित केलेल्या कोंग सिलबी पासाह यांना २०२४ मध्ये मेघालयातील कला आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार या क्षेत्रातील त्यांच्या विशेष कार्यासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारांच्या वरील मोठ्या यादीमध्ये आणखी एक मानाचा शिरपेच !

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments