संगीत कलेतील योगदानाबद्दल डॉ .अश्विनी भिडे देशपांडे यांना भारत सरकारने यावर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले.जाणून घेऊ या त्यांचा सांगीतिक प्रवास.
डॉ .अश्विनी भिडे देशपांडे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
– संपादक
प्रसिद्ध “जयपूर-अत्रौली” ख्याल गायकी परंपरेतील एक उत्कृष्ट गायिका डॉ .अश्विनी भिडे-देशपांडे, भारतातील तरुण पिढीतील संगीतकारांचे प्रतिनिधित्व करतात.संगीताची परंपरा असलेल्या कुटुंबातच त्यांचा जन्म झाला. त्यांच्या मावशी सरला गायिका तर आजी दिलरुबा वाजवित असे. आई तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची शिष्य !
डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे यांनी दिवंगत पंडित नारायणराव दातार यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मूलभूत ज्ञान आत्मसात केल्यानंतर आई, मार्गदर्शक आणि गुरु, श्रीमती माणिक भिडे यांच्या कडक मार्गदर्शनाखाली शैलीबद्ध जयपूर गायकीचे सर्व पारंपारिक पैलू आत्मसात करण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये ऑल इंडिया रेडिओ संगीत स्पर्धेत त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार…सुवर्णपदक जिंकले. त्यांचे संगीत आणि विज्ञान शिक्षण एकाचवेळी चालू होते. त्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई येथून संगीत विशारद झाल्या आणि सूक्ष्मजीवशास्त्रात (Microbiology) पदव्युत्तर पदवी घेतली. तर भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात (बायोकेमिस्ट्री) पीएच.डी. मिळवली. तसेच ITM विद्यापीठ (ग्वाल्हेर) कडून त्यांना मानद डी.लिट पदवीही मिळाली आहे.
खरं म्हणजे डॉक्टरेट मिळवेपर्यंत अश्विनी यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचारही केलेला नव्हता. त्यांनी काही वर्षे बायोकेमिस्ट आणि अणुशास्त्रज्ञ म्हणून काम केले. पण संगीताची साथ सतत सोबत होतीच.त्याबाबत बोलतांना त्या सांगतात, “मला प्रकाश शोधण्याची गरज होती. मी ३० वर्षांपूर्वी माझे पहिले प्रेम … संगीतासाठी विज्ञान सोडून दिले, सुरुवातीला ते एक्सप्लोर करण्यासाठी स्वतःला एक वर्ष दिले. ते वर्ष कधीही थांबले नाही !” त्यांची
डॉ अश्विनी यांची अचूक शैली जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रतीक आहे. शिवाय त्यांनी इतर अनेक प्रादेशिक परंपरांच्या बारकाव्यांवरही प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी सुफी कवी-संतांकडूनही प्रेरणा घेतली आणि संकीर्ण (मिश्र) प्रकारांमध्ये विशेषज्ञ म्हणून त्या मान्यवर झाल्या. मात्र अजूनही त्यांच्या घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या अच्छोप (जटिल) रागांसंबंधी अधिक शोध घेण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. या प्रयत्नात त्यांचे गुरु दिवंगत पंडित रत्नाकर पै,
जे घराण्याचे एक ज्येष्ठ दिग्गज होते, यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले आहे.यामुळे आणि अर्थातच, त्यांच्या आईच्या अढळ पाठिंब्याने त्यांच्या स्वतःच्या परिपक्व आत्मनिरीक्षणात भर पडली आणि अश्विनीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या सतत विस्तारणाऱ्या नवीन क्षितिजांवर नेले.
अश्विनी यांच्या संगीतात स्वरातील गोडवा, चैतन्य, भावना आणि राग रचना-स्थापत्य यांचे मिश्रण आहे. त्यांच्या रागाच्या वर्णनातून रागाच्या व्याकरणावर त्यांची अढळ पकड दिसून येते शिवाय गायनात एक भावनिकता टिकून राहते. याद्वारे त्यांचा एक श्रोतृवृंदच तयार झाला आहे.जगभरातील प्रतिष्ठित समीक्षक आणि संगीत प्रेमींकडून त्यांना प्रशंसा मिळाली आहे,मिळत आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ‘उच्च दर्जाच्या’ कलाकार असलेल्या अश्विनींनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि आकाशवाणी संगीत संमेलनांमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी विविध प्रतिष्ठित संगीत परिषदा आणि संगीत संमेलने, संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेत जगभर दौरे करीत ख्याति आणि जनप्रेम संपादन केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, गान सरस्वती महोत्सव,भुवनेश्वर -ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, महोत्सव, कॅनडातील राग-माला म्युझिक सोसायटी ऑफ टोरंटो, आगा खान म्युझियम यांचा समावेश आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतातील मूर्च्छना पद्धतीवर आधारित जसरंगी जुगलबंदी म्हणजे एकाच वेळी स्त्री आणि पुरुष गायकाने दोन वेगवेगळे राग सादर करण्याची पद्धत. अश्विनी भिडे- देशपांडे यांनी पंडित संजीव अभ्यंकर यांच्याबरोबर अनेकवेळा जसरंगी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे. त्याबद्दल बोलतांना त्या म्हणतात, “हा एक आव्हानात्मक पण त्याच वेळी खूप समाधानकारक अनुभव आहे. आम्ही एकाच प्रमाणात गातो तेव्हा दोन्ही कलाकारांचे ‘पिच’ आणि ‘राग’ वेगळे असतात. हा कार्यक्रम पाश्चात्य संगीताच्या मूलभूत तत्त्वावर आधारित आहे, ज्याला आपण भारतीय संगीतात ‘मूरचन’ म्हणतो. या सुसंवादी सादरीकरणांसाठी आम्हांला नेहमीच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”
अश्विनी यांचा पहिला रेकॉर्ड केलेला अल्बम एचएमव्हीने १९८५ मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर रिदम हाऊस, टाइम्स म्युझिक, सोनी म्युझिक, म्युझिक टुडे, नवरास रेकॉर्ड्स आणि युनिव्हर्सल म्युझिक यासारख्या विविध बॅनरखाली
त्यांचे अनेक अल्बम प्रकाशित झाले.
ऑक्टोबर २००४ मध्ये अश्विनी यांनी स्वतःच्या बंदिशांवर आधारित “रागरचनांजली” हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाला संपूर्ण संगीत जगतातून कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला. या संगीतमय सर्जनशीलता आणि कलात्मक सादरीकरणासाठी त्यांचे आजही कौतुक होत असते.
आपले सर्जनशील प्रयत्न सुरूच ठेवत अश्विनी यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये, आणखी ९८ रचना समाविष्ट असलेले “रागरचनांजली २” हे त्यांचे दुसरे बंदिशांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. या ही पुस्तकाचे संगीतप्रेमींकडून हार्दिक स्वागत झाले.
अश्विनी यांनी इव्ह क्युरी यांनी लिहीलेल्या मेरी क्युरी यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून “मादाम क्युरी” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या अश्विनींनी स्वभाव आणि प्रशिक्षणाने शास्त्रीय संगीतकार असल्या तरी, जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. भजन/अभंग यासारख्या हलक्याफुलक्या प्रकारांमध्येही तितकाच सहजतेने सहभाग घेतात. याशिवाय, संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे. त्यांनी त्यांच्या अनेक भक्तीपर सादरीकरणांना स्वतः संगीत देऊन त्यांच्या भक्तीपर संग्रहातही भर घातली आहे. त्या भजनांच्या मांडणीसाठी, विशेषत: कबीरांच्या भजनासाठीही ओळखल्या जातात.
एक सक्षम शिक्षिका म्हणून, अश्विनी जयपूर गायकीच्या समृद्ध परंपरेचे सातत्य राखण्यासाठी त्यांच्या होनहार शिष्यांना आपला अमूल्य वेळ देतात. त्यांच्या विद्यार्थ्यांना, “भूतकाळात डोकावून तुम्ही तुमची परंपरा पुढे आणू शकता” असे सांगतांना, त्यांना दुर्मिळ आणि जवळजवळ विसरलेले राग पुन्हा जिवंत करण्यास प्रोत्साहित करतात.
अश्विनी नियमितपणे विविध शाळा, महाविद्यालये आणि संगीत सभांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावरील व्याख्यान-प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेऊन भारत आणि परदेशातील श्रोत्यांना ज्ञान देण्यास हातभार लावतात.
पंडित रविशंकर त्यांच्याबद्दल म्हणाले होते, “अश्विनी भिडे केवळ संगीत अभ्यासक नाहीत तर त्यांना सुंदर आवाजाचेही वरदान लाभले आहे. मी अश्विनीला तिच्या किशोरावस्थेपासून ओळखतो. तिला इतक्या अप्रतिम ख्याल गायिकेत उमलताना पाहून मला खूप आनंद होतो. तिने भारतातील अव्वल तरुण कलाकारांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अनेक जुन्या रचना शिकून, तिने वापरलेल्या बोली भाषांमधून ती परंपरेची भावना टिकवून ठेवू शकली आहे, तसेच विषयाकडेही लक्ष देऊ शकली आहे.”
हिंदुस्थानी शास्त्रीय गायन संगीतातील अश्विनींच्या योगदानाची दखल पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रांद्वारे घेण्यात आली आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१४), राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान (मध्य प्रदेश सरकार, २००५), संगीत रत्न पुरस्कार (सह्याद्री दूरदर्शन, २०१०). सांस्कृतिक पुरस्कार (महाराष्ट्र राज्य, २०११), गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर सन्मान (२०१४), संगीत शिखर सन्मान (२०१८), वत्सलाबाई जोशी पुरस्कार (२०१९), या पुरस्कारांबरोबरच २००५ मध्ये मध्य प्रदेश सरकारने प्रतिष्ठित “राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान” ने सन्मानित केलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला गायिका आहेत. २०१३ मध्ये बंगळुरू किडनी फाउंडेशनने “पंडित मल्लिकार्जुन मन्सूर पुरस्कार” प्रदान केला तर उस्तादांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना “पंडित जसराज गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.तर कलेत दिलेल्या योगदानाबद्दल डॉ.अश्विनी भिडे देशपांडे यांचा भारत सरकारने यावर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
माणूस जेवढा प्रगल्भ होतो तेवढा नम्र होत जातो या व्याख्येचे आदर्श उदाहरण म्हणजे हरहुन्नरी गायिका, लेखिका, सर्जनशील संगीतकार, आदर्श शिक्षिका, बायोकेमिस्ट्री मध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या विद्वान विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे ! त्यांच्याशी बोलणे हाही सर्वांना नेहमीच एक समृद्ध करणारा अनुभव असतो.
मेरी क्युरी त्यांचे प्रेरणास्थान आहे असे सांगून त्या म्हणतात, “विज्ञान आणि संगीत माझ्यासाठी एकमेकांना पूरक आहेत कारण ते दोन्ही खोलवर रुजलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन प्रभावित करतात. ते माझे व्यक्तिमत्व घडवितात. “वैज्ञानिकतेला सौंदर्यशास्त्रापासून वेगळे करता कामा नये, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” असे त्या आवर्जून सांगतात. रागांबद्दल खोलवरचा मानवी दृष्टिकोन असलेली त्यांची विश्लेषणात्मक मानसिकता विलक्षण आहे. त्यांना राग हे आपल्यासारखेच जिवंत वाटतात आणि म्हणूनच रागानेही त्यांच्याशी मैत्री करावी असे त्यांना वाटते. आपल्याला जसे राग भावतात तसेच त्यांनाही आपल्याबद्दल आपुलकी वाटावी अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे.
गायनकलेमध्ये रागाची बांधणी हे स्वर, लय, ताल या साधनांनी इमारत उभारण्यासारखेच कौशल्य आहे. ख्याल, राग आणि बंदिश हे गायनाचे साधन आहे, तर दृश्य माध्यम, स्थापत्य आणि दागिने घडणीतील नक्षीदार कलाकुसर करून केलेली रागमांडणी हे साध्य आहे. त्यामुळे रागसंगीत हे एक प्रकारचे स्थापत्यशास्त्रच आहे, असे सांगणाऱ्या डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, खरंच, एक प्रगल्भ, अष्टपैलू व्यक्तिमत्व !
— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800