महापरिनिर्वाण दिन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस. ६ डिसेंबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली.
बाबासाहेब गेले तरी त्यांनी आपल्या विचारसरणीतून आणि कार्यातून निर्माण केलेला प्रकाश जगाला प्रेरणा देत राहिला आहे.त्यामुळे महापरिनिर्वाण दिन म्हणजे केवळ एका महापुरुषाला श्रध्दांजली/अभिवादनाचा दिवस नसून त्यांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा आणि सामाजिक समतेच्या दिशेने पाऊल उचलण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
बाबासाहेब हे लोकोत्तर पुरुष होते. ते प्रकांड पंडीत होते. त्यांचे विविध विषयांवर प्रभुत्व होते. समाजकारण, अर्थकारण, राजकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती , साहित्य,पत्रकारिता अशा विविध विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांनी आपल्या प्रज्ञेने देशातीलच नव्हे तर जगातील विद्वानांना प्रभावित केले होते. त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार हे काळाच्या फार पुढे होते. सामाजिक समतेवर आधारीत समाज व्यवस्थेची निर्मिती व्हावी यासाठी ते अखंड कार्यरत होते. त्यानी समाजातील उपेक्षितांसाठी केलेले कार्य हे अजोड स्वरुपाचे आहे. उपेक्षितांना न्याय, सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले होते. मनुष्याला घडवण्यात आणि सक्षम करण्यात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व त्यानी जाणले होते. त्यामुळेच ‘शिका, शिकवा, संघटित व्हा’ अशी शिकवण त्यांनी सर्व उपेक्षित समाजघटकांना देऊन ज्ञानप्राप्तीची प्रेरणा दिली. या प्रेरणेची शक्ती घेऊन कोट्यवधी समाजबांधव आज शिक्षण घेऊन सक्षम आणि समर्थ होत आहेत.
बाबासाहेबांनी आपल्या देशाला सर्वांत मौल्यवान अशी देणगी म्हणजे; आपली राज्यघटना. त्यामुळेच त्यांना यथार्थरीत्या ‘रघटनेचे शिल्पकार’ असे संबोधले जाते. अतिशय सखोल अभ्यास आणि अखंड परिश्रम घेऊन त्यांनी भारताची घटना लिहिली. या घटनेच्या मजबूत पायावर अतिशय प्रगल्भ अशी लोकशाही भारतात स्थापित झाली आणि वर्षागणिक या लोकशाहीची पाळेमुळे देशाच्या भूमीत खोलवर रुजत चालली आहेत. याच घटनेने देशातील सर्वांना समान न्याय, अधिकार, हक्क, प्रगती व विकासाच्या संधी दिल्या आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि संविधान निर्माते होते. या निमित्ताने त्यांच्या विविधांगी पैलूवर आधारीत चतुरस्त्र प्रतिमेची नेमकी व प्रभावीरीत्या ओळख आपण पुन्हा पुन्हा करून घेत राहिलो पाहिजे,इतकी ती सखोल आहे.
त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरांवर शोषित, वंचित आणि मागास वर्गासाठी केलेल्या कार्यामुळे ते जगभर ओळखले जातात. या दिवशी त्यांच्या विचारांवर विविध ठिकाणी चर्चा होते. असंख्य अनुयायी त्यांच्या दादर येथील चैत्यभूमी स्थळाला भेट देतात आणि त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देत समानतेच्या तत्त्वांचा प्रसार करतात.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या महान कार्याला अभिवादन करताना, आपण त्यांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक सुधारणा आणि समतेच्या दिशेने योगदान देण्याचा निर्धार करायला हवा.
सामाजिक योगदान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान फक्त त्यांच्या काळापुरते मर्यादित नव्हते तर ते आज आणि उद्या साठीही प्रचलित राहणारे असे आहे. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात एक सामाजिक क्रांती घडली. ज्याने अनेक वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या जीवनात सुधारणा केली. त्यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मरण समाजातील भेदभाव, वर्चस्व आणि असमानता विरुद्धची लढाई याच्या संदर्भात कायम ठेवले जाईल.
राजकीय योगदान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय योगदान भारतीय लोकशाहीचा पाया घालणारे आहे. त्यांनी राजकीय क्षेत्रात दलित, महिला, आणि श्रमिक यांना सशक्त केले. भारतीय समाजातील विविधतेला एकत्र आणून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची राजकीय भूमिका भारताच्या एकसंध आणि समतावादी भविष्यासाठी आजही मार्गदर्शक आहे.भारतीय राजकारणात ते एक सशक्त नेते होते. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करतांना त्यांनी समता, बंधुता, आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांना प्राधान्य दिले. त्यांनी स्त्रियांना आणि श्रमिक वर्गाला अधिकार मिळवून देण्यासाठी कायदे केले.
शैक्षणिक योगदान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान हे भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणणारे ठरले. शिक्षण हे सामाजिक सुधारणेचे शक्तिशाली साधन असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी वंचितांना शिक्षणाचा अधिकार दिला. सामाजिक न्यायाचे बीज पेरले आणि एक सशक्त भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या शैक्षणिक योगदानामुळे आज अनेक वंचित समुदाय मुख्य प्रवाहात आले आहेत.
कायदेविषयक योगदान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कायदेविषयक योगदान भारतीय समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी निर्णायक ठरले. त्यांनी कायद्यांचा उपयोग केवळ न्यायव्यवस्थेसाठी नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठीही केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय कायदे प्रणाली आजही वंचित, मागास, आणि शोषित वर्गासाठी आशेचा किरण ठरते.
महापरिनिर्वाण दिन हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्त्वे, आणि कार्याला आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. तो दिवस सामाजिक न्याय, समता, आणि लोकशाही मूल्यांचे स्मरण करून देतो. या दिवसाचे महत्त्व फक्त ऐतिहासिकच नाही तर ते आजही सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर चालून एक प्रगत, समताधिष्ठित आणि न्यायसंपन्न समाज निर्माण करणे हीच त्यांच्या प्रति खरी आदरांजली ठरेल.अशा या श्रद्धेय महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या योगदानाला सलाम !
— लेखन : विलास गोहणे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800