कै. गोपीनाथ देवकर गुरुजी म्हणजे…. एक ज्ञानसंपन्न, उत्साही, आशावादी, निस्वार्थी, प्रेरणादायी व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व … जे आज हरपले आणि निसर्गमय झाले. अर्थात वयाच्या ८८ व्या वर्षी गुरुजींचे वृद्धापकाळाने काल दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. परोपकारी देवकर गुरुजींना वाहिलेली ही आदरांजली.
गुरुजींना विनम्र अभिवादन.
– संपादक
गोपीनाथ देवकर गुरुजी वारले, या बातमीवर विश्वास बसत नव्हता. कारण वयाने जरी ते ८८ वर्षांचे होते तरीही मनाने, उमेदीने, उत्साहाने व कार्यतत्परता व क्षमतेने केवळ ३३ वर्षाचे होते.
तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची कार्यक्षमता होती.
केवळ सुतार समाजासाठीच नव्हे तर अन्य समाजासाठी सुद्धा त्यांनी खूप कार्य केलेले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गुरुजी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत होते. कोणाच्याही सुखदुःखात जाणे, बारसं असो की लग्न असो की अंत्यसंस्कार, गुरुजी तत्परतेने हजर असायचे.
गुरुजींनी त्यांच्या पत्नीचे स्मरणार्थ सुतार समाजातील गरीब व गरजू मुलींच्या शिक्षणासाठी साधारणपणे गेल्या २० वर्षांपासून शिष्यवृत्तीचे कार्य केले.
साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांना प्रबोधनात्मक व्याख्याने दिली. विशेष म्हणजे यासाठी ते स्वखर्चाने ये जा करीत असत.
अशारीतीने त्यांनी, त्यांना मिळत असलेली पेन्शन हि समाज प्रबोधन व शैक्षणिक मदतीसाठी खर्च केली आणि एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अनेक संस्था व संघटनांनी त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान केला आहे.
गुरुजी म्हणजे प्रसिद्धी परान्मुख व्यक्तीमत्व होते. जे आज अनंतात विलीन झाले आहे.
त्यांच्या जाण्याने सामाजिक व शैक्षणिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यासाठी निसर्ग शक्ती देवो आणि गुरुजींच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो हि प्रार्थना निसर्ग देवतेला करतो.
समाजातील बंधू भगिनींनी, निःस्वार्थ सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, अशी आशादायी इच्छा व्यक्त करुन त्यांना समस्त समाज बंधू भगिनींच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— लेखन : संजय भालेराव.
सत्यशोधक समविचारी सहकारी समिति. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800