केलेला प्रवास चिरकाल लक्षात राहावा म्हणून मी अनेक खटपटी करत असतो.
त्या त्या स्थळांची छायाचित्रे कायम जपून ठेवण्याचा माझा अट्टाहास असतो. यासाठी शंभरावर फोटो अल्बम सांभाळून ठेवण्याची कसरत आमची सौभाग्यवती करत असते.
काही प्रवासांची टिपणे तर काहींची प्रवासवर्णनपर पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.
पंचवीस वर्षांपासून भटकंती करताना अनेक स्थळे विस्मृतीत जातात.
काही स्थळे मात्र आपण कधीच विसरू शकत नाही. त्यातलेच एक स्थळ आहे ताश्कंद हे शहर !
ताश्कंदच्या एका रस्त्यावर असलेला लालबहादूर शास्त्रीजींचा अर्धपुतळा माझ्या स्मृतीपटलावर कायम कोरला गेला आहे.

मध्य आशियातील अनेक देशांमधे माझे पर्यटन घडून आले. या देशांना आवर्जून कुणी भेट देणार नाही. परंतु वैद्यकीय परिषदांना हजेरी लावण्याच्या निमित्ताने मध्य आशियाई देश बघायला मिळाले.
या वैशिष्टय़पूर्ण प्रवासामुळे मध्ययुगीन वातावरणाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.

रेशमाचा व्यापार करणारे ते काफिले, त्यांना लुटणाऱ्या रानटी लुटारूंच्या टोळ्या, प्राचीन “सिल्करूट” व त्यावरून होणारा व्यापार, इब्न बतुता व मार्को पोलो सारख्या जगप्रवाशांची सफर, चंगिजखानाची युरोपपर्यंतची विजयी धडक, दुष्टात्मा तैमूरचा रक्तरंजित युद्धसंहार, अर्वाचीन काळातील ऑट्टोमन (तुर्क) साम्राज्य विस्तार, अशा अनेक ऐतिहासिक घटनांची माझ्या मनात उजळणी झाली.

ताश्कंद ते समरकंद हा अद्भुत प्रवास जागतिक महायुद्ध कालीन रशियन रेल्वे रुटवरून करताना अंगावर शहारे आले.
समरकंद शहरात भटकताना मध्ययुगीन वातावरणात आल्याची अनुभूती येत होती.
“समर” म्हणजे शुद्ध हवा आणि पाणी ! “कंद” म्हणजे नगर. या अर्थाचे हे तुर्की नामकरण असलेले हे नगर !
येथील मोठ्या चौकात तिल्ला कोरी नावाची मोठी मशिद बघून एका हाॅटेलमधे भोजन घेतले.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ज्या मेजावर बसून भोजन केले, नेमके त्याच खुर्चीवर बसण्याची संधी मला मिळाली.
ताश्कंद येथील ती दुर्दैवी घटना कुठलाही भारतीय विसरू शकत नाही. राजकीय खलबतीनंतर निवासाच्या हाॅटेलमधे रात्री लालबहादूर शास्त्रींजींचे निधन झाले.
या घटनेत मोठा घातपात घडून आला याचा संशय अजून टिकून आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताश्कंद शहरातील एका रस्त्यावर एक छोटा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे.
भारताच्या पंतप्रधानांचा इतका लहान अर्धपुतळा बघून माझ्या मनात खंत निर्माण झाली.
रशियन काळातील असंख्य खाणाखुणा आता मुस्लिम राजवटीत हळुहळू नष्ट होताना दिसत आहेत.
उझबेकिस्तान देशातील ती भटकंती वैशिष्टय़पूर्ण होती हे मात्र खरे !

– लेखन : डाॅ अच्युत बन. नांदेड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800