हरित मित्रपरिवार आणि गुरुकृपा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवड, ता. वाई, जि. सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे होत्या.
या प्रसंगी बोलताना डॉ बोबडे यांनी हे पुरस्कारमूर्ती यापुढे अधिक जबाबदारीने मोठे कार्य करतील; आणि समाजामध्ये त्यांचे अनुकरण करणारे वाढतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रा. रामराव पवार सर यांनी प्रास्ताविक केले. गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह प्रशान्त थोरात यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात ऊर्फ दादा यांच्या कार्याचा आढावा घेतला; आणि उतारवयात त्यांनी संगमनेर भागात दंडकारण्य अभियान सुरू करून उजाड माळरानावर लाखोंच्या संख्येत वृक्षराजी कशी निर्माण केली याची माहिती दिली.
डॉ. महेंद्र घागरे यांनी हरित मित्र परिवाराची वाटचाल सर्वांसमोर मांडली. तसेच छोट्या गावांची अस्मिता आणि गुणवत्ता वाढण्यासाठी तिथे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करण्याची योजना विशद केली.
पुरस्कारमुर्तीनीही आपापले मनोगत व्यक्त केले. सौ. सुवर्णा घागरे यांनी सर्व पुरस्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन डॉ. शरद पवार सर यांनी केले. उपसरपंच श्री. कमलाकर गायकवाड, श्री. अनिल गायकवाड, श्री. नितीन विसापुरे, श्री. प्रताप यादव, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पाचवड गावचे ग्रामस्थ इत्यादी मोठ्या प्रमाणात हजर होते.
आभारप्रदर्शन
डॉ. भारत खिलारे सर यांनी केले. उपस्थित सर्वांवरच कार्यक्रमाचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला; आणि प्रत्येक जण पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक मनःपूर्वक काम करण्याची भावना मनात ठेवून घरी गेला.
पुरस्कारमूर्तींचा परिचय :
प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये आपलं जीवन पर्यावरणपूरक असावं, हा कटाक्ष ठेवून विद्यार्थ्यांना तशीच शिस्त लावणाऱ्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, विविध परिसरांमध्ये आणि कॉलेजच्या आवारात वृक्षलागवड करून, विद्यार्थ्यांना त्यात सामील करून घेणारे प्राचार्य तात्यासाहेब लावंड सर, पाचवड गावामध्ये कार्बन न्यूट्रल चळवळीची सुरुवात करणाऱ्या आणि २५ एकराची नवलाई देवराई सुरू करणाऱ्या सरपंच अर्चना विसापुरे, आशियातील उत्कृष्ट असा गुळुंब-चांदक ओढाजोड प्रकल्प पूर्ण करणाऱ्या माजी सरपंच अल्पना यादव, रत्नागिरीतील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरू करणारे आणि लाखो झाडांच्या लागवडीचा वसा घेतलेले विलास महाडिक सर आणि कोवळ्या वयात पर्यावरणासाठी २३,००० झाडे लावून त्यांचे संगोपन करणारे रोहित बनसोडे या सर्वांना पुरस्कार देण्यात आले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800