५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘झाडे लावा, झाडे जगवा ‘ या मोहिमेत अनेक झाडे लावली जातात. या काळात उत्साहही असतो आणि पर्यावरण रक्षणाचे भान सुध्दा !
पण काही संस्था वर्षभर आणि सातत्याने अनेक उपक्रमांची आखणी करतात. त्यात वृक्षारोपणालाही महत्वाचे स्थान असते .
कांजूरमार्ग येथील मुंबई हायवेला लागून ‘घनकचरा’ व्यवस्थापन केंद्र असलेल्या जागेत आजच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे एक स्तुत्य उपक्रमच म्हणावा लागेल.
या केंद्राचे अधिकारी श्रीनिवासन चारी म्हणाले कि, हे केंद्र मोठ्या जागेत वसलेले आहे. मुंबईतला ९०% कचरा इथे इथे प्रक्रियेसाठी आणला जातो. ६ टनाची एक, अशा हजारो गाड्या कचरा या केंद्रात आणला जातो.
साहजिकच धूर , कार्बन यामुळे इथलं वातावरण खराब होतं आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं.
यावर दोन पध्दतीनं प्रक्रिया होते. या पासून वायू तयार होतो आणि त्यांचे रुपांतर विजेत होते. तर दुसऱ्या पध्दतीत या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाऊन त्याचे कंपोस्ट खत तयार करुन विक्रीला दिले जाते.
साहजिकच या प्रक्रियेमुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील ? हे वातावरण कसं बदलता येईल ? या विचारातून महाराष्ट्र शासनाचे वसुंधरा बचाव अभियान, महाराष्ट्र शासनाच्या तांत्रिक शिक्षण विभाग यांच्या वतीने आणि सहकार्याने ही जबाबदारी मो. हा. साबु. सिद्दिकी तांत्रिक महाविद्यालयाचे आणि दक्षिण मुंबईचे लागवड अधिकारी श्री मनोज देशमुख सर यांनी ही योजना स्वधर्मा फाऊंडेशनच्या वतीने राबवायची ठरवली.
मुळात या परिसरात ही झाडे लावली तर फळं, फुलं यांच्या सुगंधाने हा परिसर बहरुन जाईल. वृक्षांची थंडगार सावली ही मिळेल, प्राणवायू मिळेल, प्रदूषण ही कमी होईल ही संकल्पनाच छान आहे.
याच हेतूने पर्यावरण दिनानिमित्त बदाम, पेरू, बहावा, मोहगनी, कांचन, कडुनिंब आणि अन्य झाडांची लागवड करण्यात आली.
मो. हा. साबु सिद्दिकी तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कुरेशी यांचे मार्गदर्शन आणि अभियंता श्री गोवर्धन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
करोना काळाचे भान राखत अत्यंत कमी उपस्थितीत आणि सोशल डिस्टंसिगचे पालन करीत हा उपक्रम पार पडला.
अशा प्रकारे पुढेही अनेक सामाजिक उपक्रमाबरोबर वृक्षारोपणाचा प्राधान्याने विचार करुन हजारो झाडे लावली जातील. यात स्मृती प्रित्यर्थ लावलेल्या झाडांचाही समावेश असेल.
प्रदूषण, पर्यावरणाचा विचार जगभर केला जात आहे. सर्व साधारण ठिकाणाबरोबरच अशा ठिकाणी केलेली वृक्ष लागवड हा पर्याय पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सुगंधी पर्याय ठरेल. दुर्गंधी असलेल्या जागेत सुगंध पसरवू या हा विचारच अभिनव व प्रेरणादायी आहे.
एक नवीन संकल्पना रुजविल्या बद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन.

– लेखन : भुपेंद्र मिस्त्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.