अलीकडे आपण प्रचंड प्रमाणात वातावरणात होणारे बदल अनुभवत आहोत. यामध्ये अनेक ठिकाणी ढगसदृश्य पाऊस, ढगफुटी, मुसळधार पाऊस तर अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट, अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झालेले दिसतात.
पण मित्रहो, आपण कधी असा विचार करतो का हे सर्व आकस्मित वातावरणातील बदल कशामुळे होत असतील ? याला कोण जबाबदार असेल ? तर मला असे वाटते, निसर्गामध्ये नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळे, ढगफुटी, ज्वालामुखी ई. मुळे वातावरणात अनेक बदल होतात व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. पण निसर्गतःच निसर्गामध्ये हा झालेला विपरीत बदल पुन्हा निसर्गामध्ये पूर्व परिस्थिती राखून नैसर्गिक समतोल राखला जातो. हे नैसर्गिक आहे. परंतु आज आपण निसर्गात जे बदल पाहतोय ते मानवनिर्मित बदल आहेत. मानवाने आपल्या हव्यासापोटी तसेच औद्योगिकरण, शहरीकरण, प्रगतीकडे वाटचाल करीत असताना जो निसर्गामध्ये हस्तक्षेप करत बदल केले याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर होताना दिसत आहे.
प्रगती हि करावी पण त्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होऊ नये याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. याचा विपरीत परिणाम निसर्गावर कसा होतो ते पाहू. आज आपण प्रचंड वेगाने प्रगतीपथावर विराजमान होत आहोत. अनेक ठिकाणी मेट्रो, एक्सप्रेस वे, फ्री वे धावताना दिसते पण याचा विपरीत परिणाम हा निसर्गावर होताना दिसतो आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड झालेली दिसते, झाडे विरळ झालेली दिसतात. झाडे हि आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत. आपण जंगलतोड करताना हे विसरतो कि आपले सर्व जीवनच झाडांवर अवलंबून आहे कारण आपल्या जगण्यासाठी लागणार अत्यंत महत्वाचा घटक ऑक्सिजन हा आपल्याला झाडांकडूनच मिळतो. आपण जंगलतोड केली तर हा ऑक्सिजन आपल्याला कोठून मिळेल ? आज जे आपण हे समजून नाही घेतले आणि असेच दुर्लक्ष करत राहिलो तर भविष्यात आपल्याला आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरण्याची वेळ लवकरच येईल यात तिळमात्र शंका नाही.
झाडे हि निसर्गात आपोआपच वाढत असतात .आपण फक्त त्यांना तोडण्याचे थांबविले पाहिजे व त्यांची निगा राखली पाहिजे. मित्रहो, झाडांचे अनेक फायदे आहेत यामध्ये प्रामुख्याने आज आपण महापूर, भूस्खलन अशा परिस्थितींना सामोरे जात आहोत. त्याला आळा बसण्यास झाडे अत्यंत महत्वाचे कार्य करतात. झाडांच्या मुळांमध्ये जमिनीला घट्ट धरून ठेवण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे झाडे हि मुळातच गारवा, थंडावा देतात त्यामुळे जमिनीची धूप थांबते. त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे.
नुकतेच नागपुरात ढगसदृश्य पाऊस पडला. अनेक ठिकाणी आपण ऐकतो ढगफुटी झाली. म्हणजेच काय तर वातावरणातील तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होते. यालाच आपण “वैश्विक तपवृद्धी” (ग्लोबल वॉर्मिंग) असे म्हणतो. तर तापमानात वाढ कशामुळे होते ? तर आपण प्रचंड प्रमाणात जंगलतोड करतो यामुळे काय होते वनस्पतींकडून विसर्जित होणारा ऑक्सिजन थांबतो आणि वनस्पती शोषून घेणारा कार्बन – डाय – ऑक्साईड हा वातावरणात तसाच राहतो. तसेच आपण श्वासोच्छवासावाटे सोडणारा कार्बन – डाय – ऑक्साईड देखील वातावरणात तसाच राहतो. तसेच औद्योगिकीकरणातून कार्बन – डाय – ऑक्साईड, सल्फर – डाय – ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड असे अनेक विषारी वायू वातावरणात मिसळतात. यामुळे वातावरणातील तापमानात वाढ होते. आणि याचा परिणाम हा हिमालयातील बर्फ वितळण्यात होतो व प्रचंड प्रमाणात समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होते व पूर येतो.
तर आजच्या या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वातावरणातील हे आकस्मित व विपरीत बदल थांबविण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहून पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करणे थांबविले पाहिजे व त्याचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वानी झाडे लावली पाहिजेत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हि काळाची गरज आहे. अन्यथा विनाश अटळ आहे !
मानवाचा निसर्गात होणार हस्तक्षेप व औद्योगिकरणामुळे अनेक प्रकारच्या प्रदूषणाचा विळखा वाढत असताना दिसतो. यालाही आपणच कारणीभूत आहोत. नुकतेच गणपतीचे विसर्जन झाले, गणपती विसर्जनावेळी निर्माल्य, थर्मोकोल, पाण्यात टाकल्यामुळे पाणी प्रदूषण हि समस्या उदभवली. तसेच कारखान्यातील सांडपाणी न प्रक्रिया करता सर्रास नदी, समुद्र, नाले यामध्ये सोडले जाते. यामध्ये अनेक सेंद्रिय, असेंद्रिय पदार्थ, आम्लयुक्त पदार्थ असतात ते पाण्यामध्ये मिसळले जातात आणि याचा विपरीत परिणाम हा पाणी प्रदूषण होते. तसेच पाण्यातील मासे, खेकडे, तसेच पाण्यातील सूक्ष्मवनस्पती यांच्यावर विपरीत परिणाम होतो. हे प्राणी व वनस्पती मृत होतात. असे करणे थांबविले पाहिजे.
कारखान्यातील येणारे प्रदूषित पाणी त्यावर प्रक्रिया करून त्यातील आम्लयुक्त पदार्थांची तीव्रता कमी करून त्याचा वापर कारखाना धुण्यासाठी, कार, गाड्या धुण्यासाठी वापरू शकतो. असे अनेक उपाय करून प्रदूषणाला आळा बसवू शकतो. व पर्यावरण वाचवू शकतो. आणि हि फक्त सरकारची व एन.जी.वो यांची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे.

— लेखन : डॉ.यशोधरा वराळे. प्रभारी प्राचार्या
डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800