खूप छान आणि जवळचा विषय आहे हा ! हो, पाऊस आणि माणूस वेगळे करूच शकत नाही तुम्ही, इतकं घट्ट नातं आहे
दोघांचं ! म्हणून तर पाण्याला जीवन म्हणतात ना ? पावसावरंच तर आपलं जीवन अवलंबून आहे.
मनुष्य कस कसा बनला याची चर्चा अश्मयुगापासून आपण करतो. तेव्हा पाणी होते का, असे आपण विचारतो का ?
नाही विचारत. पण चंद्रावर, मंगळावर पाणी आहे की नाही याची मात्र आपण जरूर चर्चा करतो. म्हणून तेथे रहायला आपण जाऊ शकत नाही. कल्पना करा .. चंद्रावर मंगळावर पाणी आहे, पोहोचलात ना लगेच तेथे. म्हणजे बघा जिवंत रहायचे असेल तर आधी विचार येतो तो हवा व पाण्याचा !
जगण्यासाठी मुलभूत गोष्टी कोणत्या ? तर अन्न, पाणी, वस्र व निवारा. आणि हे पाणी देतो तो फक्त पाऊसच ! अन्नाचा शोध हळू हळू माणसाने घेतला व सुरूवातीला त्याने कंदमुळांचा आश्रय घेतला. पण हवा व पाणी तर उपलब्ध होतेच ना ? आणि यामुळे त्याला तशी चिंता नव्हती. फक्त शोध घ्यावा लागला तो अन्नाचा. माहित नाही हा पाऊस कधीपासून पडतो आहे व तो किती जुना आहे !
सुरूवातीला जेंव्हा पासून आपल्याला आठवते आहे, त्या ऋषीमुनिंच्या संस्कृती निर्माण होण्याच्या काळापासून मनुष्य वस्ती वसली ती नद्यांच्या काठानेच ! अहो पाण्यावाचून आपले पान हलत नाही.
उठसूठ दिवसातून छप्पन वेळा आपल्याला पाणी लागते. ”हे पाणी फक्त नि फक्त पाऊसच देऊ शकतो.” रात्रीचे झोपायचे काही तास सोडले तर सतत आपण पाण्याच्या संपर्कात असतो. इतके आपण पाणीदार आहोत. एक दिवस नळाला पाणी येणार नाही कळले की घरात लगेच आणिबाणी डिक्लेअर होते. आपण नको तितके पाणी साठवतो. (नंतर फेकून देतो). पाणी संपले तर काय ? आपण घाबरतो. मग साठा करतो. उठल्या पासून ब्रश करण्यापासून जो पाण्याचा वापर सुरू होतो तो कपडे करून ॲाफिसला जाई पर्यंत ! जेवण करतो, पाणी पितो, बाटली भरून घेतो मग आपण घराबाहेर पडतो.

पावसाळ्यात शेताला पाणी, झाडांना पाणी, बांधकामाला पाणी, जिथे तिथे पाणी लागते आपल्याला ! मोठमोठे कारखाने, रेल्वे, विमाने सर्वत्र पाण्याचा मुक्त वापर होतो. गावांगावातून नदी नाल्यातून शेतीला पाटाने पाणी पुरवठा होतो. धरणातून पावसाचे साठलेले पाणी पाटाने शेताला सोडून बारामाही पिके घेता येतात. लोक गायी, म्हशी, घोडे सारे काही नदीवर धुतात. किती ही घाण केली तरी पाणी ती वाहून नेते व स्वच्छ होते.

युरोप मध्ये अती थंडी मुळे आपल्या पेक्षा पाण्याचा वापर कमी होतो. हे लोक टिश्यू पेपर जास्त वापरतात. इथले पाण्याच्या पावसाचे गणित तर मला कधीच कळले नाही, उठसूठ केव्हा ही इथे पाऊस पडत असतो. आपल्या सारखे तीन ऋतु नाहीत. क्षणात पाऊस येतो व रस्ते धुवून लगेच जातो ही !
परवा तर मी एक कावळे दादा पाण्याच्या बाटलीत खडे टाकतांना पाहिले. आणि ते पाणी प्यायले. एक “पोपट”राव बेसिन मध्ये स्वत: नळ सोडून मनसोक्त आंघोळ करतांना, मजा करतांना पाहिले आणि चिऊताई तर मुठभर पाण्यातही पंख फडफडवत मस्त आंघोळ करते हे आपण नेहमीच पाहिले आहे.
एका गाईने शिंगाने नळ उघडला, पाणी प्यायली आणि शिंगाने नळ बंदही केला. प्राणी, पक्षी आपल्यापेक्षा किती शहाणे आहेत हो ! आणि जलचर तर पाण्यातच राहतात व मस्त पोहतात. मासे, कासव, बदक, मगर व अनेक पक्षी ही पाण्याचा मनसोक्त आनंद घेत डुबकी मारून मासा घेऊन पळतात. पाणी आहे म्हणून मासे व इतर जलसृष्टी आहे. तर …हे पाणी फक्त
पाऊसच देऊ शकतो.
पावसाचे असे अगणित उपकार आहेत माणसावर की माणूस पावसापासून स्वत:ला अलग करण्याची कल्पनाही करू शकत
नाही. पाऊस पडतो, त्याची वाफ होते, वर आकाशात जाते, त्याचे ढग बनतात व अशा रीतीने हे जलचक्र पूर्ण होते. पाऊस
नसेल तर.. किती ही सुपिक जमिन असेल तरी कशी पिकेल हो ? म्हणजे पाऊस नाही तर आहे फक्त उपासमार…
काही पिकणारंच नाही तर खाणार काय ?

असा हा पाऊस जितका उपकारक आहे तितका अपकारकही आहे याचा अनुभव अलिकडे वारंवार आपण घेत आहोत. त्यातून अवकाळीने अलिकडे असा काही धुमाकूळ घातला आहे की विचारू नका. त्यात वादळवाऱ्यासह १०/१५ मिनिटे गारा पडतात व शेतकऱ्याला पार उध्वस्त करून जातात.
पावसाच्या या लहरी पणामुळे अतिवृष्टी दुष्काळ अशा संकटात सापडून आज पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली. ढगफुटीमुळे बद्रिकेदार, हरिद्वार येथे हजारो लोक जमिनीत गाडले गेले. सांगली सोलापूर पाण्याखाली गेले. उत्तरेत तर पावसाळ्यात प्रचंड पूर व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वहात असतात.
किती ही नासधूस पावसाने केली तरी आज आपण पाऊस नाही म्हणून किती कासाविस झालो आहोत. त्याची चातका सारखी वाट पाहतो आहोत. कर बाबा नासधूस, पण ये ! अशी आपली आज अवस्था आहे. पावसा शिवाय धरतीला पर्याय नाही हेच खरे आहे ! थोडक्यात पाऊस नसेल तर आपण नसू हे सत्य आहे. तर.. पावसाशी आपलं असं जन्म मरणाचं नातं आहे…. म्हणून तर आपण म्हणतो ना…..
ये रे ये रे पावसा ..
तुला देतो पैसा…

— लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800