१. पावसाचा हाहा:कार
भरवसा निसर्गाचा
सत्य कसे कळणार
पावसाचा हाहा:कार
गावोगावी दिसणार
बांध फुटले नदीचे
सिमा ओलांडून आली
घर वाडे इमारती
होती ती नव्हती झाली
कोण गेले रे वाहून
कोणी अडकले रस्ती
धुवांधार पावसाने
केली खट्याळचि मस्ती
गाड्या पलटल्या रस्ती
खड्यामध्ये किती गेले
जलाशयी आला लोट
इमारती खाली मेले
पिक खरीप लोपले
भात पिकेही लोटले
गेले हातचे तोंडाचे
देवा कसे रे कोपले
सागरात कमी दाब
जलाशय उसळले
चराचर आपल्यात
सामावून खवळले
— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई
२. जिणे नको ढासळू
पाण्यासाठी वणवण आता
उरली आहे कोठे ?
तुडुंब भरली कोठी आणिक
वाहून गेले गोठे
पाणी म्हणजे जीवन असते
ठावूक आहे जना
छत फाडोनी कोसळते ते
घोर लागला मना
उरातली स्वप्नेंच त्यामुळे
खोटी झालीत आता
शोधित फिरतो प्रियजन माझे
झालेत बेपत्ता
उंच ढिगारे इथे ढगांचे
इथे कमी दाब ताप
अमाप माराच्या तापाने
इथे अनावर व्याप
नजर जावी पहावे तिथे
का रे समुद्र दिसावा ?
किती मृत्यु किती बेपत्ता
हा खेळ आता आवरावा
बुडण्या इतके झाले पाणी
नको आता कोसळू
परवडली रे बाबा वणवण
जिणे नको ढासळू
— रचना : सुनील चिटणीस. पनवेल
३. तुझा माझा पाऊस (एकच आशा….)
तुझा माझा पाऊस …
कधीच एक नव्हता
तुझा पाऊस ढगातून,
अंगणात पडायचा,
माझा ?….गळक्या छपरांतून,
अंगावर कोसळायचा….
तुझ्या पावसात तुला हवी,
खमंग वासाची भजी, नी चहा,
माझ्या पावसात मला नकोशा,
होतात कुबट वासाच्या गोष्टी दहा
तुझ्या पावसात तुला वाटते,
डोंगरात भिजायची हवी मजा,
माझ्या पावसात, मला घडते,
कॅाटखालच्या गुहेत बसायची सजा…
तुझ्या माझ्या पावसांत,
एक मोठी दरी आहे,
ती ओलांडून तू ये माझ्या पावसात ,
असे मी कधीच म्हणणार नाही,
माझ्या पावसाच्या जोरदार तडाख्यात
तुला जगता येणार नाही…..
एकच आशा करतो आता,
दरी मला ओलांडता यायला हवी,
तरच तुझा माझा पाऊस एक होईल,
तुला माझ्या छत्रीत साथीने चालता येईल…
— रचना : चित्रा मेहेंदळे.
४. पाऊसाची सर (बाल कविता)
पावसाची सर
आली भरभर
मातीचा सुगंध
पसरला घरभर
छोट्याशा गल्लीत
छोटासा पूर
कागदी होड्या
चालल्या भुर्रभुर्र
भिजलेली छत्री
गरगर फिरवा
थंडगार तुषार
सर्वांवर उडवा
मारल्या उड्या
उडविला चिखल
सुंदर चेहऱ्यावर
आईची चापट
गारगार वारा
गरमगरम चहा
संगे कांदा भजी
वाह! वाह! वाह!
— रचना : सौ. शितल अहेर. खोपोली, रायगड.
५. निसर्गाची किमया
श्रावणात बरसतो कोसळधार
सगळीकडे उडाली दानादान
पुराने वाहून गेले घरे-दारे
ते पाहून-ऐकून मन झाले सुन्न !१!
काय वर्णावी निसर्गाची किमया
कधी कधी तर सगळ्यांना बेचैन करतो
मग दाखवत नाही दया – माया
अन् बदलून जाते सगळीच रया !२!
चिमणी – पाखरांची पण
बंद झाली चिवचिवाट
नदी – नाले तुडुंब भरून वाहती
शेतकऱ्यांची लागली वाट !३!
मुंबईकरांचे हाल पहावेना
ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात
पण त्यांची दखल कोण घेतो?
बोलून चालून बिचारे गप्प बसतात !४!
श्रावणातील पावसाने
जनजीवन विस्कळीत झाले
होते नव्हते तेही वाहून गेले
डोळेही अश्रू धारांनी भरले !५!
–– रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800