ओल्या वाटेवर
अनवाणी पावलांनी चालायचंय
तुझ्या सोबतीने मला
पाऊस पडताना बघायचंय…🌨️
ढगांतून गडगडाट ऐकायचाय
विजांचा लखलखाट बघायचाय
हिरव्या डोंगरातून
धारांना झेलायचंय
तुझ्या सोबतीने मला
पाऊस पडताना बघायचंय…🌨️
निथळतील पानं,
टपटप थेंब सांडतील
चिंब भिजलेले पंख झाडून
पक्षी स्वच्छ होतील
विस्कटलेल्या रांगोळीत
पुन्हा रंग भरायचाय
तुझ्या सोबतीने मला
पाऊस पडताना बघायचंय ..🌨️
आकाशातले इंद्रधनू
माझ्या डोळ्यात उतरेल
सप्तरंगी स्वप्नात मन मुराद गुंतेन
एका छत्रीत तुझ्या सोबत
सामावून जायचंय
तुझ्या सोबतीने मला
पाऊस पडताना बघायचंय …🌨️
पाण्यावर उठलेल्या तरंगात
मनाला हरवायचंय
ढगांमधून चालताना
शुभ्र रंगाला वेचायचय
जलधारांच्या साक्षीने
स्वर्गसुखात नहायचंय
तुझ्या सोबतीने मला
पाऊस पडताना बघायचंय…..🌨️
रचना : प्रा डॉ सुचिता पाटील 🍃
खूप छान