Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीपाडव्याचा गोडवा

पाडव्याचा गोडवा

दीपावली पाडवा मराठी संस्कृतीत अनमोल आहे. मराठी सणापैकी पाडवा मोठा सण मानला जातो. या दिवशी पहाटे उठुन अभ्यंगस्नान घातले जाते. कारण बळी नावाचा खुप मोठा राजा होता. दैत्य हिरण्यकश्यपु चा मुलगा भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाचा नातु म्हणजे बळीराजा. बळीराजा फार दानशुर होता.व तो त्याच्या राज्यात कोणाही याचकाला, मागणार्‍याला नाराज करत नसे. तो दानशुर असल्यामुळे दानशुर बळीराजा, प्रजेचे कल्याण करणारा कल्याणकारी राजा, चांगला प्रशासक, उत्तम शेतकर्‍यांचा शासक अशी त्याची ख्याती होती.

अभिजन वर्गाचा तो प्रतिनिधी आहे. पण दुर्देवाने तो दैत्यकुळात होता आणि महादेवाने सर्वश्रेष्ठ वर दिल्यामुळे त्याला अहंकार झाला असे सांगतात. तो ऋषीमुनीना त्रास देवु लागला. त्याच्या धनाचा, संपत्तीचा, श्रीमंतीचा अहंकार त्याला झाला. म्हणुन मग श्री विष्णुने वामन अवतार घेवुन त्याच्याकडे याचना केली. दान मागितले. तो कोणाला निराश करत नसल्यामुळे वामनाला ही काय हवे ते माग असे सांगितले. वामनाने तीन पावले जमिन मागितली. बळीने होकार दिला. वामनाने पहिले पाऊल ठेवत पृथ्वी घेतली. दुसरे पाऊल ठेवत आकाशस्वर्ग घेतला. आता तिसर पाऊल कुठे ठेवु ? असा प्रश्न वामनाने केला तेंव्हा बळीराजाने माझ्या मस्तकावर ठेव असे सांगितले. मग काय वामनाने बळीराजाच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवले आणि त्याला पाताळात घातले. त्याला पाताळात घातले तेंव्हा बळीराजांने शेवटी एक वर मागितला, तो असा की “माझ्या स्मरणार्थ कार्तिक पाडव्याला अभ्यंगस्नान केले जावे. या दिवशी याचकाला दानधर्म केला जावा. आणि
“ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, बळीराजा पुन्हा राजा होवो” असा वर मागितला. म्हणून या दिवशी अशी प्रार्थना केली जाते.

या दिवशी पहाटे लवकर उठतात. अभ्यंगस्नान करतात. आमची आई आजही आम्हांस स्नान घालते. अभ्यंगस्नानानंतर कणकेचे दिवे प्रज्वलित करुन डावीकडुन उजवीकडे व उजवीकडुन डावीकडे औक्षण करुन उतरुन ठेवतात. यातुन ईडा पिडा जाते. उदंड आयुष्य लाभते. बळीसारखा अपघात होत नाही. समृध्द आयुष्य, आरोग्य लाभते. घात होत नाही.

याच दिवशी पत्नी आपल्या पतीला ही अभ्यंगस्नान घालते. स्नानानंतर औक्षण करते. त्याच्या उदंड आयुष्याचे मागणे मागते. खरे तर हल्ली सोशल मिडियाच्या या काळात हल्ली काही पत्नी पतीला पाडव्याला ओवाळतात पण दागदागिन्यांची मागणी करतात. सोन्याचा दागिना मिळावा यासाठी हट्ट करतात. पतीने ने औक्षण केल्यावर दागिना द्यावा असे आताच्या काळात फॅड निघाले आहे. पण खरे तर पती पत्नीचं प्रेम उदंड हवे. या प्रेमात रुसवा, राग असावा पण “मागितले ते मिळालेच पाहिजे” असा दुराग्रह नसावा.

माझी आई गेली तीस वर्ष दादांना पाडव्याला औक्षण करते. पण या माऊलीने कधी दागिण्यासाठी, साडीसाठी हट्ट केला नाही. आपल्या मुलाला स्वःताची किडनी दान देणारी ही माऊली आमची दैवत आहे. या घराचा अलंकार तीच आहे. प्रचंड गरिबीत ही माझ्या वडिलांबरोबर सोन्याचा संसार करणारी माझी आई कधीच दागिन्यासाठी, साडी साठी रुसली नाही. हट्ट केला नाही. उलट तिने सुखाचा संसार केला. असो…

स्नानानंतर पुजा अर्चना केली जाते. आमच्या भागात दुकानांत पाडव्याला सकाळी लक्ष्मीपुजन करतात. आम्ही दुकानाला झेंडुची, आंब्यांच्या तोरण माळा घालतो. दुकाने फुलाने सजली जातात. नंतर लक्ष्मीपुजन केले जाते. फटाके फोडले जातात. आप्तस्वकियांना फराळ देतात. वडिलधार्‍या मंडळीचा पानसुपारी देवुन सन्मान दिला जातो. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

याच दिवशी गावातली वाजंत्री, दुकानासमोर येतात. वाद्ये वाजवुन दक्षिणा, पानसुपारी मागतात. “ईडा पिडा टळो, बळीराजाचं राज्य येवो अशी प्रार्थना करतात. “गावातील पुरोहित, जंगम, स्वामी, वाजंत्री, गोसावी, डवरी, नाथपंथी, गोंधळी, वासुदेव वाले, पोतराज, मरीआईचा गाडा वाले असे सर्व जण दक्षिणा, शिधा, फराळ, पानसुपारी मागतात. दुकानदार ही बळीच्या भुमिकेतुन हे दान देतात. दुकानात आलेल्या याचकाला तृप्त केले जाते. त्याला दान दिले जात. ते ही समाधानाने आर्शीवाद देतात. “ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” असा आर्शीवाद देतात.

गावगाड्यात माणसे आजही प्रथा पाळतात. संस्कृती जोपासतात. सकाळी सकाळीच गावातील कपडे धुणारी धोबीण ताई, परटीण मावशी औक्षणांचे ताट घेवुन घरोघरी येतात. त्या घरातील पुरुष माणसांना औक्षण करतात. पुरुष माणसे ही ताई समजुन साडीचोळी, ऐपतीप्रमाणे भेटवस्तु, फराळ, पानसुपारी भेट म्हणुन देतात.

दुपारी शेतात जावुन पाच मोठे दगड घेतले जातात. त्या दगडांना चुना, कावाने रंगवुन ते पाच दगड ओळीने मांडले जात. त्यांना गुळसाखर असा नैवेद्य दाखवुन अगरबत्ती लावली जाते. दिवा लावुन पुजा करतात.

हे चुना, कावाने रंगवलेले पाच दगड म्हणजे पाच पांडव होय. याच पाच पांडवांनी सत्याचा स्विकार केला. असत्यावर विजय मिळवत नितिमत्ता शिकवली. त्यांचे राज्य समृध्दीचे होते. म्हणुन पांडवांची पुजा शेतात बांधुन कृषीसंस्कृती समृध्द केली जाते.

किती चांगल्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत, कृषीसंस्कृतीने बांधलेले आहोत. विशेष या दिवशी अंगणात ग्रामीण स्रीया शेणाच्या गवळण्या घालताना पाच पांडव, द्रौपदी, पेंद्या, श्रीकृष्ण, अशा बाहुल्या सजवतात.

हल्ली इंटरनेटवर पबजी खेळणार्‍या तरुणांना, नेटवर चॅटिंग करणार्‍या गृहिणीना आणि नेटवर पडिक असलेल्या आपल्या सुज्ञ लोकांना या संस्कृतीचे पाईक कसे होता येणार ? आभासी होत आहे सारे. पांडवांना पत्यांचा मोह झाला, त्यांनी डावावर पत्नीला लावले तसेच आपण ही आभासी होत चाललो आहोत. आपणही संस्कृती, संस्कार डावावर लावतो आहोत. या चांगल्या संस्कृतीला बुडविण्याचे पाप, पुढील पिढीला संस्कृती हस्तांतरित न करण्याचे पातक आपण भोगत आहोत. शुभेच्छा तर लाखोनो रोज सोशल साईटवर आहेत. जगणे कृत्रिम होत चालले आहे. दुर्देव हे सारे तुम्हांला सांगतानाही या आभासी माध्यमांचा वापर करावा लागतोय, हे शाश्वत सत्य आहे. असो….

ही दिवाळी आत्मचिंतनाने समृध्द व्हावी, संस्काराने मोठी व्हावी,आणि संक्रमनाने विकसित होत दृढ व्हावी हिच शुभकामना.

– लेखन : पंकज काटकरगुरुजी, काटी, जि.उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४