पायवाट जीवनाची
सुख दुःखी भिजलेली
हिरवळ मार्गावर
तुझी भेट मिळालेली..
छत्र छाया जाहलास
तळपत्या उन्हामधी
कळलेच नाही काही
छाया दूर झाली कधी?
स्वप्नं सजवता नवी
दृष्ट लागली कुणाची
काटे फार टोचले रे
आस तुटली मनाची..
होता चढ वा उतार
हात हाती ना राहिला
चिंब होत पावसात
पूर अश्रूचा वाहिला..
पायवाट होती खरी
ऊन सावलीचा खेळ
मृगजळ जणू सारे
नाही जुळला रे मेळ..

– रचना : सौ. मनिषा पाटील, पालकाड, केरळ.