Saturday, December 21, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला - भाग १६

पालकत्व : एक कला – भाग १६

बाळाचं पुनर्वसन : सुरक्षित मार्ग

Sec. 29 of the Juvenile Justice Act, 2000 provides for the Child Welfare Committee. The Committee has the sole authority to declare the child in need of care and protection who are orphan, abandoned or surrendered free for adoption.
माझी संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात यावी आणि कोणीही माझा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना माझी कोणतीही माहिती देण्यात येऊ नये…… समर्पण पत्राचं वाचन सुरू होतं.

आज एका कुमारी मातेने आपलं बाळ सरेंडर करण्याचा निर्णय घेतला होता. समर्पणपत्र (surrender deed) द्वारे आपलं बाळ सोपवण्यास ती माता आमच्या समोर आली होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते. समर्पणपत्राचं वाचन सुरू होतं आणि ती ओल्या डोळ्यांनी बाळाकडे बघत होती. नरम कपड्यात गुंडाळलेलं इवलंसं बाळ आपल्या गुलाबी मुठीत तिची बोटं घट्ट धरून होतं. ती समर्पणपत्र ऐकता ऐकता आपली बोटं हळूवार सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. कधी बाळाकडे, कधी आमच्याकडे तर कधी SAA (Specialised Adoption Agencies) मधून आलेल्या सोशल वर्कर कडे बघत होती. कोणीतरी धोका देऊन तिच्या भावनांशी खेळ करून निघून गेला होता.

यावेळी मला एक विचार आला मातृत्व हे केवळ एका स्त्री च का नसावं. त्याच्यावर प्रश्नचिन्ह का निर्माण होतात. आई तर आपल्या बाळाला तिचा श्वास देते, रक्त पुरवते आणि बाळाचे वडील कोण आहेत याचा तोल मोल करून तर ती तसं करत नाही ना. ती तिच्या गर्भात त्याला जपते जन्म देते. किती शुद्ध प्रामाणिक नातं आहे हे मग त्याच बीज खरंच इतकं महत्त्वाचं आहे का. ती आई आणि ते बाळ असं पण एक कुटुंब होऊ शकेल का. त्या आईचा केवळ आई म्हणून स्वीकार होऊ शकेल का. त्यांचा स्वीकार करणं आणि न करणं याचा अधिकार खरंच इतर कोणाला आहे का. तिला आलेलं मातृत्व तिने कसं सांभाळायचं हा संपूर्ण तिचा निर्णय असायला हवा ना. कसल्या तरी भीतीने तिला कधी कधी क्रूर निर्णय का घ्यावे लागतात.

एखाद बाळ आपल्याला कचऱ्याच्या कुंडीत मिळून येतं, एखाद्य बाळ सार्वजनिक शौचालयात मिळून येतं. त्या मातेला तिचं मातृत्व जगण्याचा अधिकार त्या बाळाच्या बीजाची ओळख असल्या शिवाय मिळू नये या नियमच ओझं तिला असे निर्णय घेण्यास भाग पाडत आहे का आणि अशी परिस्थिती निर्माण झाली असता तिला हवी असलेली गोपनीयता राखून बाळ सुरक्षित एखाद्या कुटुंबात जाऊ शकेल अशी योजना दत्तक कायद्यात केलेली आहे. त्या बाळाच्या जीवितास कोणतेही नुकसान न होता सुरक्षित त्याला एखाद्या कुटुंबात ज्यांना बाळाची आस आहे तिथं त्या बाळच स्वागत होऊ शकतं. बाळाचा जगण्याचा अधिकार सुरक्षित राहू शकतो.

या मातेच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांचं जाळं होतं त्यात काही धागे भविष्याची चिंता यात गुंतले होते, काही धागे आपलं मातृत्व हरण्याची सल व्यक्त करणारे होते तर काही धागे तिचा हा भूतकाळ तिचा शोध घेत तिच्या भविष्यात डोकावला तर काय होईल अश्या काळजीत अडकले होते. मग तिच्या सोबत आलेल्या तिच्या मावशीने आमच्या जवळ आपली शंका व्यक्त केली की, बाळ मोठं झाल्यावर कधी त्याने आपल्या आई वडील याच्या बाबत माहिती विचारली तर ती देऊ नका. समर्पणपत्रात पण असं लिहिलं असतचं. आम्ही त्या मावशींना तशी शाश्वती पण दिली. कारण आपलं बाळ दत्तक देण्यास तयार असलेल्या जैविक मातेला तिची ओळख गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे, तसेच दत्तक साठी मुक्त करण्यात आलेल्या बाळाला देखील त्याचं मुळ शोधण्याचा अधिकार दिलेला आहे.

आपण इथे चर्चा करतोय ती केवळ बालकांच्या संपूर्ण हितासाठी. बालक हे एखाद्या कुटुंबात दत्तक म्हणून गेल्या नंतर ते कुटुंब पूर्ण होतं. बाळाला आई वडील मिळतात आणि बाळ कुटुंबात आल्या मुळे ते बाळासाठी आसुसलेले पती पत्नी आई वडील होतात. दत्तक या प्रक्रियेला सामाजिक, कौटुंबिक, भावनिक दृष्टया बघताना आई वडील आणि बाळ यांना पूर्णत्व प्राप्त होतं एक नवीन कुटुंब निर्माण होतं आणि एखाद्या कुमारी माता किंव्हा मात्तृत्व नको असताना ते पदरी पडलं असेल अश्या मातेला, बाळासाठी सुरक्षित निर्णय घेता येतो आणि भविष्यात आपलं नवीन आयुष्य सुरु करण्याची संधी पण तिला मिळते. ती या विश्वासाने बाल कल्याण समिती समोर प्रस्तुत होते की तिची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे आणि तिच्या बाळाला दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त करून एक छान कुटुंब त्याला मिळणार आहे. त्यामुळे जैविक मातेचा माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकारास प्राधान्य दीलेल आहेच म्हणून तो जपला जाणं कायदेशीर रित्या जेवढं बंधनिय आहे, तेवढंच ते बाळासाठी देखील त्याच्या हिताचाच आहे असं म्हणता येऊ शकेल.

बाळ एका नवीन कुटुंबात जातं त्याचे हक्क त्या कुटुंबाकडून जोपासले जातात. त्याची एक ओळख समाजात निर्माण होते. बालकाचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन होतं. अश्या स्थितीत बालकाचा त्याचं मूळ शोधण्याचा अधिकार त्याने वापरावा की नाही हा अभ्यासाचा विषय निश्चितच आहे. ते बाळ जेंव्हा एक वेगळी ओळख घेऊन मोठं झालं असतं त्याचं वेळी त्याची जी जैविक आई असते ती देखील आपल्या आयुष्यात पुढे गेलेली असते. मागची घटना विसरून तिने तिचं वेगळं जग निर्माण केलं असतं आणि तिच्या बाबत ची गोपनीयता कायम राखण्यात येईल या विश्वासाने ती वावरत असते. तिचे आणि त्या बाळाचे वेगवेगळ्या प्रकारे पुनर्वसन झालेलं असतं. हा सगळा विषय केवळ बाल हितासाठीच आहे.

समिती पुढे एकदा, एक बालिका आपल्या Adoptive parents सोबत आलेली. बालिका कौमार्य अस्वस्थेत असल्या कारणाने रागाने घरून निघून गेली होती. नंतर ती लगेच मिळाली. त्यावेळी समिती समोर तिचे आई वडील अगतिक होऊन रडत होते त्यांना ही भीती वाटायला लागली होती की ही बालिका आता आपले जैविक आई वडील शोधणार का. पण ती बालिका म्हणाली की, ज्यांनी मला सोडून दिलं त्यांना मी का शोधू ? ज्यांनी मला स्वीकारलं तेच माझे आई वडील आहेत. रागाने घरून निघुन आलेल्या बालिकेचे बोलणं ऐकून ते आई वडील सुखावले आणि तिघे ही आनंदाने घरी गेले. पुढे बालिकेचे समुपदेशन करण्यात आले. पण प्रत्येक बालक वेगळं असतं ते ज्या कुटुंबात जातं त्यांच्यात त्याची जी जडण घडण होते तसं ते घडत जातं. कोणाविषयी देखील द्वेष, राग ही भावना घेऊन मोठं होणं हे बालकासाठी ठीक नाहीय हे आपण सगळे जाणतोच. मग बालकास सकारात्मक विचार करण्यास वळण लावणं इथे आवश्यक ठरतं.

ज्या जैविक आई वडिलांनी काही अडचणी मुळे बालकास आपल्या जवळ ठेवलं नाही त्या बाबत कोणालाही माहिती नाही आणि त्यांची जी काही अडचण असणार ते जाणून घेणं आज गरजेचं नाहीय. आता ज्या कुटुंबात आपण आहोत तिथं आनंदाने आपल्याला राहायचं आहे हे बालकास त्याच्या बाल बुध्दीला कळेल वळेल असं सांगत जाणं आवश्यक असतं.
हा एकूण विषय आज एका लेखात संपणारा नाहीय. पण बालकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार प्राप्त होणं आवश्यक आहे तो त्याचा हक्क आहे. आज माझ्या पुढे बसलेली ती कुमारी माता समर्पणपत्र झाल्या नंतर निश्चित झाली असणार. काळजी सरक्षणाचं बाळ म्हणून ते समिती पुढे आणलं गेलं. ते एखाद्या कचरा कुंडीत फेकल्या गेलं नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे. या बाबत जागरूकता निर्माण होणं खूप आवश्यक आहे. आणखी चर्चा होणं पण गरजेचं आहेच. कायद्याची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे.

आणखी पुढे पण आपण याबाबत बोलू या. आणखी काही अनुभव मी तुमच्या समोर मांडणार व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक अडचणी यावर देखील चर्चा करू. पण एखाद बाळ सुरक्षित समिती पुढे प्रस्तुत होईल यासाठी जागरूक राहू या.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments