Saturday, September 21, 2024
Homeसाहित्यपालकत्व : एक कला - १५

पालकत्व : एक कला – १५

प्रभावी बाल साहित्य आणि बालक

आज Crossword मध्ये सहज चक्कर मारली. मी एक पुस्तक शोधत होते बऱ्याच दिवसापासून तिथेच एक साधारण आठ ते नऊ वर्षाची, उत्तर बाल्यावस्थेतील बालिका आपल्या पायाच्या अंगठ्याच्या अगदी टोकावर उभी राहून पुस्तकांच्या वरच्या कप्प्यावरून एक पुस्तक काढण्याचा प्रयत्न करत होती. मी बाजूलाच होते म्हणून लगेच तिला ते पुस्तक काढून दिलं, पण माझ्या हातातून ते पुस्तक खाली पडलं आणि मी त्या पुस्तकाचं शीर्षक वाचलं. त्या बालीकेने ते पुस्तक पटकन उचलून घेतलं माझ्या कडे बघून स्मित हास्य केलं. त्यावेळी तिच्या hairband वरचा तो baby pink रंगाचा टेडी पण गोड हस्ल्याचा भास मला झाला. डोक्यावरचा pink tedy वाला hairband नीट करत ती बालिका ……. शीर्षक असलेलं पुस्तक (शीर्षक लिहिणं टाळलं आहे) घेऊन बिलिंग काऊंटर कडे पळत गेली. तिकडे कदाचित तिचे बाबा थांबले होते. आठ नऊ वर्षांचं हे कोवळ वय आणि hairband वरचा निरागस pink tedy, बालिकेचे स्मित हास्य याचा मेळ त्या पुस्तकांशी जमणार होता का ? आणि तशी गरज तरी होती का ? असा प्रश्न मनात आला.

उत्तर बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये काही अशी असतात. तार्किक तर्क वाढणे. विज्ञान कल्पनेत जास्त रस वाढणे. स्पष्टीकरणात साधर्म्यांचा वापर करणे. समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास करणे. आकलन शक्ती आणि निरीक्षण शक्ती उत्कट होते. स्मृती आणि कल्पनाशक्तीची स्वतःची शक्ती वापरण्याची क्षमता. या वैशिष्ट्यांचा अभ्यास करता या वयातील बालकांना तश्या सकारात्मक संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतेय. आकलन शक्ती उत्तम होत जाण्याच्या वयात आपण आयुष्य जगण्याची काही विशिष्ट तत्व असावी आणि ती कोणती असावी या बाबत बालकांचे मार्गदर्शन त्यांच्या आवडीच्या पद्धतीने करू शकतो.

मग माझी पण उत्सुकता वाढली ते पुस्तक चाळून बघण्याची. मी पण त्या वरच्या काप्प्यातून ते पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचे रक्ताचे डाग अगदी खरे वाटावे म्हणून की काय म्हणून भडक लाल रंग वापरला होता आणि त्यावर काळ्या रंगाच्या उभ्या पसरट मानवी कदाचित अश्या आकृत्या होत्या. पुस्तक उघडून थोडी प्रस्तावना वाचली तर लक्षात आलं एक मानसिक रोगी अश्या माणसाची ती कहाणी होती. ज्याने सात महिलांची अत्यंत क्रूरतेने कत्तल केली होती. हे पुस्तक या लहानशा बालिकेला का वाचावसं वाटलं असणार ?

डॉ विजयाताई वाड यांनी लिहिलेली प्रायश्चित नावाची एक बालकथा आठवली. या कथे मध्ये गुरुनाथ नावाच्या एका बालकाची कथा आहे त्यात किती सहजतेने चोरी करणं, आपला अधिकार नसताना इतरांची वस्तू घेऊन आपली गरज पूर्ण करणं किती चुकीचे आहे आणि मग मोठ्यांनी समजूत काढली की ते समजून केवळ चूक मान्य न करता त्यांचं प्रायश्चित करून पुढे सकारात्मक मार्ग निवडणं. ही कथा ज्या बाल सुलभ भाषेत लिहिली आहे आणि ज्या सहजतेने जीवन शिक्षण देण्याचा उद्देश पूर्ण केला आहे ते बालकांनी वाचणं खूप आवश्यक आहे. खरं हे पुस्तक या बालिकेच्या हातात असायला हवं होतं असं कळकळीने वाटून गेलं. पण एका खालच्या कप्यातील तिच्या वयासाठी उपलब्ध पुस्तकं तिने बघितली देखील नाही. वया आधी उगाचच आलेलं हे मोठेपण कोणाची देणगी आहे ? पालकांच्या अवास्तव अपेक्षा देखील याचं कारण असू शकते. कारण बिलिंग काऊंटर वर उभे असलेले तिचे बाबा अतिशय अभिमानाने सांगत होते की माझी मुलगी खूप mature आहे. हे अकाली आलेलं प्रौढत्व बालपण होरपळून काढणारं असतं याचा विचार पालकांनी करायलाच हवा.

बालकासाठी असलेलं साहित्य आणि बालकांनी निर्माण केलेलं बाल साहित्य याची अशी कितीशी जमा पुंजी आता उपलब्ध आहे ? असा प्रश्न मनात आला की, मोजक्या दर्जेदार साहित्यिकांची नावे आपल्या समोर येतं. त्यात प्रामुख्याने डॉ विजयाताई वाड यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. खूप मोठा बाल साहित्याचा ठेवा त्यांनी बालकांच्या सुपूर्द केला आहे. आज बालके किती प्रमाणात वाचन करतात हा प्रश्न तर महत्त्वाचा आहेच पण काय दर्जाचे साहित्य वाचतात हा गंभीर विषय आहे. बालकांनी त्यांच्या साठी असलेलं साहित्य वाचावं यासाठी शिक्षक, पालक यांचा आग्रह असतो पण बालकांना ते वाचण्यात कितीशी रुची असते हा अभ्यासाचा विषय आहे. आज आपल्याला फक्त बालकांसाठी लिहिण्यात आलेली गाणी, गोष्टीची पुस्तके खूप अशी बघायला मिळत नाही. बालकांना वाचनाची त्यांच्यासाठी असलेल्या साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणं अत्यावश्यक आहे. वाचन केल्याने बालकांचा दृष्टिकोन व्यापक होईल आणि लक्ष विचलित होणं कमी होऊन त्यांच्या बाल मनाला पोषक आहार मिळेल. त्या त्या वयाला त्या त्या वयाचं कुतूहल असतं ते शमवण्याचा प्रयत्न बालक आप आपल्या परीने करत असतात त्यात त्यांची मदत करण्यास आम्ही सगळ्यांनी सोबत असायला हवं.

बालकांना आपली तत्व, आपले विचार याची बैठक बसवण्याच्या प्रक्रियेत काय योग्य अयोग्य विशिष्ट परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रगल्भता ही एकाएकी येत नाहीं. त्या विशेष टप्प्यांची माहिती देण्याची जबाबदारी आपली आहे. उत्तर बाल्यावस्थेत आकलन शक्ती कमालीची वाढत असते. बालक त्यांनी कळलेली एखादी गोष्ट समजावून सांगण्यात खूप उत्सुक असतात. आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेऊन, विश्लेषण करून त्यावर स्वतःच्या विचारांद्वारा इतरांना व स्वतःलाच सोप्या भाषेत समजावून देता येणे. याचा उपयोग करून अनेक छान विचारांनी प्रेरित करणारी पुस्तके बालकांना वाचायला देऊन त्या बाबत बालकाशी चर्चा करणं आणि त्यांची वाचना बाबत आवड वाढवत जाणं आवश्यक आहे.

मग माहिती केवळ उपदेशाने दिली गेली तर बालक त्यांचा अवलंब करणार नाही उलट ते वैतागतील म्हणून विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करावा लागणार त्यामध्ये बाल साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे.
काही दिवसापूर्वी मुंबईत पहिले राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. संमेलनात बालकांच्या प्रश्नावर लिखाण करण्यासाठी आणि बालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी मला सन्मानित करण्यात आलं. संमेलनासाठी उपस्थित असलेल्या काही बालकांनी स्वतः लिहिलेली गोष्टी आणि कवितांची पुस्तके प्रकाशित झाली. बालकांनी स्वरचित कविता सादर केल्या. एका बालिकेने ‘उंच आकाशी उडावे’ अश्या शीर्षकाची कविता प्रस्तुत केली. तिच्या बाल भावना या कवितेतून व्यक्त झाल्या. तिची स्वप्न ती सुरेख शब्दात मांडू शकली. अशी संधी बालकांना उपलब्ध करून द्यायला हवी.
नित्य नियमाने अभ्यासा व्यतिरिक्त दर्जेदार आणि बालकासाठी उपलब्ध साहित्याचे वाचन करण्याची सवय बालकांमध्ये निर्माण होण्यास आपण प्रयत्न करू या. केवळ वाचन नव्हे तर बालकांना लिखाण करण्यास प्रोत्साहित करू या.व्यक्त होण्याचं हे एक प्रभावी माध्यम निश्चितच आहे. आपल्या सकारात्मक प्रयत्नांनी बालकांना योग्य दिशा मिळू शकेल यात शंका नाहीच.

“मोठी मोठी स्वप्नं तुझी
लेखणी आहे छोटीशी
गट्टी केली की तूझ्या स्वप्नांशी
निळ्या गुलाबी पानांनी”

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” भाग : सात
सौ.रोहिणी अमोल पराडकर on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली