“नवस…….बाल हक्काचा”
वसुंधराच्या हातात तिचा मेडिकल रिपोर्ट होता. ती त्या पिंपळा समोर थांबली होती. आसमंता एवढा उंच पिंपळ किती किती स्वप्न, किती किती इच्छापूर्ती करणाऱ्या लाल कापडात बांधलेल्या नारळाच्या ओझ्याने जमिनीवर झुकला होता. पुजारी महत्व सांगत होते त्या नवस पूर्ण करणाऱ्या पिंपळाच्या कहाण्याचं. फांद्यांचा हिरवा रस सुकला होता आणि इच्छा, स्वप्नांच् नारळ बांधलेल्या त्या घट्ट लाल कापडाचे वळ उमटले होते त्या नाजूक फांद्यावर. नवस पूर्तीचे प्रतीक ठरलेला तो पिंपळ कसा पेलत असेल ओल्या भावनांचं ओझं हिरवं रक्त गोठलेल्या आपल्या कोरड्या फांद्यांवर कोण जाणे ? कसं कोणाचं तरी, कुठलं तरी स्वप्न पूर्ण झालं आणि त्याने आपलं इच्छापूर्तीचे नारळ सोडलं मग त्या लाल कापडाच्या गाठीखाली गुदमरलेली एक गुलाबी हिरवी पालवी श्वास घेत आसमंताकडे बघू लागली उंच उंच…..
नवस बोलणं म्हणजे नक्की काय ? आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून त्याची जवाबदारी कोणत्या तरी देवावर सोपवून देणं आणि आतुन खचलेल्या मनाला, आत्मविश्वासाला बाहेरून निर्जीव बळ देण्याचा प्रयत्न करणं.
असं इच्छापूर्तीचं ओलं टवटवीत नारळ कधी कधी वर्षानुवर्षे लाल कापडात सुकून, कुजून नष्ट होतं. त्यातलं गोड पाणी कोणाचीही तहान भागवण्यास कामी येत नाही. एखाद्याची इच्छापूर्ती होण्याची प्रतीक्षा करणं हा त्याच्यासाठी शाप होऊन जातो.खरंच इतकं पोकळ, सुकलेलं, कुजलेलं नारळ इच्छापूर्तीचं ओझं वाहू शकतं का ? ते कुजतं कश्यामुळे….वर्षानुवर्ष कापडात बंधिस्त राहिल्या मुळे ? की, एखाद्याच्या अवास्तव इच्छा, स्वप्न याचा भार न सोसल्या मुळे ? आपलं हळवं मन दुःखात कोणालातरी साद घालत असतं आणि ती हाक कोणी ऐकली नाही की, आतून मन एकटं होत जातं मग आत्मविश्वास ढासळत जातो आणि या कासावीस झालेल्या मनाला गोंजरून घेणारा एक काल्पनिक आधार म्हणजे “नवस” असं असावं कदाचित. आतून आतून माहिती असलेला नकार स्वीकारता आला नाही की, त्या कधीही न येणाऱ्या होकराचं अवास्तव स्वप्न कुठल्यातरी नारळाशी बांधलं जातं. ही मनाची एकटेपणाला काल्पनिक आधार देण्याची अवस्था आहे किंवा निराशा, दारात थांबवून ठेऊन आशेची प्रतीक्षा करण्याची अवस्था आहे. पण याचा अतिरेक झाला की खचलेलं मन अधिकच भरकटून जातं.
हे बाहेरील नवसाचं उत्तर आतल्या वादळाला कितपत उत्तर देऊ शकेल सांगता येत नाही. खूप सुशिक्षित, समंजस लोकांना देखील मी कसला तरी नवस बोलताना बघितलं आहे.शेवटी मानवी मनाचा ओलेपणा आणि हळवेपणा सारखाच ना. त्याला कोरड जाणवली की ते असे लेप शोधणारच.
आतली पोकळी भरून काढावी ती आत्मविश्वासाने. नवी उमेद मनाच्या गाभाऱ्यात उगम पावत असते. बाहेरून फार बळ मिळत नाही. जे काही घडतं ते स्वीकारून घ्यावं. आत्मविश्वासाचा पिंपळ उंच वाढत जाऊ द्यावा.फक्त आपल्या सक्षम हाताची ताकत आणि स्वतःवरच्या विश्र्वासाचा ओलावा कायम असू द्यावा.
वसुंधरा नारळ घेणार, तेवढ्यात तिचं लक्ष परत त्या गोड मुलीकडे गेलं आणि नकळत तिची पावलं तिकडे वळली. गोजिरवाणी लेकरं अंगणात फुलपखासरखी बागडत होती. नाजूक नाजूक पंखानी वाऱ्याशी खेळत होती. वसुंधरा लांबून हे गोकुळ न्याहाळत होती. ’आम्ही कमी नाही विशेष आहोत’ वर असा फलक लागला होता. त्यांच्यातली एक चिमुकली तिला रोज हाताने खुणावत असे. या गोड चिमणीला कोणी, कसं आणि का इथे सोडलं असावं ? फक्त ती special child आहे म्हणून ? ती तिच्या जवळ गेली तेंव्हा त्या गोड मुलीनी तीचा पदर धरला आणि उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली… तेव्हांच तिच्या हातातला कधींही आई न होऊ शकण्याची पावती देणारा मेडिकल रिपोर्ट दूर दूर उडून गेला. वसुंधराने तिच्या वांझपणाचं कोरडं नारळ ओल्या पिंपळावर बांधलं नाही. तिने इच्छापूर्ती करणारं नारळ फोडून त्यातलं गोड पाणी त्या चिमुकलीला प्यायला दिलं आणि त्या नवसाच्या नारळ पाण्याने तिची कोरडी कुस मायेच्या ओलाव्याने अशी भरून घेतली. तिच्या वांज विश्वात ती बाहुली गुलाबी फुल होऊन आली होती आणि तिने मनाच्या अस्वस्थ अवस्थेला स्थिर करणारा पर्याय शोधला होता.
त्या मतीमंद (special child) मुलीची आई व्हायचं हे त्याच क्षणी वसुंधरा ने ठरवलं होतं. वास्तव स्वीकारून त्यावर असं देखणं उत्तर तिने शोधलं होतं. या special child असलेल्या बालिकेला तिचा हक्क मिळाला होता. तिच्या हक्काचं घर तिला मिळालं होतं. सुरक्षितता तिला मिळाली होती.अशी आई, असे पालक प्रत्येक त्या बालकाला मिळावी ज्यांना काळजी आणि सुरक्षेची गरज आहे. बालकांचे हक्क अबाधित रहावे यासाठी आपण सगळ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्षा, बाल कल्याण समिती, पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800