बालकांना जबाबदारीची जाणीव व्हावी
“कोणीतरी हवंय समजून घेणारं, जज न करता चुकांना फक्त चुका मानून माफ करणारं, curiocity ला धीराचं वळण देऊन गंभीर चुका टाळू शकतो हे सांगणारं. असं कोणी तरी असतं का पण ?” असा प्रश्न आज सारखा मनाच्या दाराशी येऊन डोकावत होता. माझ्या मैत्रिणीच्या पायाचे हाड मोडल्यामुळे आज तिच्या पायाचं ऑपरेशन होतं. काही दिवसापूर्वी ती आपल्या मुलीला शाळेत सोडून रस्त्याच्या डाव्या बाजूने अगदी कडेकडेने फुटपाथ वरून जाताना एक दुचाकी मागून येऊन तिला धडकून गेली. धक्का मोठा होता म्हणून ती तिथेच कोसळली. डोक्याला आणि पायाला जबर मार बसला. तसंच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं.
त्या गोष्टीला आता पंधरा दिवस होऊन गेले. आम्ही मैत्रिणी तिला भेटायला गेलो. तिची अवस्था बघून अस्वस्थ झालं. ती एकटीच राहत असे दोन मुलांना घेऊन. असं कोणी पटकन येण्यासारखं नव्हतं तिच्या घरी. आई वडील पण वारले तिचे. बाकी खूप वैयक्तिक माहिती मी कधी घेतली नाही तिची. पण आम्ही मैत्रिणी च असतो तिला काही गरज पडल्यास.
पोलिस तक्रार केली काय, कोणी धडक दिली त्याला चांगली शिक्षा व्हायला हवी असं सगळ्या मैत्रिणी बोलत होत्या. पण ती शांत होती अगदी. नंतर म्हणाली, “कसली शिक्षा करणार त्याला ? आई वडिलांना कळायला नको कधी कोणते लाड करायचे ते ?” आम्हा सगळ्याची उत्सुकता वाढली. ती नेमकं कोणा बाबत आणि काय बोलत होती ते जाणून घेण्यासाठी. ती पुढे म्हणाली, “अग आपल्याच मुलांच्या शाळेचा बारावीचा मुलगा आहे सतरा वर्षाचा. मी बऱ्याचदा बघितलं आहे त्याला दुचाकी पळविताना आणि राहतो पण शाळेसमोरच्या सोसायटीतच. अठराच्या आतला आहे ना ग आणि त्याचे आई वडील आलेले मला विनंती करायला. हॉस्पिटलचा सगळा खर्च आम्ही करू पण पोलिसांकडे जाऊ नका. बारावीला आहे. त्याचं भविष्य खराब होईल. अशी विनंती केली मग काय करणार ?”. आणखी एक मैत्रीण म्हणाली, “हल्ली अगदी चौदा वर्षांची काय पंधरा वर्षांची काय मुलं सुसाट दुचाकी घेऊन फिरतात. आमच्या सोसायटीतील मुलं देखील”. मग चर्चा आणखी पुढे गेली आणि काही गंभीर घटनांचा उल्लेख देखील झाला. एका मैत्रिणीने विचारलं, “अग पण त्या मुलाने तुझी माफी मागितली का ? की आई वडिलांचं तेवढं वाईट वाटलं”. आपल्या पायाकडे बघत ती म्हणाली, “कसली ग माफी मागतोय तो. मी पडले तेंव्हा देखील आणखी स्पीड वाढवत पळून गेला तिथून आणि शेजारच्या वहिनी सांगत होत्या, अजूनही घेऊन फीरतोच आहे गाडी. काही फरक पडला नाही त्या मुलाला”.
अश्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला सातत्याने घडत आहेत. चिंतन, मनन करून पालक दमलेय. पण कौमार्य अवस्थेतील बालकांना आवर घालण्यात कमीच पडत आहेत. बालकांची प्रत्येक बाबतीतील curiosity इतक्या टोकाला पोहोचली आहे की त्यापुढे परिणामाचा विचार करण्याची सदविवेक बुध्दी कामाचं करत नाहीय. एकमेकांना challenge देणं आणि ते challenge जिंकण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याचं धाडस करणं ही बाब अनेक गंभीर घटना कडे बालकांना वळवत आहे. याचं चिंतन होणं आणि प्रभावी उपाययोजना शोधणं आवश्यक झालं आहे.
काही मुद्दे परत परत विचारात घेणं महत्त्वाचं आहे. बालकं अशी का वागतात ? हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो आहे. पालक बालक यांच्यातील दरी ही काही नवीन नाहीय. पालक बालक यांच्यात वैचारिक द्वंद सुरूच आहे आणि काळानुसार सगळ्या संकल्पना बदलत जाणारच आहेत. पालकांना ज्या गोष्टी खूप गंभीर वाटतात त्या बालकांना तितकसं गंभीर वाटतं नाही. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा या सगळ्यांचा फारसा प्रभाव आता बालकावर दिसून येत नाहीय आणि बालक आपल्या पालकांच्या विचारांशी त्यांनी जपलेल्या नियमांशी तितकेसे जोडलेले पण नाहीय. ज्यांच्या घरी कधी कोणी डान्स बार मध्ये गेल्याचा इतिहास च नाहीय किंवा त्याचं नाव देखील घरी काढलं जात नाही अश्या घरची एक बालिका आपल्या मित्रा सोबत घरी काहीही न सांगता जात असे. तिच्या सोबत तिथे वाईट प्रकार घडला आणि नंतर ती स्वतः च तिकडे कुतूहल म्हणून गेली होती. तिला कोणीही जबरदस्ती तिथे घेऊन गेलं नव्हतं ही माहिती समोर आली. पण तिथे तिच्या सोबत जे घडलं ते तिच्या मर्जीने नव्हते. त्यात तिची इच्छा सामील नव्हती हे बालिकेने सांगितलं. अर्थात तिथे जाणं हे काही वाईट वगैरे नाहीय असे विचार बालिकेने तिच्या मित्र मैत्रिणी कडून ग्रहण केले होते आणि ते तिला बरोबर वाटले होते म्हणून ती तिथे गेली. इथपर्यंत तिला तिचं काही चुकलं असं नाही वाटलं आणि पुढे जे काही झालं ते तिच्या सोबत चुकीचं झालं असं तिचं सांगणं होतं. जे घडलं तो गुन्हा होताच पण हा टाळता आला असत हे पालकांचे विचार होते. यात नेमकं द्वंद काय तर चूक बरोबर या संकल्पना मध्ये होत जाणारा बदल आणि या बदलामुळे पालक बालक यांच्यात निर्माण होत जाणारी दरी. ही दरी डोहात रूपांतरित होत जाते आणि पालक बालकांच्या विश्वातून खुप लांब होत जातात. बालक आपल्या भोवती एक कोश निर्माण करतात आणि त्यात पालकांना प्रवेश नसतो.
एक बाळ जन्माला येतं त्या क्षणा पासून पालकांकडे अनेक गोड स्मृती असतात बालकांच्या. कालांतराने या स्मृती फक्त पालकांच्या होऊन जातात. बालक त्याच्या वाढत्या वयानुसार ते विसरत जातं. जन्म झाल्या पासून तर सहा ते सात वर्ष पर्यंत बालकांना विशेष काही आठवत नसतं हे शास्त्र सांगतं. त्या काळातील स्मृती फक्त पालकांच्या असतात. पुढे कालांतराने बालकांसाठी त्या त्यांच्या पालकांनी सांगितलेल्या सत्यकथा असतात. स्मृती म्हणून त्यांच्याशी ते जोडलेले नसतात. एखाद्या कुटुंबात खूप बिंबवून काही गोष्टी सांगितल्या जातात पण नेमकी तीच रेष बालक ओलांडतात का तर curiosity म्हणून.
आता यावर उपाय काय करायला हवे हा प्रश्न शिल्लक उरतोच. पालकांचे बालकाशी कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी काही गोष्टी तो लपवणाराच हे निश्चित आहे. म्हणून आपण पाळलेले आदर्श त्यांनी पाळावेच याचा अती आग्रह न धरता ते पाळले नाही तर कुठले संभाव्य धोके होऊ शकतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं आणि स्वतः ला सुरक्षित कसं ठेवावं याची खुली चर्चा व्हायला हवी. चर्चे दरम्यान पालकांनी बालकांना बोलण्याची व्यक्त होण्याची संधी द्यावी. आधीच एखाद्या बाबतीत नकारात्मक, अस्विकरात्मक विचार पालकांकडून व्यक्त होत असतील तर बालक त्यावर काहीही बोलणार नाही म्हणून खुली चर्चा होणं ती घडवून आणण आवश्यक आहे. आपल्या बालकाकडून इतरांना गंभीर ईजा होऊ नये आणि त्याला पण काही नुकसान होऊ नये याची माहिती न चिडता, रागावता चर्चेतून बालका पर्यंत पालक पोहोचवू शकले तर खूप धोके टाळता येतील. इतरांच्या भावनांची जाणं असणं, दुसऱ्याचा त्रास कळण. हा माणूस असण्याचा पुरावा आहे. ही गोष्ट बालका मध्ये रुजविण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. यासाठी बालकांचे समाजीकरण योग्य मार्गाने व्हायला हवं आहे. प्रत्येक पिढीतील व्यक्तीशी बालकांनी बोलायला हवंय आज आपण बघतो बालक केवळ त्यांच्या वयातील बालकांशी जास्त संवाद साधतात किंव्हा फार तर थोड्या मोठ्या बालकांशी बोलतात. ते ही प्रत्यक्ष कमीच. अनुभवांची कक्षा मोठी असलेली व्यक्ती बालकांच्या संपर्कात असली तरी त्यांच्याशी बोलणं त्यांना फारसं आवडत नाही. कारण ते अनुभव केवळ लेक्चर म्हणून आपल्या पर्यंत येत आहेत याची जाणीव बालकास होते आणि त्याला ते नकोसं वाटतं. म्हणून हे अनुभव खुली चर्चा मोकळं बोलणं फक्त शेअरिंग या अंगाने असेल तर ते बालकाकडून स्वीकारलं जातं कदाचित जो धडा घ्यायचा तो त्यांचे ते घेतात पण जर आपण आग्रह कमी केला तर.
हा विषय पुढच्या लेखात परत घेऊ. काही गंभीर घटनांचा उल्लेख करून त्यावर तज्ञाच मत बालकांचं मत अशी चर्चा करू या.
— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800