बालकाची ओळख, बालकाचा हक्क
आज आमच्या बेंचसमोर काही रस्त्याकाठी राहणाऱ्या कुटुंबातील बालक आणि त्यांचे पालक एका संस्थेकडून प्रस्तुत झाले. बालकं शाळेत जाण्याच्या दोन, तीन, चार अश्या वयोगटातील दिसून येत होती. एक संस्था जी रस्त्यावरच्या बालकांसाठी काम करते त्यांचे शिक्षण आणि आरोग्य याची काळजी घेते, त्या संस्थेचे कर्मचारी त्यांना समिती पुढे घेऊन आले होते. बालकांनी आपली नावं सांगितली. एक बालक बेंचवरचा पेन घेऊन कागदावर आडव्या उभ्या रेषा आखत होता.
संस्थेकडून माहिती मिळाली की, या बालकाचा जन्म दाखला नसल्या कारणाने त्याची कोणतीच कागदपत्रे तयार होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे पुढे शाळेत प्रवेश घेण्यात अडचण निर्माण होणार हे निश्चित होतं. या बालकाच्या पालकांशी बोलल्या नंतर कळलं की बालकाचा जन्म घरीच झाला असून त्याची कोणतीही नोंद कुठेही करण्यात आलेली नाही आणि सतत स्थलांतर केल्यामुळे आणि रस्त्याला राहत असल्या कारणाने पालक या बाबत जागरूक नाहीत. अश्या जवळपास दोनशे बालकांच्या नावाची यादी या संस्थेने सर्वे करून तयार केली होती. या सगळ्या बालकांना त्यांची ओळख मिळणं आवश्यक आहे जेणे करून पुढे त्यांचे पुनर्वसन होऊ शकेल. भवितव्य घडू शकेल !. संस्थेने समिती पुढे अर्ज आणि सर्वे अहवाल सादर केला होता. या सगळ्या दोनशे बालकांना त्यांची ओळख प्राप्त होणं त्यांचा अधिकार आहे.
भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मुलांच्या गरजांची पूर्ती होणे, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. राज्य आणि केंद्र सरकार, तसेच मुलांच्या जन्मदात्या पालकांनी या मूलभूत हक्क व गरजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे, तसे कायदे राज्यघटनेतील तरतुदीनुसार करण्यात आले आहेत. मानवी हक्कांच्या सनदेनुसार जसे मोठ्या व्यक्तींना हक्क असतात, तसेच लहान मुलांचे देखील हक्क आहेत. सर्वसाधारणपणे यांना बालहक्क किंवा बाल अधिकार असे संबोधले जाते. साधारणतः ० ते १८ वर्षांखालील व्यक्तीला ‘बालक’ असे म्हटले जाते. मुलांचे स्वतःचे एक अस्तित्व असते, स्वभाव असतो, त्यांच्यामध्ये क्षमता असतात आणि त्यांना प्रौढांनी आदराने स्वीकारणे व वागविणे अपेक्षित आहे. सरकारने मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने धोरण, कायदे करून अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ज्यांच्याकडून मुलांचे अपहरण, शोषण करणे किंवा मुलांना ईजा पोहोचेल असे भावनिक, मानसिक किंवा शारीरिक हानी होईल असे वर्तन घडेल, त्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतुद देखील करण्यात आली आहे.
बालकांचे हक्क समजून घेताना त्यांना सुरक्षित जीवन जगण्याचा आहे. बालकास स्वतःची ओळख प्राप्त होणं देखील बालकांचा हक्क आहे. बालकास ओळख प्राप्त झाली तरच त्यांना शिक्षण मिळू शकणार त्यांचं पुनर्वसन होऊ शकणार. याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या बालकांना काशी मदत होऊ शकेल या दृष्टीने मी माननीय अतुल देसाई सरांशी चर्चा केली. त्यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलं. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील दिशा ठरवण्यासाठी मला खूप मदत झाली. नियम कायदे कलम याचा अभ्यास करून बालकांना त्यांची ओळख मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले. संस्थेला वेळोवेळी तसे आदेश दिले आणि आज ते काम सुरळीत सुरू झालं आहे. टप्प्या टप्प्यात प्रत्येक पायरीचा अवलंब करून समितीने संस्थेला सूचना आणि आदेश देऊन या कार्याची सुरुवात केली. रस्त्यावर फिरणाऱ्या बालकांना त्यांची ओळख प्राप्त होऊन त्यांच्या वयाचा दाखला मिळण्याची सुरुवात झाली. संस्था, शासकीय रुग्णालय यांचे सहकार्य प्रयत्न फळाला आले. पहिल्या चार बालकांचे वय निश्चित करून समितीने पुढील प्रक्रियेसाठी संस्थेला आदेश दिले आणि आज त्या दोनशे बालकांना त्यांनी ओळख मिळण्याचा मार्ग निश्चित झाला. श्री अतुल देसाई सर यांचं मार्गदर्शन आम्हाला एक नवी दिशा देऊन गेलं. बाल कल्याण समिती चे अधिकार बालकांसाठी किती उपयोगी सिद्ध होऊ शकतात याची जाणीव झाली. आज पर्यंत पुणे बाल कल्याण समिती एक पुढे दहा हजारावर बालकं प्रस्तुत झालीत. इतका मोठा कामाचा व्याप सांभाळताना अनेक गोष्टी शिकता आल्या. अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. बालकांचं हित हेच अंतिम ध्येय म्हणून काम करत आहोत. पण या कामाचं समाधान खूप मोठं आहे. बालकांना ओळख मिळून ती पुढे शाळेत जातील त्यांचं पुनर्वसन होईल. देशाच्या भावी पिढीचा एक हिस्सा योग्य दिशेने मार्गस्थ होईल. असं आणखी चांगल कार्य आमच्या कडून घडत राहणार आणि या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची मदत मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होत राहणार हीच सदिच्छा.
हा विषय इथे संपला नाहीय. यावर आणखी सखोल माहिती तसेच पुढील अनुभव, अडचणी यावर आपण चर्चा करू या आणि बालकांचे हक्क अबाधित राहतील यासाठी प्रयत्न करत राहू या.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर. अध्यक्ष
बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800