Home लेख पालकहो, तुमच्यासाठी !

पालकहो, तुमच्यासाठी !

0

ज्याने आपले आयुष्य शिकण्यात,शिकविण्यात घालविले असा एक प्राध्यापक या नात्याने मला आजच्या पालकांशी बोलायचे आहे.मनमोकळा संवाद साधायचा आहे.मला माहिती आहे,तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे.त्यांना अवतीभवतीच्या परिस्थितीशी सामना करायचा आहे.अशी परिस्थिती जी सातत्याने ढासळते आहे. सारखी नैतिक घसरण चालू आहे.शिवाय स्पर्धा वाढली आहे.प्रत्येक जण धावतो आहे शर्यत जिंकण्यासाठी.आपण घसरून पडू,मागे राहू ही भीती आहे.हे सगळे मला मान्य आहे.पण याचा उपाय आपणही नैतिकता विसरणे, आपणही या प्रवाहात वाहवत जाणे हा तर होत नाही.आपण आपला विवेक गहाण ठेवून वागणे हे तर शहाणपणाचे ठरत नाही.

तुम्ही आधीच मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश देता. तिथे लाखो रूपयांची फी भरता.गरज पडल्यास लाखो, कोटी रुपये डोनेशन म्हणुन देता. मग ही सर्व झाल्यानंतर त्या मुलाला ट्युशन ची गरज का भासते? त्या महागड्या शाळेचे शिक्षक,त्या शाळेची शिस्त कुठे कमी पडते ? म्हणून तुम्हाला बाहेरच्या शिकवणी वर्गाचा आधार घ्यावा लागतो ? शाळेपेक्षा हेच शिक्षक चांगले हे तुम्ही कसे गृहीत धरता?मूळ शाळेतल्या शिक्षकांना, प्राचार्यांना तुम्ही जाब का विचारत नाही, शिक्षण पद्धत नीट नसेल तर ? की गरज असो वा नसो ट्युशन क्लास लावणे,पुन्हा वेगळा लाखोचा खर्च करणे ही सामाजिक फॅशन झाली आहे ?

तुमच्या हे लक्षात येत नाही का, की तुम्ही ट्युशन क्लासेसने चालवलेल्या मार्केटिंग चे बळी आहात? ट्युशन क्लास ची एकूणच पद्धत म्हणजे बाजारू वृत्ती आहे हे तुम्हाला कळत नाही का? की जाणून बुजून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता? अवती भवती चे शेजारी जे करतात ते आंधळेपणाने आपणही केले पाहिजे ही तुमची कामचालवू वृत्ती आहे?

घातल्या पाण्याने पीक येत नाही असे आमची आजी घोकत असे.म्हणजे सगळे काही उपजत असावे लागते. नैसर्गिक पद्धतीने ,कष्ट घेत शिकावे लागते.एक शाळा, दुसरी ट्युशन अशा डबल इंजिनची गरज नसते मुलांना मुळात.त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला,गृहपाठ केला तर तुम्ही लाखाची फी भरून प्रवेश घेतलेल्या शाळेचे शिक्षण देखील पुरेसे असते. तुम्ही तुमच्या घरातील सत्तरी पार केलेल्या आजी आजोबांना विचारून बघा. त्यांच्या काळात अमुक सर तमुक सर यांचे ९० टक्के वर मार्क्स प्रॉमिस करणारे क्लासेस चे पीक नव्हते.त्यांचे कुठे काय बिघडले? त्यातूनही उत्तम डॉक्टर्स, इंजिनियर्स, उत्तम वकील पैदा झालेच की! उलट त्यावेळी अशा उच्च शिक्षणासाठी मर्यादित कॉलेजेस होती.मर्यादित संधी होती.म्हणून कुणाचे काय बिघडले?या उलट आज कितीतरी पटीने कोर्सेस, कॉलेजेस,विद्यापीठे,प्रवेश संख्या सगळेच भूमिती श्रेणीने वाढले आहे.तरी नैतिकतेच्या नावाने बोंबाबोंब आहे!!

या जेन झी चे नवे नवे प्रताप मीडियातून पुढे येताहेत.मुले हट्टी,व्यसनी, उर्मट झाली आहेत.त्यांना आता पासूनच भ्रष्टाचार करुन शर्यतीत टिकून राहायचे आहे.गेले काही दिवस जो “नीट” गोंधळ सुरू आहे,त्यातून काय सिद्ध होते? यात मुले,पालक सगळेच सामील आहेत.लाखो रुपये लाच देऊन मुलगा एकटा पेपर विकत घेणार नाही.त्याला पालकाची म्हणजे तुमची साथ आहे! मला हे फार भयंकर वाटते देशाच्या भविष्याचा विचार करताना! कुठे चाललाय आपला समाज? असा प्रश्न पडतो.
हे आज घडलेले नाही. वर्षानुवर्षे चालू आहे! पकडल्या गेले म्हणून बिंग बाहेर फुटले..पण ट्युशन क्लासेस आजचे नाहीत. कोटा फॅक्टरी,तिथल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या आजच्या नाहीत. शिक्षणासाठी संधी वाढाव्या म्हणून हजारो इंजिनियरिंग, मेडिकल कॉलेजेस उघडली, त्यांनी डोनेशन च्या नावाखाली करोडो रुपये लुटले,आपले उखळ पांढरे करून तिजोऱ्या भरल्या.ते आज घडलेले नाही.ते अनेक दशकांपासून चालू आहे. कारण तुम्हाला लुटून तुमच्या मुलाना स्पर्धेच्या खाईत लोटणारे लुटारू आजचे नाहीत.ते तुम्हीच खत पाणी घालून पिकवलेले विषारी पीक आहे. गुणवत्तेचा , दर्जाचा जरा विचार करा. पदव्या मिळतात.मुले डॉक्टर्स, इंजिनियर्स होतात. त्यांना नव्वद टक्के गुण ही मिळतात.पण पुढे काय?काही निवडक अपवाद वगळले तर कोण किती दिवे लावतात? खऱ्या अर्थाने तुमची मान उंचावेल,तुम्हाला अभिमान वाटेल असे उदात्त कार्य करतात?फार कमी !

एरवी सगळेच या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होऊन जगतात.त्यांना घाई झालेली असते शिखराच्या पायऱ्या चढण्याची.त्यासाठी ते शेजाऱ्याच्या पायात पाय घालून,त्याला पाडून,त्याच्या खांद्यावर चढून आपली हौस भागवून घेतात.ही सगळी तुमची शिकवण आहे हे विसरू नका.तुम्ही त्यांना स्वतः स्वतःचा अभ्यास करूच दिला नाही.त्याला स्वतंत्र विचार करूच दिला नाही. पडल्या झडल्याशिवाय, रक्ताळल्या शिवाय शिखरावर चढण्याचा खरा आनंद नाही हे तुम्ही कधी समजावलेच नाही आपल्या मुलांना.गरज असो वा नसो तुम्ही कुबड्या तयार ठेवल्या त्यांच्यासाठी आधाराला.त्यामुळे त्यांची स्वतंत्र धावण्याची,आपल्या पंखांनी उडण्याची ताकदच हिरावून घेतली तुम्ही..
परिणाम? मुलींना लहान वयात फसवण्याचे,त्यांचे चारित्र्य हनन करण्याचे,दारू गांजा ड्रग्स अशा व्यसनाचे, बेदरकारपणे गाड्या चालवत निष्पाप लोकांना चिरडण्याचे, सरकारला खोटे दाखले देत फसविण्याचे प्रकार कितीतरी पटीने वाढले.हे तुम्ही लाखो रुपये खर्चून दिलेल्या उच्च शिक्षणाचे फळ आहे!!याचसाठी का केला होता अट्टाहास? असा प्रश्न कधी पडला नाही का तुम्हाला? नसेल पडला.कारण तुम्हीही भागीदार आहात या व्यवस्थेचे, परिस्थितीचे! हे विसरून कसे चालेल?

आज आपण विषण्ण होतो हे कोट्यवधीचे भ्रष्टाचार , अत्याचार बघताना.असाच प्रश्न दुसऱ्या महायुध्दात हिटलरच्या छळ छावणीत सुदैवाने वाचलेल्या एका शिक्षकाला पडला होता.त्याचे पत्र मिळाले या युद्धग्रस्त छळ छावणीत.त्यात तो शिक्षक लिहितो,
“हे काय बघतोय मी? युद्धात बॉम्ब ने पूल उध्वस्त करणारे कोण? इंजिनियर्स?इथे विषारी इंजेक्शन देऊन निष्पाप व्यक्तीचे प्राण घेणारे कोण? डॉक्टर्स! लहान मुलीवर ,स्त्रियांवर बलात्कार करणारे कोण? विद्यापीठातील सुशिक्षित पदवीधर तरुण!!हेच शिकविण्यासाठी गुरू आहेत का? शाळा कॉलेजात शिकविली जाणारी हीच नैतिकता आहे का?
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे कुठेच कुणी शिकवत नाही का?”
हाच प्रश्न एक शिक्षक या नात्याने मलाही पडला आहे.मी उत्तर शोधतोच आहे.कारण अजूनही माझे शिकणे ,शिकवणे संपलेले नाही. तुम्हाला काय वाटते?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version