जंगल मंगल विद्यापीठ : झुरळांचा मोर्चा !
जंगलातील गुहेत कुलगुरू निवांत बसले होते. नवीन शैक्षणिक धोरण आगळ्यावेगळ्या पद्धतीने राबविण्याच्या बाबतीत या विद्यापीठाने बाजी मारली होती. हार्वर्ड विद्यापीठाला नोटीस देऊन तोंडघशी पडणाऱ्या ट्रम्प ने देखील जंगल मंगल विद्यापीठाचा धसका घेतला होता. प्राण्याचे विद्यापीठ माणसांच्या विद्यापीठांना आव्हान देत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावरून जगभर पसरल्या होत्या. कुलगुरू वाघ, उपलगुरु सिंहीण, यांची कारकीर्द छान गाजत होती. सिंहीण बाई हा बहुमान मिळाल्याने खुश होत्या. बहुतेक निर्णय स्वतः सिंह च घेत असल्याने त्यांना फारसे काही काम नव्हते. फक्त मीटिंग अटेंड करायची अन् वाघाच्या हो ला हो म्हणायचे एव्हढच काम. कुलसचिव म्हणून गाय शांतपणे कारभार सांभाळत होती.तिला अधिष्ठाता म्हणून म्हशीची छान साथ लाभली होती. एकूण इतर विद्येचं माहेरघर वगैरे म्हणवणाऱ्या विद्यापीठाच्या दर्जाची घसरण चालू असताना जंगल मंगल विद्यापीठाचा दर्जा वाढतच होता. कारण इथे प्रत्येकाला समान वागणूक मिळत होती. प्रत्येकाच्या तक्रारीकडे जातीने लक्ष दिलं जात होतं.
मागे काही दिवसापूर्वी अचानक कबूतर खान्यातील कबुतरांचा मोर्चा आला होता. त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तो सामंजस्याने सोडविण्यात आला. आजकाल बिबटे, वाघाची पिल्ले चक्क शहरात गावात फिरायला लागली होती. त्यामुळे माणसे जनावरांना घाबरायला लागली होती. यांच्या नादी न लागलेले बरे असे म्हणायला लागली होती !
कुलसचिव गायीने झुरळाचा मोर्चा येणार अशी बातमी दिली तेव्हा कुलगुरू वाघ चिंतेत पडले ! झुरळांचा मोर्चा ? त्यांनी गायीला आश्चर्याने विचारले.
“हो महाशय. तोही प्रचंड मोर्चा अशी खबर आहे.”
“पण झालं काय असं ?“ वाघांनी उत्सुकतेनं विचारलं.
“मलाही पूर्ण कल्पना नाही. पण मी मीडियातून कानोसा घेतला. काही दिवसापूर्वी चक्क कोर्टात न्यायाधीश महोदयांनी तरुण जेन झी ला झुरळाची उपमा दिली. त्यामुळे सगळा तरुण वर्ग संतापलाय. त्यांनी चक्क झुरळाच्या नावाने पार्टी काढलीय ! आता हा आमचा अपमान आहे म्हणून आपल्या जंगलातील झुरळ देखील एकत्र आलेत.निषेध नोंदवायला.”

गाय हे समजावीतच होती की गुहेच्या बाहेर गलका सुरू झाला. मोर्चा जवळ आला होता. वाघ हलकीशी डरकाळी देत गुहेबाहेर आले. आपण त्यांच्या मन की बात ऐकून त्यांना शांतपणे समजावू शकू असा त्यांना आत्मविश्वास होता. आपणच बोलत राहण्या पेक्षा दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेणे जास्त महत्वाचे हे आता त्यांना कळून चुकले होते.
त्यांच्या बरोबर आपली आयाळ ठिकठाक करीत सिंहीण बाई आल्या.
“झुरळ पार्टी जिंदाबाद.. आम्हाला न्याय द्या. नहीं सहेंगे नहीं सहेंगे. हम अपमान नहीं सहेंगे“.
अधिष्ठाता म्हशीने झुरळाना आपल्या शेपटीने शांत केले. गायीने देखील मान हलवत एक हंबरडा फोडला हलकासा.. मोर्चा खरेच साधा सुद्धा नव्हता. जिकडे बघावी तिकडे झुरळेच झुरळं दिसत होती. करड्या लाल रंगाचे साम्राज्य पसरल्या सारखं दिसत होतं दूर पर्यंत जंगलात.
झुरळाच्या म्होरक्याने पुढे येत आपलं निवेदन गायीच्या शिंगावर ठेवलं हळूच ! त्यांनी वाघाला, सिंहीण बाई ना इतक्या जवळून प्रथमच बघितलं होतं ! त्यामुळे नाही म्हटलं तरी भीती होतीच मनात. पण अन्यायाला वाचा फोडणं देखील तितकंच गरजेचं होतं. म्हशीने गायीच्या शिंगावरचं निवेदन हाती घेऊन वाचलं अन् ते वाघाच्या कानात काहीतरी सांगत त्याच्या पंजात दिलं.
झुरळाच्या नेत्याला त्यांनी बोलायची परवानगी दिली. “आम्ही तसे निरुपद्रवी आहोत. कुणाच्या अध्यात न मध्यात. पण एका न्यायाधीशाने आमचे नाव घेऊन आमची उपमा तरुणांना द्यावी हा आमचा प्रचंड घोर अपमान आहे असं आम्ही समजतो. आता तर संतापलेल्या तरुण पिढीने चक्क आमच्या नावाने राजकीय पार्टी काढली आहे. हा आमचा डबल अपमान आहे. समजतात काय हे शहाणे स्वतःला. तिकडच्या विद्यापीठात डिग्री घेतली अन् झाले सोन्याहून पिवळे ! असे होत नाही. यांचे शिक्षण, यांच्या परीक्षा, यांच्या पदव्या सगळेच किती बोगस आहे हे रोज बघतातच लोक पडद्यावर. सगळी कडे ही मंडळी स्वतः भ्रष्टाचाराने पोखरली आहेत. द्वेष, मत्सर यांच्या रक्तात आहे. आपल्या जंगलवासियानाच रक्ताची भूक असते असे समजत होतो आपण. पण हे तुमच्या आमच्या पेक्षाही खालची पातळी गाठत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. टीव्हीवर सिनेमात प्राणी वगैरेचा वापर, त्यांना त्रास होऊ नये असे नियम आहेत. पण एका जाहिराती स्प्रे च्या एकाच फटकाऱ्याने आम्ही मरतो असे दाखवले आहे. आजकाल हे स्प्रे देखील नकली निघाले आहेत. ते आरोग्याला घातक आहेत यांच्याच. आम्हाला आता या औषधाची सवय झाली त्यामुळे आम्ही पळून जातो. यांना फसवून आपले काम चालू ठेवतो हा भाग वेगळा. पण आमचा अपमान, आमचा छळ आम्ही सहन करणार नाही. झुरळ नाव हा आमचा ब्रँड आहे. ते नाव कुणाला चोरता येणार नाही. शिवाय युवर ऑनर म्हणविणाऱ्या न्यायाधीश महोदयांना भर कोर्टात आमचा अपमान करता येणार नाही. हे एव्हढेच आमचे नम्र निवेदन आहे. आपण आमचे म्हणणे डरकाळी न देता ऐकून घेतले त्याबद्दल समस्त झुरळ जाती तर्फे आम्ही आभार मानतो. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”
निवेदन संपताच प्रथेप्रमाणे पुन्हा घोषणा देण्यात आल्या. यानंतर कुलगुरू नी गायी, म्हशीशी चर्चा केली. यावर गंभीरपणे विचार करून संबंधितांना समज दिली जाईल असे आश्वासन दिले. आवश्यकता पडल्यास एखाद्या बिबट्याला जंतर मंतर वर पाठवून या झुरळ पार्टीला देखील समज देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. कुलगुरू वाघ म्हशीच्या कानात काहीतरी बोलले. तेव्हा शेवट करतांना म्हशीने खास निवेदन दिले.
“झुरळाची तक्रार योग्यच आहे. आजकाल पक्षी, प्राणी, जनावरे यांच्या नावाने शिव्या देण्याचा प्रघात पडला आहे. जनतेचे सेवक म्हणविणारे लोक प्रतिनिधी देखील चारचौघात आपल्या नावाचा उपयोग करीत शिव्या देतात. यापूर्वी कुत्रे, गाढव यांची तक्रार आपल्याकडे आली आहे. आपण शांत आहोत याचा अर्थ आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही असे या दोन प्राण्यांच्या जनावरांनी समजू नये. आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी शहाणे आहोत. आपण लज्जास्पद खून, बलात्कार करत नाही यांच्यासारखा ! हे तर लाजलज्जा सोडल्यासारखे वागताहेत ! आपण सगळे त्यांचा निषेध करतो आहोत.या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात येईल. एका महिन्याच्या आत त्यावर कारवाई करण्यात येईल असे मी कुलगुरूंच्या वतीने आश्वासन देत आहे.” सगळ्यांनी पंख फडफडवत आनंद व्यक्त केला. मोर्चा माघारी गेला.
कुलगुरू गुहेत परतले. गायी, म्हशीने शेपटी हलवत टाळी दिल्याचा आविर्भाव दाखवून बाजी मारल्याचे समाधान व्यक्त केले. ते दोघेही बाईट द्यायला बाहेर दंडे घेऊन उभे असलेल्या मिडियाला सामोरे गेले !
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800