पाउस सुरु झाला कि शहर असो कि गांव असो, तसेच गल्ली, रस्ता, हमरस्ता, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग कुठे हि खड्डे पडले नाही असे कुठेच दिसणार नाही. रस्ते आणि खड्डे या विषयावर दरवर्षी न्युज चॅनेल, वृत्तपत्रे, सोशल मीडिया यावर ईतक्या बातम्या, लेख, अग्रलेख, व्यंगचित्रे, प्रसिध्द होतात पण सरकार (कोणत्याही पक्षाचे असो) शासन यंत्रणा, यांना काडीमात्र फरक पडत नाही.
संबंधित खात्याचे अधिकारी, इंजीनियर, कॉन्ट्रैक्टर यांची सर्वत्रच मिली भगत असते. सामान्य जनता मात्र त्या खड्डेमय रस्त्यातुन ठेचकाळत, धडपडत, धक्के खात वाट काढत असते. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मग ते नेहमीचे खड्ड्यात वृक्ष रोपण करणार, खड्ड्यात कागदी होड्या सोडुन आपले व्हिडिओ, फोटो काढणार काही जण संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार, तर काही जण आंदोलन, मोर्चा काढु असा थेट धमकीवजा ईशारा देणार. मग त्या खात्याचे मंत्री ताबडतोब खड्डे बुजवा असे आदेश देणार.

पुन्हा तीच सरकारी यंत्रणा खड्डे बुजवण्याचे टेंडर काढून त्याच ठेकेदारांना काम देणार. प्रत्येक ठिकाणी टक्केवारी ठरलेली, ठेकेदारही ठरलेले. हे दुष्टचक्र कधीच थांबत नाही. अनेकांना खड्ड्यांमुळे प्राण गमवावे लागतात. त्यातल्यात्यात एक मात्र खरे कि कोणी मंत्री महोदय यांचा दौरा असेल तर मात्र रातोरात खड्डे बुजवले जातात. मी तर रस्ते आणि खड्डे या विषयावर एव्हढी व्यंगचित्रे काढली पण परीस्थिती जैसे थे. असो.
असेच आपण खड्ड्यातुन मार्ग काढत राहु. कधीतरी लोकप्रतिनिधी, शासकिय यंत्रणा, ठेकेदार सुधारतील या आशेवर. उम्मीद पे दुनिया कायम हैं l असे कोणी तरी म्हटलेले आहे.

— लेखन : गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800