ही ‘पाहुणी’ म्हणजे आपल्या घरी येते ती नव्हे. ही पाहुणी माझ्या घरातली मीच. माझ्या मनात रूजवलेली संकल्पना. यासाठी थोडी गेल्या वर्षभराची पार्श्वभूमी.
गेल्या वर्षी गावी, रत्नागिरीला गेलो असताना पायाला संसर्ग झाला. आणि उजव्या आणि डाव्या पायांच्या दोन दोन शस्त्रकिया कराव्या लागल्या. त्यातल्या तीन मेजर, एक लहान. जवळ जवळ वर्ष गेलं. प्रत्येक सण हाॅस्पिटलमध्ये. खूप अशक्त झाले. दोन वेळा रक्त दिलं गेलं. अन्न जात नव्हतं. एकदा, दोन दिवस पूर्ण ग्लानीत म्हणजे बेशुध्दावस्थेत काढले.
कन्या ईशानी लाॅ च्या दुसर्या वर्षाला. तिची अवस्थाही बिकट. पती जयू भाटकर सुन्न झालेले. परंतु या दोघांनी प्राणापलिकडे जपलं. कन्या म्हणायची मी तुझी आई. जयूंनी लहान मुलीसारखी देखभाल केली. सगळ्यांच्या शुभेच्छा, मोठ्यांचे आशिर्वाद आणि मैत्रिणींची अनमोल साथ यामुळेच केवळ या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. आणि घरातले सहकारी स्वयंपाक करणार्या ताई, घरात काम करणारी मुलगी सगळ्यांनी जपलं.
मी तशी परफेक्शनिस्ट. सगळं जिथल्या तिथे हवं या कॅटॅगरीतली. त्यामुळे परावलंबी जिवन जगताना त्रास व्हायचा. चालता येत नव्हतं. चार पाच महिन्यात चालले नव्हते. घरी आल्यावर थोडे दिवस व्हिलचेअर, मग वाॅकर मग काठी अशी प्रगती होत गेली. अस्ताव्यस्त घर पाहून त्रास व्हायचा. पण माझी रुम स्वच्छ टापटीप असायची माझ्यासाठी.
एकेदिवशी बसले असताना सहज मनात विचार आला. आजपासून आपण पाहुण्यांसारखं रहायचं. म्हणजे न मला त्रास होईल न इतर कुणाला. म्हणजे घरात राहून थोडंस अलिप्त रहायचं. थोडक्यात कानाडोळा करायचा. आपण कुणाकडे पाहुणी म्हणून गेल्यावर नाही का, काही गोष्टी मनासारख्या नसतील तर दुर्लक्ष करतो. आणि तसंही दुसर्यांच्या घरात आपल्या मनासारखं कसं असणार? अगदी तसंच दुसर्यावर अवलंबून असताना अट्टाहास का करायचा ? आणि कशासाठी ?
तेव्हापासून त्रास खूप कमी व्हायला लागला. बरी झाले. छान चालते. मठात जाते. वेळ पडली की स्वयंपाक करते. एखादा पदार्थ करते. वाचन करते. पुढे जाऊन अजून एक विचार मनात आला या जगाच्या मंचावरच मी पाहुणीच ना ? आपण सगळे पाहुणेच ना ?
– लेखन : पद्मा भाटकर
– संपादन: देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹अतिशय सुंदर लिहिले हो.
खूपच भावनाप्रधान. स्वतः बद्दल लिहिले, हे पण एक मोठेपणा, नं धाडस आहे.
आपले पती आणि मुलगी. नमन त्यांना 🌹
Nice मॅडमजी