भाग : – १
नुकतेच श्री गणरायाचे विसर्जन झाले आणि पितृपक्षाची म्हणजेच श्राध्दपक्षाची सुरुवात झाली आहे. आपल्या पूर्वजांनी श्रावण महिन्यापासून चातुर्मासाची मांडणी निसर्गाच्या बदलानुसार केली आहे.
श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा समजला जातो.भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून गणेश उपासनेचे दिवस येतात. तर अश्विन महिन्यात शक्तिची उपासना केली जाते. शक्तिची उपासना करण्यापूर्वी आपल्या पितरांच्या ॠणातून मुक्त होण्यासाठी भाद्रपद कृष्ण पंधरवाड्यात पितृपक्षाची रचना केली आहे. आपल्या पितरांची म्हणजे पूर्वजांची आठवण करण्याचा हा पंधरवडा!या श्राद्धपक्षात आपण आपल्यावर असलेले आपल्या पितरांचे ॠण फेडू शकतो. आपल्या पितरांना मुक्त करण्यासाठी प्रार्थना करू शकतो.
श्राद्ध म्हणजे काय ? तर जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध ! हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारचे ॠण असते. देवॠण, ॠषिॠण आणि पितृॠण. या पितृॠणातून मुक्त होणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या या पूर्वजांमुळे आपण या भूतलावर जन्माला आलो त्यांचे मनापासून आदरपूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करणे अपेक्षित आहे.
मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर पितरांविषयी ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचा पंधरवाडा. मानसशास्त्रात या‘ग्रॅटीटयुड टेक्निक’चे फार महत्व मानले जाते. मराठीत आपण याला आभारप्रदर्शन करणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये यालाच ‘थॅंक्स गिव्हिंग’ म्हणतात. याचे अनेक फायदे होतात असे मानसशास्त्र म्हणते.
धर्म शास्त्रानुसार अशा पितरांचे किंवा पितृ देवतेचे आपण मनोभावे स्मरण करून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करणे म्हणजेच आपण पितरांच्या ॠणातुन मुक्त होणे असं म्हटलं जातं.
पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा फार प्राचीन काळापासून सुरू आहे. प्रभू रामानेही पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले. महाभारताच्या शिस्तपर्वात पितृपक्षासंदर्भातील आख्यायिका असल्याचे सांगितले जाते. या पर्वात श्राद्ध करण्याची परंपरा सांगण्यात आली आहे. महाभारतानुसार मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर दु:खात असलेल्या निमि ऋषींनी त्यांच्या पूर्वजांना आवाहन करणं सुरू केलं होतं. तेव्हां सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी अत्रीमुनींनी निमी ऋषींना दिले. त्या वेळेनंतर सनातन धर्मात श्राद्धाला महत्त्व प्राप्त झालं.
कौरव पांडवांच्या युद्धात जे सैनिक मृत्युमुखी पडले होते त्यांचं श्राद्ध युधिष्ठिराने घातल्याचंही सांगितलं जातं.
गरूड पुराणातील ११ ते १४ श्लोकांमध्ये श्राद्धाचे महत्व आणि हे कोण करू शकतं, कोणाला, कधी श्राद्ध करण्याचे अधिकार आहेत याविषयी सांगण्यात आले आहे.
पुत्राभावे वधु कूयति,भार्याभावेच सोदनः। शिष्यों वा ब्राह्मणः सपिण्डो वा समाचरेता ज्येष्ठस्य वा कनिष्ठत्य भ्रातृः पुत्रश्च: पौत्रके। श्राध्यामात्रदिकम कार्य पुत्रहीनेत खगः।
या श्लोकानुसार मोठा मुलगा किंवा मुलगी यांच्या अनुपस्थितीत पत्नी किंवा सून श्राद्ध घालू शकते. जर पत्नीही जिवंत नसेल तर सख्खा भाऊ, पुतण्या, भाचा श्राद्ध घालू शकतो. पण जर यापैकी कोणीही नसेल तर एखादा शिष्य, मित्र किंवा नातेवाईकही हे श्राद्ध घालू शकतो. अर्थात महिलांना श्राद्ध किंवा पिंडदान करण्याचा अधिकार आहे.
वाल्मिकी रामायणानुसार देवी सीताने देखील आपले श्वशुर राजा दशरथाचे पिंडदान केले होते.
धर्मशास्त्रा नुसार या पितृपक्षातील पंधरवाड्यात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी आपण तीन गोष्टी करू शकतो.
१) पितरांची तिथि असेल त्या दिवशी श्री महाविष्णुचे नामस्मरण करून पिंपळाच्या वृक्षाला ५/११/२१ प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालतांना, “ॐ नमो भगवते वासुदेवाय, पुरुषोत्तमाय नम:” असा मंत्र म्हणावा. तसेच पिंपळाच्या वृक्षाला जानव्यांचे ७ जोड़ अर्पण करावेत. आपल्या पितरांचे नांव घेऊन त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी. जर मनांत कोणतीही अपराधीपणाची भावना असेल, आपण त्यांच्याविषयी काही चुकीचे वागल्याचे सलत असेल तर त्यांची मनापासून क्षमा मागून (केवळ उपचार/दिखावा म्हणून नाही) सारे विसरून आशीर्वाद देण्यास सांगावे आणि पुन्हां एकदा त्यांच्या मुक्तीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी.
२) एक मडके घेऊन त्यास खाली एक छोटेसे छिद्र पाडावे. त्यात पाणी भरून ते पिंपळाच्या झाडाला अशा प्रकारे अडकवावे की जेणेकरून पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांवर सतत पाण्याचा अभिषेक होईल. शक्य झाल्यास हे भांडे १५ दिवस पिंपळाच्या वृक्षाला टांगून ठेवावे. ही पिंपळाच्या वृक्षासाठी जलसेवा असेल. यालाच पितृसेवा असे म्हणतात.
जलसेवा अर्पण करतांना आपल्या पितरांचे नांव घेऊन त्यांच्या मुक्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी.
३) आपल्या पितरांची नावे स्मरण करून गाय, कुत्रा, कावळा यांना घास द्यावा. जितका जास्त जमेल तितक्यावेळा द्यावा. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून पितृपक्षात दानधर्म करावा. मात्र धर्मशात्रानुसार दान योग्य व्यक्तीलाच करावे.(मंदिराबाहेर लागणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेला किंवा सिग्नलपाशी कायमच तान्हुली बाळे घेऊन भीक मागणाऱ्यांना नव्हे. त्यांना २/४ रुपये देऊन किंवा वेफर्सची पॅकेट्स देऊन कोणतेही पुण्य तर मिळत नाहीच पण फुकटेपणाची सवय लावली जाते आणि मुले पळविण्यास नकळत मदत केली जाते) समाजातील ज्या घटकांना मदतीची खरी गरज आहे त्यांना आपल्या ऐपतीनुसार दान करावं आणि त्यावेळी आपल्या पितरांचे नांव घेऊन त्यांच्या मुक्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान,
विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो.

भरणी श्राद्ध:चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात.
अविधवा नवमी: भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.
पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा.
ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्। ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च। नम: स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नम:। या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते.
पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने आध्यात्मिक शांती मिळते आणि पितृदोषही दूर होतो.
पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात, असे वाचल्याचे आठवते.
पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते.
पितृ पक्षादरम्यान, पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते. म्हणून या काळांत पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करावे.
मी स्वतः यातील जे जमते ते नक्की करते. काही गोष्टी नाही जमत, उदा.गायीला चारा घालणे. मग गोरक्षण कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकी एकाला देणगी पाठवून देते. काही वर्षे अनाथ मुलींना प्रत्यक्ष भेटून त्यांना आवडतील अशा भेटवस्तू दिल्या. त्याही गायी समान नाही कां ?
क्रमशः

लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नीला लेखातून खूपच माहिती मिळाली ज्याबद्दल अजूनपर्यंत अनभिज्ञ होतो…खूप आभारी आहे !!
Khup informative article ahe for all . Many of us also don’t know many things
Neelatai, Khupach Sunder mahiti dili. Aajchya pidhila ya goshti sangane awashyak aahe. Thankyou!🙏