भाग : – ३
हिंदूंव्यतिरिक्त जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये देखील श्राद्धविधी सांगितलेला आहे. जैनांमध्ये श्राद्धतिथीस तीर्थंकरांना, ख्रिश्चनांच्या रोमन कॅथलिकांमध्ये चर्चमध्ये, मुस्लिम धर्मियांमध्ये कुराण पठणासहित फकिरांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. पारशी लोकांमध्ये ‘मुक्ताद’ किंवा ‘डोसला’ करताना अध्यारूस घरी बोलावून सदक्षिणा भोजन देतात. इजिप्त व ग्रीकांमध्येही ‘ममी’ जवळ त्यांच्या परलोक प्रवासासाठी आवश्यक साधनसाम्रगी ठेवतात.
आपण पितृपक्ष म्हणतो तर इतर देशांत याच परंपरेचा, पितृऋणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
चीनमध्ये याला किंगमिंग उत्सव म्हणतात आणि तो २३ दिवस असतो. या काळांत थडगे साफ करण्याचा दिवस/ग्रेव्ह स्वीपिंग डे असून त्या दिवशी थडगी झाडून आपल्या पूर्वजांना आदरांजली वाहतात. त्यांना अन्न, चहा, वाइन, चॉपस्टिक्स अर्पण करतात आणि जेवणाची विनंती करतात. हल्लीच्या काळांत काही चिनी लोक मृत व्यक्तींना कागदापासून बनवलेले गॅजेट्स उदा. ipad, iphone, सीडी प्लेयर समर्पित करतात, तसेच कागदी नोटा जाळतात या समजुतीने की त्या त्यांना मिळतात.

पारशी बांधव वर्षातील शेवटचे ९ दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे करतात. दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाला प्रारंभ होतो. ‘पापेती’ म्हणजे पापाचे नाश करणारा दिवस. याच शब्दाचा अपभ्रंश ‘पतेती’ असा झाला. या दिवसापासूनच पारशी नववर्षाला प्रारंभ होतो. पारशी धर्मग्रंथ ‘अवेस्ता’ मध्ये पितरांना ‘फ्रावशी’ म्हटले असून ‘दुष्काळाच्या वेळी ते स्वर्गातील सरोवरांतून त्यांच्या वंशजांसाठी पाणी आणतात’, असे मानले जाते. हिंदु संस्कृतीप्रमाणे पारशी समाजामध्येही आत्मा ‘अमर’ मानला आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी ९ दिवस वेगवेगळे विधी केल्यानंतर शेवटच्या दिवशी ‘पतेती’ साजरी केली जाते. यांची मूळ देवता ‘अग्नि’ असल्याने अग्यारीत जाऊन अग्नीची पूजा करून ते त्यास चंदनाची लाकडे अर्पण करतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्यांत हा कालावधी येतो.

ताओ परंपरेनुसार दिनदर्शिकेच्या ७ व्या मासातील १५ दिवस पूर्वजांच्या संदर्भात ‘घोस्ट फेस्टिव्हल’ (भूतांचा/मृतांचा उत्सव) किंवा ‘युलान फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. या ७ व्या मासाला ‘घोस्ट मास’ (भूतांचा/मृतांचा मास) म्हणून ओळखले जात असून त्या कालावधित ‘स्वर्गातील, तसेच नरकातील पूर्वजांचे आत्मे भूतलावर येतात’, अशी त्यांची श्रद्धा आहे. या काळात पूर्वजांना दुःखातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी परंपरागत भोजन बनवितात. पूर्वज तेथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत असा विश्वास ठेवून त्यांच्यासाठी आसन रिकामे ठेवून त्यांना भोजन वाढले जाते. धूप प्रज्वलित करतात. जॉस पेपरचे वस्त्र, चलन, दागिने इ. बनवून ते जाळतात जेणेकरून पूर्वजांना प्राप्त होतील अशा समजुतीने ! तसेच पृथ्वीवर अडकून पडलेल्या आत्म्यांना या काळांत मुक्ती मिळू शकते या समजुतीने रात्री कागदी नाव, दिवे पाण्यात सोडून पूर्वजांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.

ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यांत हा दिवस येत असून बौद्ध परंपरा असणार्या बहुतांश देशांत हा उत्सव थोड्याफार फरकाने साजरा केला जातो. उदा. सिंगापूर, चीन, मलेशिया, हाँगकाँग, तैवान, कंबोडियामध्ये यांस ‘पचूम बेन’ (Pchum Ben) म्हणतात. २३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा विधी केला जातो. या दिवसांत घरी अन्न शिजवून त्याच्या नेहमीच्या प्रार्थना स्थळी आणतात. तेथे पूजा करून भाताचे गोळे (पिंड)करून ते मोकळ्या शेतात, तसेच हवेत फेकले जातात. मात्र हा ख्मेर कॅलेंडरच्या १० व्या महिन्यांत येत असून त्याच्या १५ व्या दिवशी (म्हणजे आपल्याकडील सर्वपित्री अमावास्येप्रमाणे) या विधीसाठी सार्वजनिक सुटी असते. या विधीमध्ये मागील ७ पिढ्यांपर्यंतचे मृत नातेवाईक आणि पूर्वज यांना आवाहन करून सन्मानितात. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे मात्र गरीब म्हणून जन्माला येणे खूप चांगले आहे असा विश्वास आहे कारण याचा अर्थ पृथ्वीवरील मार्ग संपत आहे. आणि म्हणूनच, कोणीही त्याच्या आयुष्यात काहीही बदलू इच्छित नाही. ते प्रत्येक गोष्टीत समाधानी आहेत. गरीब म्हणून जन्म देण्यात आला असल्याने ते तसे असले पाहिजे आणि त्यांना ते बदलण्याचा अधिकार नाही, हे तत्वज्ञान आहे. (मात्र जागतिकारणानंतर तरुणांचे विचार बदलत आहेत)
श्रीलंकेमध्ये बौद्ध परंपरेनुसार व्यक्ती मृत झाल्यावर ७ व्या दिवशी, ३ महिन्यांनी आणि वर्षपूर्तीच्या दिवशी त्या मृतात्म्यांना अन्नदान केले जाते. याला ‘मतकदानय’ असे म्हणतात. यांच्या समजुतीनुसार अन्नदान केल्यामुळे जे पुण्य त्यांना प्राप्त होते त्याच्याशी तुल्य गोष्टी मृतात्म्यांना मिळून त्यांना परलोक गती मिळते. जे मृतात्मे परलोकी पोहोचू शकत नाहीत, तरंगत राहून वाट पहात राहतात. त्यामुळे दोष उत्पन्न होऊन जिवीत व्यक्तींना विविध प्रकारचे आजार, संकटे येऊ शकतात, यासाठी दरवर्षीही बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करून जेवण अथवा शिधा दिला जातो.
पुष्कळ देशांमध्ये हा फेस्टिवल म्हणजे उत्सवाच्या रूपांत मनवला जातो. उदा.जपान. जपानमध्ये मूळ संस्कृत भाषेतील ‘उल्लंबन’ (उलटे टांगणे) या शब्दाचा अपभ्रंश होऊन याला ‘ओबॉन’ किंवा ‘बॉन फेस्टिव्हल’ असे म्हटले जाते. या काळात ‘बॉन ओदोरी’ हे नृत्य केले जाते.

या नृत्यपरंपरेच्या संदर्भात कथा आहे की, गौतम बुद्धाचे एक शिष्य महामुद्गलायन (मोकुरेन) याने त्याच्या दिव्य दृष्टीने पाहिले की, त्याची मृत आई मुक्त न होता भुतांच्या तावडीत सापडली असून दुःखी आहे. यावर काय करावे हे विचारण्यासाठी तो गौतम बुद्धांकडे गेला. त्यांनी त्याला बौद्ध भिक्खूंना दान देण्यास सांगितले. मोकुरेनने त्याप्रमाणे दानधर्म करून आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर त्याला त्याची आई त्या भुतांच्या तावडीतून मुक्त होतांना दिसली. त्यामुळे अतिशय आनंदित होऊन तो चक्क नाचला. तेव्हांपासून या काळात ‘बॉन ओदोरी’ किंवा ‘बॉन डान्स’ करण्याची प्रथा चालू झाली. हा कालावधी ८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर असून ३ दिवस ‘दीपोत्सवा’ प्रमाणे साजरा केला जातो. या काळात पूर्वजांचे आत्मे मूळ घरातील पूजास्थानी येतात या श्रद्धेने या दिवसांत परिवारातील सर्वजण मूळ घरी जमतात आणि पूर्वजांची थडगी स्वच्छ करून तेथे धूपबत्ती लावतात. पण पुष्कळदा ही घरे नसतातही. जोपर्यंत ते पूर्वजांना प्रकाश दाखवणार नाहीत, तोपर्यंत पूर्वजांना त्यांच्या वंशजांच्या घरांचा मार्ग शोधण्यास अडचण येईल या विचारांमुळे या काळात उंच बांबू थडग्यांच्या चारही बाजूंनी जमिनीत रोवून त्यावर रंगीबेरंगी कंदील लटकवतात आणि त्याखाली मेणबत्तींच्या प्रकाशात बसून लोक त्यांच्या पूर्वजांना आवाहन करतात.
म्यानमार म्हणजेच पूर्वीचा ब्रह्मा किंवा ब्रह्मदेशामध्ये जपानच्या अगदी उलट पद्धतीने, म्हणजे आनंदाऐवजी शोक समारंभाच्या रूपात हे दिवस करतात. याचा कालावधी ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरची सुरुवात असा असून घरोघरी रडून शोक व्यक्त केला जातो. ज्यांच्या कुटुंबात मागील ३ वर्षांमध्ये निदान एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे असेच लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. या काळांत मृतांच्या नांवाने अन्न, वस्र दान केले जाते.
प्रारंभिक फिलिपिनो मृत्यूनंतरच्या जीवनाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत होते. स्पॅनिश लोकांच्या आक्रमणापूर्वी प्रचलित असणार्या प्राचीन फिलिपिनो ‘अॅनिटिजम’ या पंथानुसार आपल्याला दिसणार्या स्थूल जगताप्रमाणे एक सूक्ष्म जगतही समांतर कार्यरत आहे. जेव्हां एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हां तो बथला (देवाची) सेवा करणारा अॅनिटो बनतो. अॅनिटोस म्हणून, ते एक बनतात आणि ते जिवंत व्यक्तींच्या जीवनातील घटनांवर प्रभाव पाडतात. सुरुवातीच्या फिलिपिनोसाठी, मृत्यू हा शेवट नाही. उलट, जगण्याच्या नवीन मार्गाची सुरुवात. हे फिलिपिनो म्हणीमध्ये स्पष्ट आहे, “कपिलिंग ना सिया एन मायकपाल.” तेथील ‘पेगॅनिटो’ सोहळा हा एक प्रकारचा आध्यात्मिक सोहळा आहे, ज्यामध्ये पारंपरिक ‘शमन’ (मृतात्म्यांशी संवाद साधण्याची क्षमता असणारा व्यक्ती) आत्म्यांशी संभाषण करतो. १९ फेब्रुवारीला हा उत्सव केला जातो.
स्पॅनिश आक्रमणानंतर कॅथॉलिक पंथाचा प्रभाव पडून ख्रिस्ती पंथ स्वीकारलेले नागरिक २ नोव्हेंबर या दिवशी दफनभूमीत जाऊन थडगे स्वच्छ करून त्यावर फुले वहातात, तसेच मेणबत्ती लावतात. या दिवशी लहान मुलांना मेणबत्ती वितळून पडलेले मेण गोळा करून त्या मेणाचे गोल गोळे करण्यास सांगितले जाते. यातून ‘जेथे अंत होतो, त्या अंतातूनच पुन्हा पुनर्निर्मिती होते, हा संदेश दिला जातो.
आता युरोप, लॅटीन अमेरिकेतील परंपरा पाहू या. मध्ययुगात, बहुतेक ख्रिश्चन समुदायांनी चर्चच्या संतांचा सन्मान करण्यासाठी वार्षिक मेजवानी आयोजित केली होती-जे मरण पावले आणि स्वर्गात गेले होते. कालांतराने, हा दिवस ऑल सेंट्स डे म्हणून ओळखला जाऊ लागला आणि कॅथोलिक चर्चने याला कर्तव्याचा पवित्र दिवस बनविला.
१० व्या शतकात कधीतरी, कॅथोलिक धर्मगुरू सेंट क्लूनीच्या ओडिलोने “ऑल सोल्स डे” ठरविला. सर्वसामान्य स्त्री-पुरुष जे चांगले जीवन जगले होते आणि स्वर्गात प्रवेश करण्यास पात्र होईपर्यंत शुद्धीकरणाची वाट पाहत होते त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस वार्षिक उत्सव ऑलहॅलोटाइडचा अंतिम आणि तिसरा दिवस बनला. ऑल हॅलोज इव्ह-३१ ऑक्टो. आणि ऑल सेंट्स डे-१ नोव्हे. नंतर, ऑल सोल्स डे (२ नोव्हेंबर). जगभरात विविध धर्म आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांद्वारे साजरा केला जातो. भले भाषा आणि देश, धर्म वेगवेगळे असू देत पण काही परंपरा सर्व लोकांसाठी समान आहेत. उदा. कुटुंबासोबत, स्मशानभूमींना भेट देणे, प्रियजनांच्या आठवणी शेअर करणे आणि परंपरांचा सन्मान करणे. तर काही एकमेवद्वितीय आहेत. उदा. ग्वाटेमालामध्ये, या दिवसाला बॅरिलेट्स गिगांटेस फेस्टिव्हल किंवा जायंट काइट्स फेस्टिव्हल म्हणत असून त्या दिवशी मोठाले पतंग उडवतात. हे पतंग ६५ फूट इतके मोठेही असू शकतात आणि ते तयार होण्यासाठी काही महिने लागतात. लोक चिठ्ठी लिहितात आणि पूर्वजांना स्वर्गात वाचण्यासाठी पतंगाच्या शेपटीला बांधतात. त्याआधी मांस आणि भाज्या यांपासून ‘फियांब्रे’ नावाचा पदार्थ करून तो मृतांच्या थडग्यांवर ठेवला जातो.
जगाच्या काही भागांमध्ये, उत्सवांमध्ये स्वदेशी परंपरा आणि विश्वास देखील समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, मेक्सिकोमध्ये ‘अल् देओ दे लॉस मुर्तोस’ (el día de los muertos) या नांवाने ओळखला जागणारा हा उत्सव ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो. त्यास सर्वसाधारपणे ‘मृतांचे दिन’ असे म्हणतात. हा मूळ उत्सव ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपूर्वीच्या काळातील ‘अॅझटेक’ या मूर्तीपूजकांचा असल्याचे मानले जाते. माया संस्कृतीत, मरण पावलेल्या व्यक्तीसाठी शोक करणे अनादर ठरते. स्पेनने आक्रमण करून ही संस्कृती संपवली. सध्याच्या काळात तो मूळ मेक्सिकन, युरोपियन आणि स्पॅनिश संस्कृती यांच्या संमिश्र परंपरेतून साजरा केला जातो. अजूनही हा दिवस रंगीबेरंगी वेशभूषा, चैतन्यमय संगीत आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी साजरा केला जातो मात्र १ नोव्हेंबरला बालपणी मृत झालेल्यांसाठी, तर २ नोव्हेंबरला वयस्कर मृतांसाठी सर्व कुटुंबिय प्रार्थना करतात.

लॅटीन अमेरिकेतील ब्राझिल, अर्जेंटिना, बोलिविया, चिली, इक्वाडोर, पेरू, उरुग्वे आदी देशांत २ नोव्हेंबर या दिवशी लोक दफनभूमीत जाऊन त्यांच्या पूर्वजांना आणि नातेवाईकांना फुले अर्पण करतात.
फ्रान्स मध्ये a Toussaint (सर्व संत दिवस, १ नोव्हेंबर रोजी) असतो आणि la Commémoration des fidèles défunts (ऑल सोल्स डे, २ नोव्हेंबर रोजी) कुटुंबातील सदस्य स्मशानात जाण्यासाठी एकत्र जमतात आणि थडगे हिदर (ब्रुयेरे), क्रिसॅन्थेमम इ. फुलांनी सजवितात. चर्चमध्ये संध्याकाळी प्रार्थना करून आपल्या पितरांच्या आठवणी सांगतात. त्यानंतर घरी येऊन टेबलावर शुभ्र वस्र/चादर घालून त्यावर विविध खाद्य पदार्थ, पेये ठेवून मेणबत्या लावतात. खोलीतील फायरप्लेसमध्ये मोठे लाकूड जाळण्यासाठी ठेवून झोपण्यासाठी जातात. थोड्या वेळाने व्यावसायिक वादक वाद्ये वाजवून त्यांना झोपेतून जागे करतात आणि मृतात्म्यांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतात. त्या वेळी सजावटीतील सर्व खाद्यपदार्थ त्या वादकांना अर्पण केले जातात.
हंगेरीमध्ये, बरेच लोक रात्रीच्या कालावधीसाठी त्यांच्या घरात दिवे ठेवतात आणि त्यांच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ टेबलवर अन्न ठेवतात.
पोलंडमध्ये, ऑल सोल्स डे ला कुटुंबे स्मशानभूमींना भेट देतात जिथे त्यांच्या पूर्वजांना दफन केले असते आणि मेणबत्त्या लावतात.
पेरूमध्ये, लोक तांता वावा नांवाचा ब्रेड मित्र किंवा नातेवाईकांसोबत खातात. तांता वावा ही बाहुली किंवा लहान मुलाच्या आकारात भाजलेला गोड ब्रेड आहे.

जर्मनीमध्ये कबरींची रंगरंगोटी केली जाते. भूमीवर कोळसा पसरवून त्यावर लाल रंगाच्या बोरांनी चित्र काढले जाते आणि कबरींना फुले अन् कळ्या यांच्या माळांनी सजवले जाते. शेवटी सर्व जण मिळून प्रार्थना करतात.
पोर्तुगालमध्ये २ नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण परिवारासह दफनभूमीत जाऊन प्रार्थना केली जाते. तसेच सायंकाळी लहान मुले जमून प्रत्येक घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थांबतात. तेथे त्यांना केक आणि तत्सम खाऊ दिला जातो.
हॅलोविन,किंवा “ऑल हॅलोज इव्ह” ही ऑल सेंट्स डेची पूर्वसंध्येला आहे (हॅलो म्हणजे संत). सॅमहेन हा मृत्यूचा सेल्टिक स्वामी होता आणि त्याच्या नावाचा अर्थ उन्हाळ्याचा शेवट असा होतो. हिवाळा बहुतेक वेळा अंधार, मृत्यू आणि थंडीशी जोडलेला असल्याने, सेल्ट्सने त्वरीत मानवी मृत्यूशी संबंध जोडला. ३१ ऑक्टोबर, ज्याला सॅमहेनची पूर्वसंध्या म्हटले जाते, वर्षाच्या या काळात, जिवंत आणि मृतांच्या जगांमधील पडदा सर्वात पातळ होतो आणि सॅमहेन मृतांच्या आत्म्यांना पृथ्वीतलावर परत येऊ देतो. भुते, एल्व्ह, परी आणि गोब्लिन परत येतात आणि ज्यांनी त्यांना पूर्वी इजा केली असेल त्यांची शिकार करतात किंवा त्यांना पळवून नेतात अशी समजूत आहे. या आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी, स्थानिक लोक विविध पोशाख परिधान करतात आणि मोठी शेकोटी पेटवितात.
हल्ली हॅलोविनच्या दिवशी, काही लोक अजूनही “सामहेन आशीर्वाद” (Samhain Blessings) म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात.

बेल्जियममध्ये २ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’च्या दिवशी सुटी नसल्याने आदल्या दिवशी म्हणजे ‘ऑल सेंट्स डे’च्या दिवशी दफनभूमीत जाऊन प्रार्थना करतात आणि मृताम्यांच्या कबरीवर दिवा लावतात.
सुधारणा दिवस (Reformation day, १५१७) नंतर, युनायटेड चर्च ऑफ कॅनडा आणि युनायटेड मेथोडिस्ट चर्च यासारख्या बहुतेक प्रोटेस्टंट संप्रदायांनी हा पवित्र दिवस पाळणे सुरू ठेवले.
प्रोटेस्टंट सुधारणांचे उत्प्रेरक मार्टिन ल्यूथर यांना वाटले की, ख्रिश्चनांनी संतांची उपासना करण्याऐवजी त्यांचा सन्मान केला पाहिजे. म्हणून, या दिवशी, प्रोटेस्टंट सामान्यतः सर्व ख्रिस्ती, जिवंत आणि मृत यांचे स्मरण करतात. कॅथलिकांप्रमाणे, प्रोटेस्टंट चर्च शुद्धीकरणावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते सर्व आत्म्याचा दिवस साजरा करत नाहीत.
स्पेनमध्ये लोक प्रियजनांच्या कबरीला भेट देतात आणि फुले व मेणबत्त्या देतात. डॉन जुआन टेनोरियो हे नाटकही पारंपारिकपणे सादर केले जाते.
पोलंडमध्ये कुटुंबे त्यांच्या प्रियजनांची कबर स्वच्छ करतात, त्यांना फुलांनी सजवून मेणबत्त्या लावतात. खाद्यपदार्थ ठेवतात, विशेषतः पोवाकी ब्रेड. रस्त्यांच्या मधोमध अनेक ठिकाणी बोनफायर दिसतात. ही जुनी परंपरा आहे, ज्यानुसार यामुळे मृत व्यक्तीला त्यांच्या घरी येण्याचा मार्ग दाखवेल असे मानले जाते.
ऑस्ट्रियामध्ये गॉडफादर्स आणि गॉडमदर्स ऑल सेंट्सच्या वेण्या देतात. ही एक परंपरा आहे जी जुन्या अंत्यसंस्काराच्या विधीपासून उद्भवली आहे जिथे स्त्रिया एखाद्या प्रिय व्यक्तीचा शोक करताना आपले वेणीचे केस कापतात. शिवाय ऑल सेंट्स डे वर तयार केलेला गोड यीस्ट ब्रेडही दिला जातो.
हैती लोक फेस्ट ऑफ द डेड किंवा पूर्वजांच्या सणाला फेट गेडे (Fet Gede) म्हणतात. हा विशिष्ट उत्सव पारंपारिक कॅथोलिक आणि वूडू संस्कारांचे मिश्रण आहे. मृतांच्या स्मरणार्थ पोर्ट-ऑ-ग्रँड प्रिन्सच्या स्मशानभूमीच्या प्रवासाने समारंभ सुरू होतो. ते विधी, संगीत आणि नृत्याद्वारे बॅरन समेदी (स्मशानभूमीचे संरक्षक) आणि पापा गेडे (आत्म्याचे संदेशवाहक) यांच्या आत्म्याचे स्मरण करतात.

वरील सर्व गोष्टी वाचल्यानंतर हे लक्षांत आले असेलच की फक्त भारतातच नव्हे तर विविध पंथांच्या, तसेच अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील सर्वच देशांमध्ये पूर्वजांचे महत्त्व निर्विवाद आहे. तसेच सर्व ठिकाणी त्यांच्या स्मरणाचा काळ ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतच आहे हे दिसून येत आहे. भारतातही पितृपक्षाचा आश्विन मास ऑगस्ट किंवा सप्टेंबर याच काळात येतो.
या रूढींना विरोध केलेले पहिले ऋषी चार्वाक होत. त्यांच्या म्हणण्यानुसार आत्मा वगैरे गोष्टी नाहीतच. चार्वाक यांचे म्हणणे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही (विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही (आत्मा) तो आहे (अविनाशी मानणे) असे म्हणणे. अंधश्रद्धा ठेवू नका आणि ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, असा प्रचार त्यांनी केला. हजारो वर्षे झाली तरी रूढी अस्तिवात राहिल्या याचा सकारात्मक विचार करायला हवा.
चार्वाकांनंतर शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत मांडला. केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे. जीवात्मा हा आत्म्याहून भिन्न नाही आणि हे सर्व विश्व मिथ्या आहे सांगत त्यांनी मोक्ष ही केवळ मृत्यूनंतरची अवस्था नसून सध्या जगत असतानाही माणूस जीवनमुक्त होऊ शकतो, असे ते म्हणतात. या सर्वांनी मनाचा गोंधळ उडाला तर नवल नाही. पण सारांशाने म्हणायचे तर श्री. राजेंद्र मणेरीकर यांचे म्हणजे पूर्णपणे पटते, आत्मसात करावेसे वाटते. ते म्हणतात, “पितरांत अडकून राहू नका तसेच त्यांना विसरूही नका. हा पंधरवडा त्यासाठी आहे. भटाभिक्षुकांचा राग येत असेल तर आपले धर्मपालन त्यांच्याशिवाय करा पण धर्म सोडू नका. धर्मपालनाची जबाबदारी आपली आहे, भटांची नव्हे. ते आपले मदतनीस आहेत. ती मदत घेण्याचे बंधन आपल्यावर नाही. जे सगळे करतात ते आपण केले म्हणजे समाज एक राहतो व आपणच शहाणे असल्याचा वाईट शिक्का आपल्यावर बसत नाही. आपण शहाण्या पूर्वजांचे शहाणे वंशज आहोत. चार्वाक म्हणाले, तेही सत्य आहे आणि शंकराचार्यांना चूक सिद्ध करणारा अजून जन्माला यायचा आहे. त्या दोघांना मानूनही पितृपक्षातील आपले कर्तव्य आपण बजावू शकतो. तसे केले म्हणजे बुद्धी आणि मन यांत वरचढ कोणी होणार नाही व शांत वाटेल”.
कोणत्याही देशांत आधुनिकतेच्या नांवाखाली या परंपरा/उत्सव सोडून दिल्या गेल्या नाहीत. मग आपल्या देशातच या बद्दल अंधश्रद्धा, जुनाट प्रथा असे म्हणून याला नव्हे रूप देऊ या, जसे इतर “डे” साजरे करतो तसे काहीसे रूप देऊ या असे सुधारकी विचार बरोबर आहेत कां याचाही विचार करायला हवा. आपला सालस मातृदिन सोडून पाश्चिमात्यांचे अनुकरण करायचे म्हणून ‘मदर्स डे’ साजरा करायची पद्धत सुरु केली तद्वत श्राद्ध पक्षाचे होऊ नये. उलटपक्षी बाहेरच्या देशांत हिंदु धर्मातील सिद्धांतांना चिरंतन आणि वैश्विक सिद्धांत समजले जाते. त्यामुळेच अनेक देशांत वेद, उपनिषदे यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठे उघडली गेली आहेत. हिंदु असो वा अन्य कोणत्याही पंथाची व्यक्ती असो, जी धर्मशास्त्रांचे पालन करील, तिला त्याचा निश्चित लाभ होईल.
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांना त्यांच्या मृत मुलाच्या आत्म्याची सतत जाणीव होत होती. त्यामुळे त्यांनी मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी संपूर्ण कुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वार येथे पिंडदान आणि श्राद्ध विधी करवून घेतले.
रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवारशियाच्या माजी संसद सदस्य असून त्या ‘पार्टी ऑफ पीस अॅण्ड युनिटी’च्या संस्थापक, अध्यक्ष आहेत. त्या गोर्बाचेव्ह आणि येल्तसिन यांच्या कट्टर विरोधक. त्यांचा सोव्हिएत संघाच्या विघटनाला तीव्र विरोध होता. सोव्हिएत संघाच्या विघटनावरून त्यांच्यात तीव्र मतभेदही झाले होते. उमालातोवा यांचे म्हणणे होते की, येल्तसिन पुनःपुन्हा त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्यांच्याशी राजकीय सूत्रांवर वाद करतात. कधी ते अपराधी भावनेमुळे दु:खी वाटतात. असे वाटते की, येल्तसिन यांचा आत्मा असंतुष्ट आणि अशांत आहे. उमालातोवा यांनी त्यांच्या या स्वप्नाविषयी हरिद्वार येथील देव संस्कृति विश्वविद्यालयाच्या विदेश विभागाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मिश्र यांच्याशी चर्चा केली आणि मार्च २०१० मध्ये त्यांनी रशियाचे माजी राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भारतात तर्पण आणि पिंडदान केले. तसेच त्यांनी त्यांचे आई-वडील आणि अफगाणिस्तानमध्ये मारले गेलेले त्यांचे दोन भाऊ यांच्यासाठीही यज्ञ अन् पिंडदान केले आणि शांतीसाठी प्रार्थना ही केली. यानंतर उमालातोवा म्हणाल्या, ‘‘श्राद्ध-तर्पण केल्यापासून मला पुष्कळ सहजता जाणवत आहे. मला वाटते की, माझ्यावर काही ऋण होते, जे आता उतरले आहे.’’ त्यानंतर उमालातोवा भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांमुळे इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
ही वानगीदाखल उदाहरणे दिली पण विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात.
पितृपक्षामध्ये कावळ्याचा मान असतो. असे मानले जाते की जर आत्म्याची वासना कशातच राहिलेली नसेल तर कावळा पटकन पिंडाला शिवतो अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो आणि तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. वैज्ञानिक दृष्ट्या पिंपळ, वड यासारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून वड पिंपळाच्या बिया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. व्यंकटेश स्तोत्रात ही “काक विष्ठेचे झाले पिंपळ” असे म्हटले आहे. आता शहरांत कुठे वड, पिंपळ आणि रुजायला जागा असा प्रश्न साहजिकच मनांत येईल तर कावळे नैसर्गिकरीत्या सफाई कर्मचारी आहेत. लहानपणी, एकदा एक माणूस रस्त्यावरच शिंकरला. प्रचंड घाण वाटली, पण पुढच्या क्षणी दोन कावळे तिथे झेपावले नि सारी घाण क्षणांत खाऊन टाकली. तेही फारच किळसवाणे वाटले तेव्हां बापू म्हणाले, यांच्यामुळे रोगराई पसरत नाही. तशी दृश्ये प्रत्येकानेच पाहिली असतील. तसेच ते लहान कीटक, प्रदूषण करणारे घटक ही खातात. यामुळे नैसर्गिक कचरा व्यवस्थापन होते. कावळ्याशिवाय प्रदूषणाची समस्या आणखी वाढेल. याशिवाय ते पिकांवरील आणि झाडांवरील कीटक खाऊन त्यांचे संरक्षणही करतात. म्हणूनही कृतज्ञता म्हणून चांगले अन्न द्यावे त्यांना. तसेच गाईला चारा द्यावा असे सांगितले आहे. धार्मिक कारण पटत नसेल तरी द्यावा चारा तिला. अगदी देवळाच्या बाजूला गाय घेऊन बसलेली महिला दिसेल तेथेही. त्यामुळे निदान ती भीक मागणार नाही आणि एका गरीब कुटुंबाला स्वाभिमानाने जगायला तुमचा किंचित हातभार लागू शकेल.

पूर्वजांची उपासना म्हणजे कृपा मागणे नव्हे, तर आपली कर्तव्ये पूर्ण करणे होय. पूर्वजांना आदर आणि श्रद्धांजली वाहिली पाहिजे, मृत व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आणि स्मृतींचा आदर केला पाहिजे, कारण पूर्वजांनीच वंशजांना जगात आणले, त्यांचे पालनपोषण केले आणि वंशज ज्या परिस्थितीत वाढले त्या परिस्थितीची तयारी केली, म्हणून पूर्वज. पूजा म्हणजे आध्यात्मिक ऋणांची परतफेड. त्याने पूर्वजांचा आदर,सन्मान आणि त्यांच्या नंतरच्या जीवनात त्यांची काळजी घेण्याचा एक मार्ग आहे ज्यामध्ये पूर्वजांच्या कल्याणाची आणि सजीवांबद्दल सकारात्मक स्वभावाची हमी दिली जाते. या पंधरवड्यातील सोयीचा दिवस पाहून हे कार्य – आपल्याला झेपेल त्या प्रमाणात – करणे हे धर्मपालन करणे आहे. ही प्रथा धर्मातीत आहे. धर्मशास्त्रात अनेक मुभा दिल्या आहेत.
ब्राह्मणांकरवीच कार्य करावे असे कोठेही सांगितले नाही. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान करावे. एका पितरांसाठी एकाला. ते शक्य नसेल तर छोटे पान मांडावे व त्याचा नेवैद्य दाखवावा. याला चटावरचे श्राद्ध असे म्हणतात.तेही शक्य नसेल तर दूध द्यावे. असे असतांना उगाच आधुनिक विचारांनी कोणी परंपरांची मोडतोड करू नये.
जाता जाता आणखी एक. पितृपक्ष अजून संपला नाही तोच हॅलोविनची चर्चा कानावर पडली. हॉरर नाईट्स म्हणून साऱ्या प्रसिद्धीमाध्यमातून जाहिराती झळकू लागल्या आहेत. त्यासाठी विविध कल्पना, त्यानुसार ड्रेसेस, कार्यक्रमाची तिकिटे… हेही पैशांचे खेळ तेही व्यावसायिक कंपन्यांच्या खिशांत. जरूर साजरे करा कारण संस्कृतीची देवाणघेवाण व्हायलाच हवी. फक्त आपण जे करतो टायची आपल्याला पूर्ण माहिती हवीच, नाही कां ? बहुतेक सर्व याकडे मज्जा या दृष्टिकोनातून पाहतात आणि अर्थात व्यावसायिक लोक तीच कल्पना दृढ करण्यास मदत करतात पण जन हो, आयर्लंड, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स इ. देशांमधील तो मृतांचा दिवस, मृत प्रियजनांचा, संतांचा आणि पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आहे ! म्हणजे आपल्या पितृपक्षा प्रमाणेच बरं !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Neela…Atyant mahtwapurn aani upyukt mahiti …thanks🙏🙏🙏
अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहेत तिन्ही लेख.
अनेक देशांतील पितरांच्या साठी पाळल्या जाणाऱ्या परंपरा कळल्या. अभ्यासपूर्ण लेख. धन्यवाद नीला.
very good n informative Article . please keep writing. All the best 👍