Wednesday, September 17, 2025
Homeलेखपितृपक्ष नवा विचार

पितृपक्ष नवा विचार

गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो.

भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात.

या वर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत आहे.

आत्मा अमर आहे हे आपण मानतो. तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध, मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही. आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो. कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात. याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो. त्याच्याशी आपण जोडले जातो.

आपले पूर्वज हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन). शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स, क्रोमोझोम्स, पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित असतात. आणि याच बरोबर आपल्यातले गुण, स्वभाव, आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व, आपल्या जगण्याच्या, विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांची निश्चितपणे निगडित असतात. ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो.

आपले सण, आपले उत्सव हे ऋतूचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत. आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते. पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की, तो पाळण्यामागे आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे. पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.

आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू सॉरी म्हणतच असतो ना ? मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत, त्या सर्व पितरांसाठीसाठी अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्याच वेळी सॉरी ही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे. त्यांच्या अवमान केलेला आहे. त्यांची आबाळ ही आपल्या हातून झालेली आहे, म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा. त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी. आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.

दर्भाहुती, तर्पण, अग्नि कुंडातला घास यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना हाच उद्देश जाणावा.

भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो. (ब्रीडिंग सीजन), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून निसर्गवर्धनाची भूमिका जाणून घ्यावी.

ही अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते.

या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तीगत असावं.

आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले. मग आपली ही पितृपक्ष परंपरा, मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे ? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये ? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा यात न पटण्यासारखे काय आहे ?

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पितृपक्षाकडे पितरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून पहावे हा विचार भावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं