पुण्यातील डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीची प्रसन्न संध्याकाळ. पुस्तक महोत्सवाची जिकडे तिकडे चर्चा सुरु होती. म्हटले आज जायचेच !
तसा हा पुस्तक मेळावा दरवर्षी होतोच, मला गेल्यावर्षीच्या म्हणजेच 2024 च्या भव्य पुस्तक महोत्सवाची आठवण आली. लोकमान्य टिळक, आगरकर, कर्वे, गोखले असे आदर्श प्राध्यापक आणि अत्रे, फडके, गडकरी यांच्यासारखे उत्तम साहित्यिक, कृपलानी, सावरकर, व्हीपी सिंग, थोरात, नरसिंहराव…अशा कित्तीतरी आपल्या देशासाठी ज्यांनी आयुष्यभर स्वतःची पर्वा न करता परिश्रम घेतले अशा थोर व्यक्ती ज्या कॉलेजमध्ये शिकल्या त्या फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य मैदानात हा पुस्तकांचा भव्य महोत्सव होता. विद्येचे माहेर किंवा मंदिर असलेल्या पुण्य नगरीत ! त्यामुळे तर मी जास्तच आनंदात होते. सारा परिसर उत्साहात न्हायला होता जणू ! पुणेकर हौशी, दर्दी म्हणतात त्याचे कारण लगेच लक्षात आले.
खरेतर एरव्ही सोशल माध्यमातून पुणेकराची मजेत खिल्ली उडवली जाते. आकाशात काळे मेघ जमले आणि गुलाबपाण्यासारखे तुषार जरी आले तरी रेनकोट, छत्र्या बाहेर येतात किंवा थंड हवेचा झोत आला तरी लगेंच सर्दी पडसे होईल म्हणून रंगीबेरंगी स्वेटर्स, कानटोप्या, मफलर्स, गोधड्या बाहेर निघतात म्हणून ! पण हे मजेत असले तरी खरे आणि छानच आहे. हे प्रत्येक वस्तूलासुद्धा न्याय देतात. म्हणूनच इथला सगळा परिसर सुद्धा जॅकेट्स, स्वेटर्स घालूनही थंडीला नं जुमानता मेळाव्याच्या ओढीने आलेल्या रसिक वाचकांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्यांच्या स्वागतासाठी इथेही खूप सुंदर सुंदर आणि आकर्षित करणारी या मेळाव्यासाठी अगदी सुयोग्य अशी शिल्पे, मोहक रंगीबेरंगी पोस्टर्स, चित्रे साकारली होती. पेशवाई थाटाला साजेसा असा हा भव्यदिव्य महामेळावा होता. मोठमोठे प्रकाशक, साहित्यिक, लेखक, इथे आवर्जून आलेले होते. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यांचे उदघाटन झाले. अगदी बालचमुपासुन ते वृद्धांपर्यन्त साऱे इथे आवर्जून उत्साहाने येत होते. आठवडाभर नुसती पर्वणीच होती ही.

याठिकाणी सहाशे पेक्षा जास्त स्टॉल्स, शंभर पेक्षा जास्त प्रकाशन संस्था, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,मोठ्या साहित्यिकांची भाषणे, अनेक कार्यशाळा पण होत्या. यात एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा नोंदवला गेला. ९७,०२० पुस्तकांच्या रचनेतून ९.९४ मिटर लांबीची भारतीय संविधानाची प्रतिकृती निर्माण करून एक विश्वविक्रम नोंदला. वाचक, लेखक, प्रकाशक या सर्वांसाठी हे एक मोठे व्यासपीठच होते म्हणा ना ! जगाचा, साहित्य, संस्कृतीचा आणि संबंधांचा महोत्सवच होता हा. हिच याची थीम होती. संगीत, नृत्य, अशा सुंदर कला गुणांचा अविष्कार सुद्धा इथे पहायला मिळाला. मन अगदी भारावून गेले होते.
वाचन संस्कृती जोपासली जावी, सध्याच्या सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे आपली वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे. म्हणून वाचनाची आवड निर्माण व्हावी, छान छान साहित्य लोकांनपर्यंत पोहोचावे, साहित्यिकांचे विचार लोकांपर्यत पोहोचवेत हा मुख्य उद्देश ठेवून असे मेळावे, महोत्सव घडवले जातात. अनेक प्रतिथयश लेखक, कवी प्रत्यक्ष लोकांना भेटतात. नाहीतर आपली त्यांच्याशी ओळख त्यांच्या छान कादंबऱ्या, कथा, लेख, कविता अशा माध्यमातून फक्त नावेच समजण्यापर्यंत असते. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, भेटून बोलण्याची संधी इथे मिळते. हा अनुभव काही औरच असतो.
इथे अगदी मोठया पुरातन ग्रंथापासून ते लहान मुलांच्या चित्राच्या पुस्तकापर्यंत असंख्य दुर्मिळ असे साहित्य पहायला मिळाले. यात मानांकित, नामांकित नवोदित असलेल्या साऱ्या प्रकाशन संस्था आपले साहित्य वाचकांना उपलब्ध करून देतात. त्यात कित्तीतरी जुने ग्रंथ, दुर्मिळ जुनी पुस्तके सहज मिळतात. लोकानी आपले साहित्य वाचुन त्यातील विचार समजून घेऊन संस्कृती जपावी, पुढे न्यावी तसेच हे साहित्य घरात असले की मुलेही उत्सुकता म्हणून तरी वाचतील हा या सर्वामागचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी हे साहित्य खुप अल्प दरात, खुप सवलतीच्या दरात उपलब्ध केले जाते. शिवाय या पुस्तकांच्या बाबतीत मला आश्चर्य याचे वाटले की इतर सर्व नित्य गोष्टींची सुद्धा किंमत ज्या पटीने वाढते, तशी यांची किंमत वाढत नाही, काहींची तर ती तशीच असते. तरीही ती विकत घ्यायची म्हटली की पाकिटाकडे आधी पाहिले जाते.
या मेळाव्यात हौसे, नवसे, गवसे सारे जण येतात. प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण पुस्तक खरेदीसाठी खास लांबलांबुन त्यासाठी राखून ठेवलेल्या पैशाने ती घेण्यासाठी आवडत्या दुर्मिळ पुस्तकांची यादी करून ती घेऊन येतात. त्यासोबत आवडलेली पुस्तकेही खरेदी करतात. मग तेंव्हा मागेपुढे पहात नाहीत. पण काहीजण फक्त प्रदर्शन पहावे म्हणून येतात फिरत फिरत, आवडलेच तर प्राईस टॅग पाहून घ्यायचे की नाही ते ठरवतात. अशा लोकांची तर खरच गंम्मतच वाटते. हॉटेल मध्ये गेल्यावर किंवा शॉपिंगला गेल्यावर असाच विचार करत असतील का ? हा प्रश्न पडतो आणि वाईटही वाटते.
आमच्या बाजूला एक मित्रमैत्रिणींचा घोळका होता. पुस्तके, स्टॉल पाहत होते. त्यातला एकजण बहुतेक पुस्तकप्रेमी असावा, त्याची नजर सतत काही छान, वाचनीय दिसले की तिथेच घुटमळायची. बाकीचे त्याची चेष्टा करत होते. एकतर चक्क चल रे, कित्ती हा टाइमपास चाललाय, चल, आता कॉफी शॉपला जाऊन मस्त मजा करु म्हणाला. खरच कीव आली. एक महागडी कॉफी पिऊन मजा मारण्यापेक्षा त्याच पैशात कित्ती छान पुस्तके घेतली असती आणि ती सर्वांनी वाचली असती तर जास्त मजा आली असती. पण हे समजायला हवे ना ?
खरे तर कित्तीतरी प्रकाशक, लेखक इतकेच नाही तर ते पुस्तक छापण्यासाठी संकलन करण्यापासून ते प्रिंटिंग पर्यंत अनेक लोक कार्यरत असतात त्यांनाही त्यातून थोडी का होईना मदत होते आपली बऱ्याच नामांकित पब्लिकेशन बुकस्टॉल्सवर खूप गर्दी होती. अर्थात हे नावं त्यांनी कर्तृत्वानेच कमावलेले असते. पण काही अपवाद सुद्धा असतातच ना ? तरीही केवळ नावावरून त्या स्टॉल्सना तुडुंब गर्दी होती, तर काही स्टॉल्स वरची पुस्तके खरोखरच अतिशय सुरेख, वाचनीय असूनही नवीन प्रकाशन असल्यामुळे म्हणा किंवा जास्त नावाजलेले नसल्यामुळे तिथे मात्र काहीच लोक दिसायचे. मला तर त्या
वेळी अभिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांचा गाजलेला ‘बागबान’ सिनेमाच आठवला. सहज म्हणून लिहिलेले मनोगत, एरव्ही कुणीही वाचले नसते पण ती कथा मनाला भावली म्हणून मित्राने सहज म्हणून प्रकाशित केली काय आणि ती लोकांना इतकी भावली की त्यातून लाखो रुपये मिळाले. सन्मान, प्रतिष्ठा मिळाली. नेहमी उपेक्षा करणाऱ्यानाही ही किंमत कळते आणि पश्चात्ताप होतो.
सारे चित्रच पलटते. पैसा, प्रसिद्धी, प्रेम सारे मिळते. असेही प्रत्यक्षात सुद्धा घडताना दिसते. सांगण्याचा मुद्दा हा, की कित्येकदा खरी, सुंदर कलाकृती केवळ लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्यामुळेही त्याला किंमत नसते तर या उलट अलीकडे तर कोणीही थोडेसे यश मिळाले की लगेच कुणा लेखकाला हाताशी धरून बायोपिक म्हणजे आत्मचरित्र लिहून घेण्याची मोठी फॅशनच झाली आहे. मग त्यात सगळे फक्त चांगले तेवढे तिखटमीठ लावून रंगावायचे, न केलेली कामेही स्वतः केली हे दाखवायचे आणि त्याला भरभरून प्रसिद्धी द्यायची, त्यावर पिक्चर काढायचे. त्यामुळे खरेच ज्यांनी उत्तम सामाजिक कार्य करून देशाची शान वाढवली ते मागे राहतात केवळ प्रसिद्धी न मिळाल्यामुळे आणि जे लोकांना दाखवले जाते, ते लोकांना खरे वाटून शहानिशा करून घेतला जात नाही. त्यामुळे अशा खोट्या लोकांना मात्र मोठेपणा मिळतो. असे चित्र प्रत्येक क्षेत्रात असतेच. पण याचा भावी पिढीवर परिणाम होतो. म्हणून पुस्तक वाचताना ते पारखून घेण्याचीही गरज आहे.

वाचनाची आवड ही लहानपणांतच लावायला पाहिजे. पूर्वीच्या काळी घराघरात ग्रंथ, छोटी मोठी स्तोत्रे यांची पुस्तके,पोथ्या असत. लहान मुलांना स्तोत्रे शिकवणे, त्यांना अक्षर ओळख झाली की स्वतः वाचायला लावून पाठांतर करून घेणे हे मोठ्यांचे त्यांच्यावर केलेले संस्कार होत. काळाच्या बदलामुळे हल्ली पालकांना मुलांना द्यायला वेळच नसतो. त्यात त्यांचीही खूप चूक नाही.
पण सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावामुळे मुले वाचन विसरत चालली आहेत. त्यांना भेट म्हणून मोबाईल किंवा महागड्या वस्तू देण्याऐवजी छान छान पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावावी. कधी त्यावर गप्पा माराव्या. वाचनामुळे ज्ञान तर वाढतेच पण मनोरंजनही होते.इतिहास आपल्याला भूतकाळ सांगतो, विज्ञान भविष्य घडवते तर साहित्य वाचनातून उत्तम संस्कार मिळून ,अनुभव व विचार समृद्ध होतात आणि आदर्श नागरिक घडतो. चांगल्या वाचनामुळे मन समृद्ध होते, चांगले आणि सकारात्मक विचार रुजतात. विचाराना योग्य दिशा मिळते, उभारी येते, निर्णयक्षमता वाढते. सुखदुःखात कधीही पुस्तकासारखा मित्रच साथ देतो. संकटात पुन्हा उभारी देतो. विचारात प्रगल्भता येते, आत्मिक शांतता समाधान लाभते.
म्हणूनच या मेळाव्यातून आम्ही दरवर्षी छोटी, मोठी विविध विषयांवरील भरपुर पुस्तके खरेदी करतो. एक तर ती खूपच सवलतीच्या दरात असतात. आणि वर्षभरात आपल्या घरात अगदी संक्रांतीच्या हळदीकुंकवापासून ते येणाऱ्या पाहुण्यांना भेट काय द्यावे, हा यक्षप्रश्न पडतो, तो सहज आणि सुंदररित्या सुटतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला ते पुस्तक भेट दिले की तो आवर्जून वाचणारच आणि आनंद पण वाटतो. आपली आवड लक्षात ठेवून आपल्यासाठी खास भेट दिली म्हणून. वाचन संस्कृती टिकवायला आपला थोडा का होईना हातभार लागल्याचे समाधान आपल्याला मिळते ते निराळेच ! त्यानिमित्ताने आम्हालाही ही पुस्तके वाचायला मिळतात. आम्ही किटी पार्टीच्या बायका तर दरवर्षी प्रत्येकीच्या आवडीचे पाचशे रुपयांचे तरी दिवाळी अंक विकत घेतो आणि मग एकमेकींना वाचायला देतो. सर्वांचे वाचून झाले की खाली असलेल्या लायब्ररीत नेऊन देतो. म्हणजे तिथे बरेच लोक खास करून ज्येष्ठ नागरिक वाचायला येतात,त्यांच्या उपयोगी येतात. गेली पाच वर्षे आम्ही हा उपक्रम सुरु ठेवला आहे.
वाचन संस्कृती जपण्यासाठी अशी पुस्तक प्रदर्शने, पुस्तक महोत्सव, मेळावे घडवण्याची खूपच आवश्यकता आहे. पुस्तकामुळे माणूस घडतो. म्हणूनच हा अमूल्य ठेवा आपण चिरंतन जपलाच पाहिजे.

— रचना : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
